आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आईच्या कुड्यांचा कानमंत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सणासुदीचे दिवस. उत्साहाचे, चैतन्याचे. छानशा जरीकाठी साड्या अन् त्यावर दागिने घालून मिरवायचे दिवस. नाहीतर एरवी आहेच पंजाबी ड्रेस अन् जीन्स सुटसुटीत पडतं आणि सोईचं म्हणून. पण साडीचा बाज काही औरच. साडीची नजाकत काय सांगावी? त्यावर पारंपरिक दागिने. मला स्वत:ला हे कॉम्बिनेशन फार आवडतं. गौरीची तयारी करताना त्यांच्या साड्या, दागिने, मुखवटे हे सगळं पाहताना स्वत:चीही तयारी सुरू होती. कोणत्या दिवशी कोणती साडी, त्यावर कोणते दागिने, सोन्याचे की मोत्याचे! त्यातच एका डबीत दिसल्या आईच्या कुड्या. आईची आठवण. पूर्वी म्हणजे खूप पूर्वी नव्हे अगदी २५, ३० वर्षांमागे साधारण सगळ्या स्त्रियांची वेषभूषा म्हणजे साडी, हातात काचेच्या बांगड्यांबरोबर सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, गळ्यात मंगळसूत्राबरोबर बोरमाळ किंवा एकदाणीचा पदर. कानात मोत्याच्या कुड्या, पायात जोडवी. हा प्रकार सगळ्या साड्यांवर मॅचिंग होणारा.

ही कानातली कुडी सोन्याच्या पाठीत आणि पुढे मोत्यांनी गुंफलेली असायची. काही वेळेला बाजूने मोती आणि मध्ये डाळिंबी खडा किंवा मग सगळेच मोती. कानातल्या कुडीमुळे चेहऱ्यावर येणारा खानदानी आदब, सात्त्विकता शोभून दिसते आणि त्या सतेज मोत्याबरोबर चेहऱ्यावरचे भावही लोभसवाणे दिसतात. अशा काळातला आईच्या कुड्यांचा हा जोड.

कुडी हा शब्द, आपल्या देहालाही कुडी म्हणतो ना आपण, त्या देहाशी साधर्म्य दाखवणारा आहे. या देहाची कुडी आहे, याच्यात चैतन्य आहे तोपर्यंत सगळे नटणे, मुरडणे चालायचे. एकदा देहाची कुडी पडली की, सगळे कृष्णार्पण. या देहाच्या कुडीला संस्काराची, सात्त्विकतेची पाठ असली की, विचारांचे व कर्तृत्वाचे मोती त्यावर शोभून दिसतात आणि मांगल्याचा डाळिंबी खडा त्यावर चार चाँद लावतो. तर मैत्रिणींनो, अशी ही देखणी मोत्याची कुडी स्त्रियांच्या कानात मिरवायची, त्यांचे कर्णभूषण व्हायची. अशीच आईची कुडी आहेत. तिने आठवण म्हणून मला दिलीयेत. या कुड्यांना पाठीमागे सोन्याची नळी आहे. आमच्या कानाचे काप म्हणजे छिद्रे बारीक, त्यामुळे कानात घालायला अडचण अन् त्रास. पण छे, आईची आठवण आहे ना, म्हणून तेल लावून, क्रीम लावून, कानाच्या पाळीतून रक्त आले तरी, तो कार्यक्रम एकदाचा पार पडला. कान दोन-तीन दिवस चांगलेच दुखले. जड झाले, पण हळूहळू सवय झाली आणि त्या जड कुड्यांसोबत एक जाणीव झाली. जड असलेल्या कुड्यांनी कोणत्याही गोष्टीला सारखी मान हलवायची नाही, प्रत्येक गोष्टीला मान डोलवायची नाही, योग्य निर्णय, योग्य वेळी, आपली क्षमता आहे याची खात्री झाल्याशिवाय होकार नाही, हे कळावं म्हणूनच बहुधा आईने कुड्या दिल्या असाव्यात.

आणि महत्त्वाचं म्हणजे, प्रपंचात हलक्या कानाची राहू नकोस, कानावर पडलेलं सगळंच खरं असतं नाही, असंही या कुड्यांसोबत आईला सुचवायचं असावं. खऱ्याखोट्याची शहानिशा करता यावी, अडचणीत असलेल्यांचा, संकटात असलेल्यांचा आवाज कानापर्यंत पोहोचावा, ईश्वराचे नामस्मरण कानात साठवावे आणि देहाची ही कुडीदेखील एके दिवशी जमिनीवर पडणार आहे, याचे स्मरण असावे.
या कानमंत्रासाठीच आईने लेकीला कुड्या दिल्या असाव्यात.
नीला इनामदार, नाशिक
बातम्या आणखी आहेत...