आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवश्रीमंतांच्या विळख्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवश्रीमंतांची आणखी एक खोड म्हणजे सतत दुस-याची श्रीमंती आपल्या तुलनेत किती हे अजमावत राहणे. चौकशा करून अजमावणे एवढेच त्यांना ठाऊक. कारण अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी यांच्या खडाजंगीतून फक्त दारिद्र्यरेषाच बाहेर येते. श्रीमंतरेषा नाही!
नवश्रीमंत म्हणजे नव्याने श्रीमंत झालेले लोक. खरे तर गरीब आणि श्रीमंत या दोनच काय त्या पूर्वापार चालत आलेल्या जमाती आणि पहिल्या वर्गातून वर चढलेला पण अजून पुढच्या इयत्तेत न गेलेला असा तो मध्यमवर्ग. एवढे हे सरळसोट विभाग असताना नवश्रीमंत ही एक वेगळी विभागणी कशाला, असे तुम्हाला वाटणे साहजिक आहे. पण नवश्रीमंतांना वेगळे काढून मी त्यांना बाजूला ठेवलेले नाही, तर तेच स्वत:ला वेगळे समजून दुसंना बाजूला ठेवतात! इतकेच नव्हे, तर कर्मधर्मसंयोगाने आपण कधी त्यांच्या कळपात गेलोच तर आपल्याला ते तुम्ही इथे कसे, या प्रश्नाने भंडावून सोडतात! याचे मला नुकतेच प्रत्यंतर आले.
एका प्रतिष्ठित क्लबच्या सभासदांच्या मुलीचे लग्न होते. आपल्या घरातले लग्न असेल तर शालू, पैठण्या नेसायच्या, एरवी फार भपक्याची साडी नेसायची नाही अशा पठडीतली मी, तिथे आलेल्या सगळ्या जणी हिचे दागिने आणि पैठण्यांत वावरताना बघून खरोखरच यजमान मंडळी कोणती या संभ्रमात पडले. कारण मी फक्त वधूलाच ओळखत होते. एवढ्यात तिथे एक शाळेतल्या जुन्या ओळखीची मुलगी (आता बाई!) भेटली. जवळजवळ तीन दशकांनंतर भेटल्यावर (तेही मी ओळख दिल्यानंतर) आनंद होण्याऐवजी तिला आश्चर्य वाटून ती म्हणाली, ‘तू इथे कशी?’ ‘तू जशी इथे तशीच मीदेखील’ मी म्हटले, पण बाईसाहेबांचे तेवढ्यावर समाधान झाले असते तर त्या नवश्रीमंत कसल्या? तिने खोदून खोदून पुढच्या चौकशा चालूच ठेवल्या. मी मुलाकडून आले की मुलीकडून? वगैरे. मीही कसलाच थांगपत्ता लागू न देण्याच्या इरेला पेटले होते. ‘दोन्हीकडून’ असे मी सांगितले.
‘मग तुझा इथला रोल काय?’ तिचा पुढचा प्रश्न. ‘अक्षता टाकण्याचा’ मी सांगितले. अक्षता टाकत असतानाच ध्वनिक्षेपकावरून ‘ज्यांना जेवायचे असेल त्यांनी जेवून घ्यावे’ अशी घोषणा (व लगोलग त्याच्या इंग्रजी शब्दश: भाषांतराचीही!) झाली. जेवणाच्या त्या अशा आमंत्रणाने माझी भूकच गेली! वधूचे अभिनंदन करून मी तडक घरी निघाले. पुन्हा आमच्या या बालमैत्रिणीने हटकलेच. ‘का ग, खरोखरच नुसती अक्षता टाकून परत चाललीस?’ एवढ्यावरच भागले नाही. तिची जिज्ञासा मी पूर्ण करू न दिल्यामुळे तीही इरेला पेटली असावी की त्यांच्या कळपात माझा शिरकाव कसा? तिने रात्री आम्हा दोघींना ओळखणा एका बार्इंना मला फोन करायला लावला. मी कोणाची आमंत्रित म्हणून गेले होते हे त्यांनी विचारताच मला हसावे की रडावे हे समजेना. नवश्रीमंतांची आणखी एक खोड म्हणजे सतत दुसची श्रीमंती आपल्या तुलनेत किती हे अजमावत राहणे. चौकशा करून अजमावणे एवढेच त्यांना ठाऊक. कारण अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी यांच्या खडाजंगीतून फक्त दारिद्र्यरेषाच बाहेर येते. श्रीमंतरेषा नाही! एरवी आपण किती श्रीमंत आहोत