आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nest Of Bird Megapod Gives Idea Of Coopreative Living

तूने तिनका तिनका चुनकर...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

को-ऑपरेटिव्ह म्हणजे सहनिवासाचं श्रेयदेखील माणसाला जात नाही. त्याचा एक आगळा नमुना. आफ्रिकेतल्या पक्ष्यांविषयी वाचत होतो. आफ्रिकेतील काही पक्षी आपली घरटी अगदी खेटून खेटून बांधतात. शेकडो घरटी एकत्रित असतात. हिवाळ्यात तीन-चार पक्ष्यांचा गट एखाद्या मध्यवर्ती घरट्यात एकमेकांच्या उबेत अगदी खेटून बसतात. (अंटार्क्टिक हिवाळ्यातील एंपरर पेंग्विनची आठवण येते.)


आफ्रिकाच काय, आपल्या निकोबार किनार्‍यावर मेगॅपोड पक्षी सामायिक घरबांधणीचा नमुना पेश करतात. मेगॅपोडचं मेगॅनेस्ट (मेगॅ शब्दाबरोबर आपल्या तोंडातून तोंडात मारल्यासारखा शब्द बाहेर येतो, ब्लॉक. ज्याची त्याची जिंदगानी बाबांनो.). हे मेगॅ घरटं चांगलंच मोठं, म्हणजे साधारणपणे 1-1.5 मी. उंचीचं आणि 10 मी. व्यासाचं असं विशाल असतं. ही रचना साकारताना कित्येक पक्ष्यांचे कित्येक दिवस काटक्या, पानं, गवत, जमा करण्यास्तव खर्ची पडतात. जुन्या ‘भाभी’ चित्रपटातील एक गीत आठवतं, ‘तूने तिनका तिनका चुनकर नगरी एक बसायी’. मेगॅनेस्टच्या रचनेवर आधारित पर्यटकांसाठी गोलाकार सिमेंट विश्रामगृहं निकोबार भागात बांधण्यात आली आहेत. परंतु ही सामायिक गृहरचना नव्हे. केवळ एकाच युगुलांपुरतं (त्यांच्या हनीमून, गुलुगुलू, इ. इ. प्रित्यर्थ) हे घरटं.
हीच संकल्पना काही आदिवासी जमातींनी आत्मसात केली असावी. मलेशियाच्या सारावाकमधील आदिवासींची सामायिक घररचना. एक लांबलचक मोठी वसाहत असते. हेच त्यांचं सामूहिक घर (सहनिवासाचा एवढा उत्तम नमुना इतरत्र मिळणं दुरपास्तच). एका छताखाली सारी वसाहत. बंदिस्त पडवीसारखं लांबलचक घर. त्यावर छत. पडवीच्या आतल्या बाजूला खोल्या. खोली ही प्रत्येकाची खासगी जागा. सारावाक हा विषुववृत्ताला लागून असलेला प्रदेश. आर्द्र उष्ण हवामान. चार भिंतींआडचा रहिवास त्रासाचा. वसाहतीतील सार्‍यांची दिवसभराची कामं पडवीच्या छायेतच. तिथंच गप्पाटप्पा आणि सुखदु:खाच्या गोष्टी. फक्त खासगी बाब आत खोलीत. प्रायव्हसी आणि सहजीवन यांचा सुरेख मिलाफ. कदाचित याचं साम्य मुंबईतील चाळींशी जुळू शकतं. चाळीत सामूहिक असते ती गॅलरी, अरुंद जाण्यायेण्याचा रस्ता. सारावाकची पडवी आतल्या खोलीपेक्षाही रुंद असते. बाहेर तेवढंच रुंद उघडं फलाटासारखं बांधकाम असतं, तो जाण्या-येण्याचा रस्ता असतो, पोरांना धिंगाणा घालण्याची जागा असते. सारा प्रदेश डोंगराळ. त्या उताराप्रमाणं बांधकाम. लाकडाची मुबलकता असल्यामुळं सारं बांधकाम लाकडाचं. आम्ही पाहिलं होतं ते वसाहत घर 200 मीटर लांबीचं होतं. तथापि 1-2 किमी. लांबीचीही अशी घरं असतात, हे समजलं.


काही विरोधाभास, काही साम्यस्थळं हा तर निरीक्षणाचा, अभ्यासाचा विषय. सुरुवात माणसाच्या आद्य गृहरचनेपासून होते. या गवताच्याच होत्या. त्या काळी दूरवरून बांधकाम सामग्री आयात करणं माणसालाही शक्य नव्हतं. वाळलेलं गवत ही बांधकाम सामग्री. वादळ, पाऊस यापासून वाळलेलं गवत सुरक्षा काय देणार? हा प्रश्न पडूही शकतो. फार दूर जायला नको. मुंबई आसपासच्या मिठागरांना भेट द्यावी. पावसाळ्याच्या सुरुवातीला मिठाचे ढीग वाळलेल्या गवतांनी शाकारले जातात, झाकले जातात. भन्नाट पाऊस होतो, वार्‍यांचा माराही जोरकस असतो. परंतु गवताखाली झाकलेल्या मिठाच्या कणालाही धक्का पोहोचत नाही. एरवी साध्या वातावरणीय आर्द्रतेनेही मीठ विरघळतं.


हे झालं मानवाच्या आद्य घराबाबतीत. तथापि पक्षी आणि माणसाच्या साम्यस्थळांविषयी नामाभिधानापासून आरंभ करावा लागेल. गवळी, लोहार, कुंभार, आपली आडनावं, माणसाचा व्यवसाय प्रतीत करणारी. पक्ष्यांच्यातदेखील शिंपी, सुतार, तांबट आहेत. माणसांत गवई, बनकर, कलांशी निगडितही आडनावं आहेत. पक्ष्यांबाबतीत सुगरण या नावातच कलेची नजाकत प्रतीत होते, तर बुलबुल या उच्चारानेच कायेवर कसे रोमांचकारी तरंग उठतात. घर...घरटं. माणूस...पक्षी. त्यांची इवलीशी दुनिया, त्यांच्या प्रणयाराधना, प्रेमगीतं. गवत, काड्या, पाती, पिसं, कापूस, कोळीष्टकं, पिलासाठी मजबूत आणि आरामदायी साहित्याची जुळवाजुळव करणारी त्यांची शोधक नजर. माणूस तरी वेगळं काय करतो?


मला वाटतं, तृणकुटी ही द्विजगणाकडून आपण उचललेली आद्यरचना. निसर्ग पर्यटन हा आकारू पाहात असलेला नवा व्यवसाय. त्यातली ‘ट्री हाऊस’ ही संकल्पना. झाडावरचे झुले या आपल्या निसर्गरचना. किती तरी पक्ष्यांच्या घरट्यांना झाडाचा आधार असतो. आपली असते तशीच त्यांचीदेखील घरट्याबाबतीत ‘आपली आवड’ असते. रानावनांतून फिरताना काही अर्धवट सोडलेली घरटी आढळून येतील. माणसांबाबतीत कलाकारींनी बद्ध अर्धवट सोडलेल्या गुहा आढळून येतात (त्यांना ‘पांडव गुहा’ असं नामाभिधान आहे. पांडवांनी त्या अर्धवट सोडल्या अशी दंतकथा आहे). गुहा कलाकारी अर्धवट सोडण्याची काही मानवी कारणं आहेत. परंतु पक्ष्यांनी घरटी अर्धवट सोडण्यामागं बर्‍याच वेळा ‘आपली आवड’ हेच कारण असतं. अशी अर्धवट घरटी बुलबुलचीही असू शकतात.