आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरज चारित्र्यसंपन्न समाजाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतीच सर्व वृत्तपत्रांमध्ये बातमी झळकली, डान्सबार पुन्हा सुरू होणार! सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरची बंदी रद्द ठरवली. डान्सबार ही संकल्पनाच उदयाला आली ती 15-20 वर्षांपूर्वी. त्याआधी मदिरा आणि मदिराक्षी या दोन गोष्टींपासून दूर राहण्याचा संस्कार आम्हाला मिळायचा आणि समाजातील 4-5 टक्क्यांपलीकडे दोन्हीच्या आहारी गेलेल्यांची संख्या नव्हती. पण भारत आता मॉडर्न झालाय हे पटायला लागलेय अनेक गोष्टींवरून! तरुण मुलामुलींची एकमेकांशी मैत्री, मुलींनी अनेक क्षेत्रांत मिळवेलेली आघाडी, अनुषंगाने मिळालेले वैचारिक व आर्थिक स्वातंत्र्य, तरुणाईचा पेहराव, त्यांची जीवनमूल्ये, घरातील संस्कारांची पायमल्ली, इंटरनेटचा घरात आणि पर्यायाने आयुष्यात शिरकाव, फोफावलेला चंगळवाद आणि त्यातून उदयाला आलेली अनैतिकता! आजच्या पिढीचा पैसे हाच ध्यास आणि ध्येय आहे. मग तो कोणत्याही मार्गाने का होईना मिळवायचा - नृत्यकलेचा विपर्यास होऊन त्याचे रूपांतर डान्सबारमध्ये झाले. तरुण मुलींना रोजगाराचा एक मार्ग उपलब्ध झाला आणि पैशांसाठी तरुण मुली अश्लील गाण्यांवर थिरकायला बारकडे वळू लागल्या. तरुण मुलींना वाममार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करणारे आम्हीच आहोत. आमची समाजव्यवस्थाच अशी आहे की अतिशय सहजतेने उपलब्ध असणा-या व्यवसायात त्या पडत आहेत आणि वाममार्गावर त्यांचे पाऊल पडते आहे.


समाजव्यवस्था, घरची परिस्थिती, पैशांची आवश्यकता, वाढता स्वैराचार, या सर्वच गोष्टींमुळे अनेक तरुण मुली अनैतिक देहव्यापारात गुंतत जातात. अपरिहार्य कारणाने दुदैवी भोव-यात अडकत जातात.


अनैतिक देहव्यापार प्रतिबंध कायदा आपल्या देशात 1956मध्येच मंजूर करण्यात आला. याचा उद्देश तरुण मुलींना अनैतिक देहव्यापारापासून दूर नेणे हा आहे. पण आज कायदा मंजूर करून अर्धे शतक लोटूनही अनैतिक देहव्यापाराचे प्रमाण कमी झालेले नाही. या कायद्याने देहविक्रीचा व्यवसाय पूर्णपणे बेकायदा ठरवला नसला तरी या व्यवसायासाठी मुलींना प्रवृत्त करणे, जबरदस्ती करणे, आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेऊन व्यवसाय करावयास लावण्-यावर कायद्याने बंदी आहे.


कोणतेही घर, जागा अशा व्यवसायासाठी वापरणे, भाड्याने देणे, अशा जागी अनैतिक देह व्यापार करण्यास परवानगी देणे कायद्याने गुन्हा आहे. असा व्यवसाय चालवणा-यास तीन वर्षे कैद, दोन हजार रुपये दंड शिक्षा होईल. पुन्हा तोच गुन्हा करत राहिल्यास पाच वर्षे कैद आणि दोन हजार रुपयांपर्यंत दंड ही शिक्षा होईल. घरमालकास माहिती असूनही स्वत:ची वास्तू अनैतिक कामासाठी भाड्याने दिल्यास, दोन वर्षांपर्यंतची कैद आणि पुन्हा तोच गुन्हा केल्यास पाच वर्षांपर्यंतची कैद, अशी शिक्षा होईल. अनैतिक कृत्यांसाठी अथवा व्यवसायासाठी मुलींना फूस लावणे, पळवणे किंवा पुरवठा करणे या गुन्ह्यांसाठी तीन वर्षे ते सात वर्षे कारावास आणि दंड आणि अज्ञान व्यक्तीला पळवल्यास सात वर्षे ते आजन्म कारावास होऊ शकतो. वेश्याव्यवसायासाठी सार्वजनिक ठिकाणी, हॉटेलमध्ये जागा भाड्याने दिल्यास भाड्याने देणा-यास तीन ते सहा महिने कैद होऊ शकते. हॉटेलमध्ये अल्पवयीन व्यक्तीस वेश्या व्यवसाय करताना पकडल्यास हॉटेलचा व्यावसायिक परवाना रद्द होईल.


असा व्यवसाय सार्वजनिक ठिकाणी होतो आहे असे लक्षात आल्यास परिसरात असलेल्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी. अशा व्यवसायात असणा-या अल्पवयीन आणि इतर मुली जेव्हा दोषी असतात तेव्हा त्यांना संधी दिल्यास सुधार होऊ शकतो. यातून बाहेर पडावयाचे असल्यास त्या स्त्रीला शिक्षा न करता सुधारगृहात ठेवण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते. एक सुशील आणि चारित्र्यसंपन्न समाज तयार करण्यासाठी आपण सजग नागरिक होणे आवश्यक आहे.