आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैतन्यधारा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रखरखते ऊन. असह्य उकाडा. जिवाची काहिली. निराश मने. पावसाची प्रतीक्षा. अचानक जोराचे वारे वाहू लागतात. पावशा ओरडू लागतो. वळीव टपटप बरसू लागतो. मग पाऊस बाळसे धरतो. बाहेर तो संततधार, तर मनात गाण्यांच्या रूपात. हिंदी चित्रपटातील गाण्यांत पाऊस नेहमी वेगवेगळ्या भूमिकांत दिसतो. पावसाच्या अनेक रूपांनी गीतकारांना भुरळ घातली आहे. त्यांच्या लेखणीतून उतरलेला पाऊस संगीताचे लेणे लेवून आपल्या मनात बरसत राहतो. चित्तवृत्ती प्रसन्न करतो. समाधानाने चिंब भिजवतो.


रुपेरी पडद्यावरच्या प्रेमाला बहर आणणारा नायक म्हणजे पाऊस! ‘बरसात में हमसे मिले तुम...’ हे गाणे आजही पाऊस पडताना ओठावर येते. मग वेगवेगळ्या मूडमध्ये गाण्यातून बरसणारा पाऊस रसिकांना चिंब आनंद देतो. ‘प्यार हुआ इकरार हुआ...’(श्री 420) या गाण्यात पावसाच्या साक्षीने नायक-नायिका यांच्या प्रेमाच्या आणाभाका अधिकच खुलतात. ‘गरजत बरसत सावन आयो रे...’मधला पाऊस रोशन यांच्या संगीताने वातावरण चैतन्यदायी करतो. पावसाच्या नुसत्या जाणिवेने झालेली तिची व त्याची मनोवस्था गीतकार योगेश यांनी ‘मंजिल’मधील एका गाण्यातून नेमकी मांडली आहे. ‘रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ए अगन...’ हे ते गाणे. आर. डी. बर्मन यांच्या संगीताने नटलेले हे गाणे रसिकांच्या मनात नेहमीच रेंगाळते. रिमझिम पावसातली ती पहिली भेट अनेकांना आयुष्यभर साथ देत असते. ‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात, याद आये किसी से वो पहली मुलाकात...’(काला बाजार) किंवा ‘जिंदगीभर नहीं भुलेगी वो...’ (बरसात की रात) या गाण्यांतून पहिली भेट सातत्याने मनात रुंजी घालत असते. ‘एक लडकी भीगी भागी सी...’(चलती का नाम गाडी)मधून तिने किशोरकुमारला कशी भुरळ घातली, ते तुम्ही-आम्ही विसरणे शक्य आहे का?


कधी प्रेम, कधी विरह, कधी ओढ, तर कधी अस्वस्थता, मध्येच आर्जव तर काही वेळाने मार्दव, अशा एक ना अनेक रूपांत पाऊस गाण्यातून बरसत असतो. ‘ओ सजना बरखा बहार आयी...’(परख)मधला पाऊस अनामिक ओढ लावणारा आहे, तसाच तो ‘लगी आज सावन की फिर वो झडी है...’ (चांदनी)मध्ये अस्वस्थ करणारा आहे. ‘सावन बरसे तरसे दिल...’ (दाहक)मध्ये तो त्रासिक आहे, तर ‘रिमझिम रिमझिम, रुणझुण रुणझुण...’ (1942-ए लव्ह स्टोरी)मध्ये हळुवार बरसत हवाहवासा वाटणारा आहे. ‘आज रपट जाए...’ (नमक हलाल)मध्ये त्याचे रूप वेगळे तर ‘टिप टिप बरसा पानी...’ (मोहरा)मधले रूप आणखी भिन्न आहे. ‘सावन का महीना...’(मिलन)मधला पाऊस मनमोराचा पिसारा फुलवणारा असला, तरी ‘छोटी-सी कहानी से...’ (इजाजत)मधला पाऊस अनेक प्रश्न पाडणारा आहे. ‘बादल यूँ गरजता है...’(बेताब)मधला पाऊस तिला घाबरवणारा असला तरी त्याला हवासा आहे. ‘बूंदों से बातों...’(तक्षक)मधला पाऊस संवादक असला तरी ‘सावन के झूले पडे...’(जुर्माना)मधली चिंब आर्तता प्रचंड अस्वस्थ करणारी आहे. ‘कभी नीम नीम...’(युवा) गाण्यातला मधाळ पावसाचा गोडवा काही औरच!


पाऊस असा अनेक गाण्यांतून बरसत असतो. मात्र काही गाण्यांतून तो अधिकच जवळीक साधतो. ‘रिमझिम के ये प्यारे गीत लिए...’ (उसने कहा था) हे लता-तलत यांच्या आवाजातले सलिल चौधरी यांच्या संगीताने नटलेले गाणे असेच आहे. पावसाळा, प्रेम, आनंद आणि उत्साह यांचा सुरेख मिलाफ या गाण्यातून मिळतो. पाऊस आणि भारतीय संस्कृती यांचे नाते अत्यंत जुने. ‘दो बिघा जमीन’मधल्या ‘हरयाला सावन ढोल बजाता आया...’ गाण्यातून या नात्याचे प्रत्यंतर नेमके येते. ‘उमड घुमड कर आयी रे घटा...’ (दो आँखें बारह हाथ)मधून पहिल्या पावसाचा आनंदोत्सव निव्वळ अविस्मरणीय.
तिच्या आणि त्याच्या भावविश्वातला गाण्यातून बरसणारा पाऊस काहीसा वेगळा. ‘अजहून ना आए बलमा, सावन बीता जाए...’(साँज और सवेरा)मधून श्रावण त्याच्याशिवाय जातोय, ही अस्वस्थ करणारी भावना अचूकपणे टिपली आहे. असाच अनुभव देणारे ‘चुपके चुपके’मधले ‘अब के सजन सावन में...’ हे सुंदर गाणे विसरून कसे चालेल. ‘तुम्हे गीतों में डालूंगा...’(सावन को आने दो)मधली प्रफुल्लित भावना प्रत्येकाला मोहिनी घालणारी आहे. ‘भीगी भीगी रातों में...’ (अजनबी) गाण्याला आरडींनी दिलेला मिठास ठेका भर पावसात नाचायला लावतो. ‘जलता है जिया मेरा, भीगी भीगी रातों में...’(जख्मी)मधून अत्यंत रोमँटिक चालीतला पाऊस प्रसन्नतेचा शिडकावा करणारा आहे. शेतकरी असो, लहान मूल असो, प्रौढ असो की वयस्कर, सर्वांना पाऊस आवडतोच. ‘तो’ आणि ‘ती’चा तर प्रश्नच नाही. तसा मान्सूनचा पाऊस लहरी. कधी अवचित भेटीला येणारा तर कधी दडी मारून बसणारा. गाण्यातला पाऊस मात्र हक्काचा. हवे तेव्हा मन चिंब करणारा. चैतन्य देणारा. प्रसन्न करणारा. निखळ आनंदाचा वर्षाव करणारी पाऊसगाणी म्हणूनच पुन:पुन्हा ऐकावीशी वाटतात.