आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळख वाङ्मयीन नियतकालिकांची : कवितेला वाहिलेले त्रैमासिक ‘ऊर्मी’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही कवितेचं देणं लागतो; या निखळ भूमिकेतून कवितेला वाहिलेले ‘ऊर्मी’ हे त्रैमासिक प्रा. जयराम खेडेकर यांनी जालन्यावरून सुरू केले. ते आजतागायत नियमित सुरू आहे.
जानेवारी 2005 ला ऊर्मीचा पहिला अंक प्रकाशित झाला. ऊर्मी कशासाठी ही भूमिका मांडताना संपादक म्हणतात की, शतकापूर्वी परवेच्या काठावर हरवलेल्या नागमणीच्या शोधात आम्ही आहोत. शोधूनही न सापडल्यास शोधू न शकल्याचे तर दु:ख आहेच, पण सकाळपर्यंत पणती न विझू देण्याचा आटापिटा आमचा असतो. अशी काव्यात्मक भूमिका असणारे ऊर्मी हे के वळ कवितेला वाहिलेले मासिक आहे. कवितेव्यतिरिक्त कवितेसंबंधी असलेला मजकूर या मासिकात प्रसिद्ध केला जातो.
पहिल्या अंकाचे प्रकाशन ख्यातनाम कवी ना. धों. महानोर यांनी केले. ‘शब्दकोशातले शब्द जिथे सुंदर करून मिळतात त्याला मी साहित्य समजतो’ आणि असे साहित्य ऊर्मीमध्ये वाचायला मिळेल, असा विश्वास महानोरांनी या वेळी केला. आज मोठ्या प्रमाणावर कविता लिहिली जाते. ग्रामीण भागातील मुलं शिकू लागली. वेगवेगळे साहित्य वाचताना त्यांनाही आपली जाणीव व्यक्त करावीशी वाटली. यातून कवितेसारख्या वाङ्मयप्रकारात वाढ झाली. अशा कवींना ऊर्मीने व्यासपीठ मिळवून दिले. ऊर्मीमध्ये अनेक नवोदित कवींच्या कविता प्रकाशित होत असतात. या मासिकाने प्रादेशिकतेचे बंधन घालून घेतले नाही. त्यामुळे महाराष्टातील अनेक कवींच्या कविता या मासिकातून प्रसिद्ध होत असतात.
केवळ नवोदित कवींच्याच कविता ऊर्मीमध्ये येतात, असे नाही तर ख्यातनाम कवींनीही आपल्या कविता ऊर्मीला दिल्या आहेत. त्यात भालचंद्र नेमाडे, द. ता. भोसले, ना. धों. महानोर, फ. मुं. शिंदे, वसंत आबाजी डहाके, राजन गवस, अनुराधा पाटील, यशवंत मनोहर यांचा समावेश करावा लागेल. कवितेविषयी टिपणं, समीक्षा, परीक्षण आणि परिचय, असा मजकूरही या अंकात आढळतो. कविता आणि क्रियापद, काव्यनिर्मितीच्या निमित्ताने हे द. ता. भोसले आणि कविता कशाला म्हणायचं? हा प्रा. वसंत आबाजी डहाके यांचा लेख या अंकाचे मोल वाढवतात. ऊ र्मीचे कार्यकारी संपादक प्रसिद्ध कवयित्री संजीवनी तडेगावकर आहेत. या मासिकाचे संपादक जयराम खेडेकर यांनी कवितेवरची आपली निष्ठा जपली आहे.