आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या संसारी मज काय उणे?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई-बाबांच्या भरपूर लाडात आणि जरा धाकात वाढलेली लेक दिवसागणिक मोठी होऊ लागते आणि त्यांच्याही नकळत त्यांची बाहुली लग्नमंडपी चढते. उराशी असंख्य स्वप्नं आणि संसाराचे सुखचित्र रेखाटणाऱ्या मुलींमध्ये मीदेखील अपवाद नव्हतेच. जोडीदार अनोळखी नव्हताच आणि आमचं प्रेम घरच्यांनी इतक्या आनंदाने स्वीकारलं की, भावी संसाराची स्वप्ने मनात रेंगाळू लागली.

लग्न ठरल्यापासूनच नाती परमेश्वर खूप विचारपूर्वक विणतो, याची पदोपदी जाणीव झाली. अगदी सासूसासऱ्यांच्या पहिल्या भेटीपासूनच आमच्या नात्याची वीण अधिकच घट्ट झाली. सासर आणि माहेर यातलं अंतर केवळ जुनं आणि नवं घर इतकंच उरलं. जुन्या घराशी आपली नाळ खूप घट्ट असते आणि नवं घर आपलं स्वप्न असतं, अस्तित्व असतं, जिथे आपण रमतो, घडतो, परिपक्व होतो आणि कधी या घराचे होऊन जातो कळतच नाही. आमच्या दोन कुटुंबांची ओळख आणि लग्न हा वर्षभराचा काळ आम्हाला खूप जवळ घेऊन आला. एकमेकांच्या आवडी-निवडी, विचार समजले. म्हणतात ना, एकमेकांबद्दल मनापासून प्रेम, स्नेह आणि विश्वास निर्माण झाला की, छोटे छोटे आनंदाचे क्षणसुद्धा अविस्मरणीय सोहळे होऊन जातात. पाचच महिन्यांपूर्वी मी लग्न करून या घरी आले. जोशींची लेक, गोसावींची सून झाले. आधीपासूनची ओळख असली तरी, लग्नानंतर थोडा फरक पडतोच. घर नवं, जबाबदाऱ्या नव्या. पण नवरा आणि घरची माणसे मात्र नवीन नव्हती. तरी परीक्षेची थोडी भीती मनात होतीच. सासरी सगळं जमेल ना? सगळे समजून घेतील ना? हे मनात डोकावलेले प्रश्न माझ्या सासरच्या लोकांनी कुठल्या कुठे पळवून लावले. मी केलेल्या साध्या पोह्यांचं बाबांनी तोंडभरून केलेलं कौतुक असो, की ‘मस्त झालाय हा चहा’ म्हणून आईंची पाठीवर पडणारी शाबासकीची थाप. नवख्या वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या नववधूला आणखी काय हवं? लग्नाआधी सीएच्या अभ्यासामुळे स्वयंपाक व इतर कधी न केलेल्या गोष्टीही हळूहळू जमू लागल्या, अंगवळणी पडू लागल्या. आईंनी तर अगदी मुलीसारख्या काही गोष्टी शिकवल्या, समजून घेतल्या. आणि मी माझ्या घरात कधी रुळले कळलेच नाही.

अनिरुद्ध, माझा नवरा, मर्चंट नेव्हीमध्ये ऑफिसर. अर्थातच आमच्याइतकंच त्याचं घट्ट नातं सागराशी! सुट्टी संपली आणि लग्नानंतर दोनच महिन्यांत अनि रुजू झाला. इतक्या दिवसांचा सहवास क्षणात लाखो मैलांचं अंतर देऊन गेला. लग्नाळलेलं आयुष्य नुकतंच वळण घेत होतं, त्यातच रोजचं भेटणं काय फोन, मेसेज, व्हॉट्सअॅप सगळंच ठप्प झालं. हे होणार माहीत होतं, पण मन पक्कं होत नव्हतं. रोजच्या आठवणी, रडू येणं सुरू झालं. दूर जाण्याने माणसाची किंमत नव्याने कळू लागते... दूरच्याही आणि जवळच्याही. आईंसमोर अनिच्या आठवणीने मनमोकळ रडताना आमच्यातलं सासू-सुनेचं नातं कुठेच जाणवत नाही. अनिचा फोन नाही, 
 
ई-मेल नाही, या सगळ्या गोष्टी आईबाबांना मी सहज सांगते आणि तेही न कंटाळता मी शांत होईपर्यंत मला समजावतात. इतकी वर्षे प्रेमाने वाढवलेला आपला मुलगा इतक्या लांब पाठवताना आई-बापाचं काळीजही तुटत असणारच. पण तरी मला समजून घेऊन समजावणं त्यांनाच जमतं.

माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांचा पाठिंबा आणि विश्वास मला पुढे जाण्याचं बळ देतो. सकाळच्या पहिल्या चहासोबत रंगणारा गप्पांचा फड मनावर दिवसभरासाठी प्रसन्नतेचा शिडकावा करून जातो. एखादी गोष्ट जमत नसली तरी ती शिकवताना ते माझे आईवडीलच होतात. अर्थकारणाविषयी गप्पा सुरू असताना बाबा मध्येच, ‘काय सीए, बरोबर आहे ना?’ म्हणून विचारतात, तर बरं नसताना हातात चहा, नाष्टा, जेवण देण्याइतकी काळजी आई करतात.
आईबाबांची विचारांची बैठक, समजूतदारपणा, प्रेम इतकं अफाट आहे, की मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. लहान बहिणीसारखी प्रेमळ नणंद व वात्सल्याने भरलेली आई-बाबांसारखी माणसं पाहिली की आपण त्यांच्या आशीर्वादात किती सुखी आहोत, हे जाणवतं. त्यांचा हाच सपोर्ट आणि प्रेम अनिरुद्ध इथे नसतानाही मला खंबीर राहायचं बळ देतो.

लग्नानंतर मुलीच्या आईबाबांच्या डोळ्यात दिसणारी लेकीची काळजी मला माझ्या आईबाबांच्या डोळ्यात दिसत नाही. दिसतं ते समाधान!

माझं सासर म्हणजे जणू कवयित्री शांता शेळकेंच्या कवितेतलं सासर आहे...

‘सुख भरून सांडते घरिदारी, 
मज काय उणे या संसारी...
गंगेहून मन निर्मळ प्रेमळ, 
सासू नच ही माता केवळ..
जशी वाऱ्याची झुळूक अनावर, 
नणंद तैशी गोड, खेळकर...
पूर्वपुण्य मम ये साकारून, 
ही जोड मिळावी जन्मभरी,
मज काय उणे या संसारी...?

अजून आम्हाला खूप शिकायचंय, घडायचंय. पण अशी माणसं सोबत असल्यावर, रोजचंच आयुष्य नवं आहे, सुंदर आहे, खास आहे... हो ना?
 
नेहा गोसावी, नाशिक