आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Need To Write On Economic And Caste Related Tensions In Rural Area

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे आर्थिक, जातीय तणाव शब्दबद्ध करण्याची गरज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण साहित्याचा प्रारंभ 1920 च्या आसपास दिसतो. गांधीवादाचा आणि ग्रामीण साहित्याचा उदय या गोष्टी समकालीन आहेत. कारण याकाळात महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला, अशी हाक दिली. कारण भारत हा खेड्यांचा व कृषिप्रधान देश आहे. हे त्यांच्या संपूर्ण विचारांचे केंद्रवर्ती सूत्र होते. त्यामुळे 1920 नंतरच्या कालखंडात मराठी ग्रामीण साहित्याला जाणीवपूर्वक प्रारंभ झाला. प्रारंभीच्या काळात ग. ल. ठोकळ, र. वा. दिघे, राम तनय, ग. ह. पाटील या लेखकांनी आणि कवींनी ग्रामीण साहित्याचा प्रवाह सुरू करून दिला. परंतु या कालखंडातल्या संपूर्ण ग्रामीण लेखनावर स्वप्नरंजनाची छाया पसरली होती. पुढे श्री. म. माटे यांनी व व्यंकटेश मांडगूळकर यांनी मराठी ग्रामीण साहित्याला वास्तवाचे भान आणून दिले.
शंकर आबाजी पाटील, रणजित देसाई, अण्णाभाऊ साठे व शंकरराव खरात यांनीही ग्रामीण साहित्याला वास्तवाचे भान आणून दिले. व 1945 नंतर मराठीतील ग्रामीण साहित्य अधिक वास्तवाभिमुख झाले आणि ते जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांना स्पर्श करून ते अधिक व्यापकही झाले. अशा प्रकारे ग. ल. ठोकळ, र. वा. दिघे यांच्या पिढीने सुरू केलेले ग्रामीण साहित्य माटे, मांडगूळकर आणि शंकर पाटील यांनी अधिक प्रगल्भ केले. मुख्यत: माटे व मांडगूळकर यांनी ग्रामीण भागातल्या दलितांच्या जीवनातील उपेक्षा शब्दबद्ध केली. अण्णाभाऊ साठे आणि शंकरराव खरात यांनी अस्पृश्यता अस्पृश्यांचे दु:ख फार तीव्रतेने प्रकट केले.
शंकर पाटील यांनी ग्रामीण माणसांचे मनोविश्लेषण त्यांनी केले. ग्रामीण जीवनातील दु:ख, दारिद्र्य, निसर्गावर अवलंबून राहण्याची अवस्था या सगळ्याच गोष्टी या लेखकांनी मराठी साहित्यात आणल्या. शंकर आबाजी पाटील यांच्या वेणा, भुजंग, नेमानिनि या कथा एकूण भारतीय वाङ्मयात श्रेष्ठ ठरतील अशाच आहेत. श्री. म. माटे यांची तारळ खो-यातील पि-या, चेंगाजीबुवा आणि एका अस्पृश्याची डायरी, या कथा अस्पृश्यतेची दु:ख मांडणा-या अशा आहेत. मांडगूळकरांच्या देवा सटवा महार, या कथाही यासंदर्भात निर्देशिता येईल.
आजच्या घडीला मराठीत फार चांगले ग्रामीण लेखक लेखन करीत आहेत. कवितेच्या क्षेत्रात इंद्रजित भालेराव, श्रीकांत देशमुख, ऐश्वर्य पाटेकर यासारखे कवी ग्रामीण जाणिवा व्यक्त करणारे हे कवी नक्कीच महत्त्वाचे आहेत. ग्रामीण जीवनातील दु:ख, कष्ट, वेदना तर ते प्रगट करतातच पण ग्रामीण जीवनातील निसर्ग त्यातील आनंदाचे क्षण हेही तेवढेच समरसून ते व्यक्त करतात. आसाराम लोमटे, गणेश घाडगे, कृष्णात खोत, किरण गुरव व भारत काळे हे मराठीतील कथा, कादंबरी लिहिणारे लेखक ग्रामीण जीवनात झालेले बदल, यंत्रयुगाचे आक्रमण त्याने निर्माण केलेले प्रश्न बदलले राजकारण या सगळ्या गोष्टींचे अतिशय अनोखे व समर्थ दर्शन घडवतात. एका अर्थाने 1990 नंतरची ग्रामीण साहित्यातली ही महत्त्वाची नावे आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. चांगलं साहित्य असेल तर प्रकाशक छापतातच. ग्रामीण साहित्याने आजच्या जीवनातील आर्थिक आणि जातीय तणाव शब्दबद्ध करण्याची नितांत गरज आहे.
-शब्दांकन : महेश रा. सरोदे