आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्ट ब्लेअर: आनंदनिधान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंदमान म्हटले की, सुरुवात होते ती पोर्ट ब्लेअरपासून. पोर्ट ब्लेअर या बेटाला हे नाव का पडलं ? १७८९मध्ये लेफ्टनंट आर्चिबाल्ड ब्लेअर यांनी सर्वप्रथम येथे वसाहत निर्माण केली, त्यामुळे या शहराला पोर्ट ब्लेअर असे नाव दिले गेले. अंदमानच्या इतिहासाबद्दल माहिती देणारी संग्रहालये, जैविक विविधतेबद्दल माहिती देणारे पार्क्स, सागरी खेळांचा आनंद देणारे वॉटर स्पोर्ट‌्स कॉम्प्लेक्स आणि खूप काही जपलेले आहे, पोर्ट ब्लेअरने...

वीर सावरकर एअरपोर्ट : पोर्ट ब्लेअर शहरापासून साधारणपणे दोन किमी अंतरावर अंदमानमधील वीर सावरकर एअरपोर्ट हे मुख्य एअरपोर्ट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून या विमानतळाला हे नाव दिले गेले. भारतीय नौदल आणि नौदलाशी निगडित हवाई कारवाई करण्यासाठी INS Utkrosh याच विमानतळाचा वापर करते. अनेकदा आपल्याला या दोन्ही दलांच्या हवाई कसरतीदेखील येथे बघायला मिळतात.

अॅन्थ्रोपॉलॉजिकल म्युझियम : १९७५-७६मध्ये सुरू झालेले हे म्युझियम अंदमानमधील मानववंशशास्त्राशी निगडित परिघातली माहिती देते. अंदमानमधील चार निग्रेटोज आदिवासी जमाती, जारावाज, सेंटिनलीज, ग्रेट अंदमानीज आणि ओंगेस यांच्याबद्दल तसेच दाेन मंगोलाइड्स म्हणजे निकोबारीज आणि शोम्पेंस यांविषयी अतिशय सविस्तर माहिती आपल्याला येथे मिळते. प्राचीन संस्कृतींचा अभ्यास करणाऱ्यांना हे म्युझियम अभ्यासपूर्ण माहिती देते.

समुद्रिका (नौदलाचे मरीन म्युझियम ) : पोर्ट ब्लेअरमधील भारतीय नौदलाने चालवलेले हे पहिले म्युझियम आहे. या म्युझियमचा हेतूच मुळी सागरी जीवनाविषयी, रंगीबेरंगी माशांच्या, इतर जीवजंतूंच्या जीवनचक्राविषयी माहिती देणे आणि अशा दुर्मीळ प्रजातींचे रक्षण करण्यासाठी जागरुकता निर्माण करणे, हा आहे.

झूऑलॉजिकल म्युझियम व फिशरीज म्युझियम : पोर्ट ब्लेअरमधील झूऑलॉजिकल म्युझियममध्ये वेगवेगळे स्पॉन्जेस, कोरल्स, फुलपाखरे व गोम आहेत. राजीव गांधी वॉटर स्पोर्ट‌्स कॉम्प्लेक्सपासून जवळच फिशरीज म्युझियम आहे. यात बंगालच्या उपसागरात सापडणारे विविध प्रजातींचे समुद्री जीव बघायला मिळतात. ३५० जातींच्या दुर्मीळ सागरी प्रजाती येथे आहेत.

वॉटर स्पोर्ट‌्स कॉम्प्लेक्स : भारतामध्ये जलक्रीडा या खेळ प्रकारात असलेले सेफ वॉटर स्पोर्ट‌्स आणि अॅडव्हेन्चर वॉटर स्पोर्ट‌्स ह्या दोन्ही प्रकारचे खेळ एकाच ठिकाणी असणारे एकमेव ठिकाण म्हणजे, वॉटर स्पोर्ट‌्स कॉम्प्लेक्स. या कॉम्प्लेक्समध्ये एक कृत्रिम धबधबादेखील तयार करण्यात आलेला आहे. अजून एक आकर्षित करणारी बाब म्हणजे, येथून पर्यटक बोट घेऊन जवळच असलेल्या रॉस आयलंडवरदेखील जाऊ शकतात. १९५९मध्ये ब्रिटिश आणि अंदमानी आदिवासी जमातीमध्ये झालेल्या अबीरदिन संग्रामच्या स्मरणार्थ जवळच असलेल्या मरिना पार्क येथे एक स्मारकदेखील बांधलेले आहे. मरिना पार्क, चिल्ड्रन्स पार्क हे बघण्यासारखे आहेत. मरिना पार्क येथे सुनामी स्मारकदेखील बांधण्यात आलेले आहे. येथे सामुद्रिक जैवविविधता, समुद्रातील पर्यावरण व त्याचं समुद्री जिवांनी राखलेलं संतुलन यावर सर्व माहिती दिली जाते.
सायन्स सेंटर : २००३मध्ये सुरू झालेले गुड विल इस्टेटमधील सायन्स सेंटर हे एक सुंदर म्युझिअम विद्यार्थ्यांसाठी हसतखेळत शिकण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. काही काही डिस्प्लेमध्ये तर वातावरणातील बदलांबरोबर माशांच्या वागणुकीत होणारा बदल याविषयीची माहिती दर्शविलेली आहे. येथील द्वीपसमूहांपैकी प्रत्येक द्वीप कोठे आहे, त्या जागादेखील येथे मोझाईकद्वारे आपल्याला दाखवलेल्या आहेत. दर महिन्यात येथे टेलिस्कोप शोजदेखील होतात.

घंटा घर : आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी या क्लॉक टॉवरवर चार टाइम झोन असलेली चार घड्याळे बसवलेली आहेत. ही घड्याळे नक्की कोणत्या जागेची वेळ दर्शवितात, हे कोणाला माहीत नाही.

महात्मा गांधी नॅशनल मरिन पार्क : पोर्ट ब्लेअरपासून २९ किमी अंतरावरील हे पार्क वेगवेगळ्या खाड्या, लहानमोठी अशी १५ बेटे यापासून तयार झालेला आहे. येथे आपण स्नोर्कलिंग, स्कुबा आणि काचेचा तळ असलेल्या बोटीतून कोरल्स बघण्याचा आनंद लुटू शकतो.

आबरदिन बाजार : पोर्ट ब्लेअरमधील सर्वात महत्त्वाचे खरेदीचे ठिकाण म्हणजे, आबरदिन बाजार. १९५९मध्ये ब्रिटिश आणि अंदमानी आदिवासी जमातीमध्ये झालेला आबरदिन संग्राम इथलाच. आता येथे मोठे मार्केट आहे. या आबरदिन बाजारमध्ये जाऊन मस्त फिरावं, नवीन वस्तू बघाव्यात, तेथील खास खाद्यपदार्थ चाखत चाखत आवडलेल्या वस्तूसाठी घासाघीस करावी आणि त्या वस्तू घेऊन याव्यात आणि चिरस्मरणीय आठवणीदेखील सोबत न्याव्यात...
(nileshg.21@gmail.com)