याच्या बढाया मारणारे हे नवश्रीमंत हे श्रीमंतरेषेच्या आसपासही आपण नाही असे ठासून सांगतील हो, नाही तर उगीच आयकर खात्याची ब्याद हात धुऊन मागे लागायची! नवश्रीमंतांच्या मुलांना तर नवश्रीमंतीची लागण बोलायला येऊ लागताच होते. तू आमच्या घरी का आलीस? तू कोणत्या गाडीतून आलीस? हे प्रश्न मला साडेतीन-चार वर्षांच्या मुलांनी विचारले आहेत! पण त्यांच्या आयांनी काही घरी आलेल्यांना असे प्रश्न विचारू नयेत, अशी त्यांना समज दिली नाही. मुले शाळेत गेल्यावर सर असे म्हणाले, सर तसे म्हणाले, मॅचमध्ये काय झाले वगैरे बोलताना दिसली तर ती सामान्य मुले. पण आम्ही रोज आइस्क्रीम खातो, तुमचे घर किती बेडरूमचे आहे, आमच्या घरी प्रत्येक खोलीत एक टीव्ही आहे, अशा गप्पा मारणा मुलांना त्यांच्या आयांकडून हे नवश्रीमंतीचे बाळकडू मिळाले आहे हे नि:संशय. कारण त्या आमची दुसरी गाडी दुरुस्तीला गेली आहे, आमच्या सेकंड होममध्ये यंदा जायला जमले नाही, अशा गप्पांचे रिंगण घालताना त्यांची मुलेही त्या रिंगणात अडकल्याशिवाय राहत नाहीत. ‘तुमच्या घरी प्रत्येक खोलीत टीव्ही कशाला हवा?’ मी न राहवून एका मुलाला विचारलेच.
‘माझे आणि आजोबांचे टीव्ही बघण्यावरून सारखे भांडण व्हायला लागले. मला पोगो बघायचे असते तेव्हा त्यांना बातम्या बघायच्या असतात. म्हणून बाबांनी त्यांना एक स्पेशल लहान टीव्ही आणला. शेजारच्या आण्टीकडे नवा एलसीडी आणला तेव्हा आईनेही हट्ट केला. आपल्याकडेही तसाच हवा म्हणून. सीरियल बघायची का ‘खाना खजाना’ बघायचा यावरून आई-बाबांचेही भांडण झाले. मग आईनेही स्वत:साठी किचनमध्ये एक लहान टीव्ही आणला. आता फक्त आमच्या डॉगीसाठी स्पेशल टीव्ही आणायचा राहिला आहे.’ त्याने प्रत्येक खोलीच्या टीव्हीमागचे रामायण सांगितले. सगळ्या नवश्रीमंतांची एक सुप्त इच्छा असते, गर्भश्रीमंत होण्याची. निदान आपण तसे दिसावे तरी, असे त्यांना मनोमन वाटत असते. पण तसे दिसायचे म्हणजे नेमके कसे, हे कोडे मात्र कधीच न उलगडणारे. कारण यातली मेख अशी आहे की, खरे गर्भश्रीमंत आपला श्रीमंतीचा कधी तोराच काय पण थांगपत्ताही लागू देत नाहीत. काही वर्षांपूर्वी माझा एक मित्र मोटारसायकल विकत घ्यायला गेला. स्वत: मोटारींच्या कारखान्यात काम करणारा इंजिनिअर असल्यामुळे आपल्याला वाहनांमधले सगळे काही कळते याची त्याला ऐट होती. त्यात क्रेडिट कार्डाची श्रीमंती! विक्रेत्यासमोर आपले अभियांत्रिकी ज्ञान पाजळून त्याने किमतीवर घासाघीस सुरू केली. एवढ्यात पागोटे घातलेला एक खेडूत आला. त्याने मोटारसायकलची किंमत विचारून क्षणार्धात पागोट्याखाली ठेवलेली नोटांची चळत त्या विक्रेत्यासमोर ठेवली आणि माझ्या मित्राच्या मनात भरलेल्या त्या मोटारसायकलवर स्वार होऊन तो निघूनही गेला! मित्राचा आपल्या नवश्रीमंतीचा भ्रम क्षणार्धात उतरला. नवश्रीमंतांची श्रीमंती नुसती बोलण्यापुरती. दुसचा पाहुणचार करताना त्यांची श्रीमंती गायब होते. मग साधे सरबत देताना साखर किती महाग झाली आहे, हे ऐकवत ते सरबताचा पेला पुढे करतात! मध्यमवर्गाचा उंबरठा ओलांडून नवश्रीमंत होण्यात गैर काहीच नाही. पण पैशाने नवश्रीमंत होता होता मनाची गरिबी मात्र हटता हटत नाही, याचे मला खरे वैषम्य वाटते.