आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकांचे अाजार आणि आयुर्वेद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी ही पूर्वीपासूनच एक मोठी समस्या आहे. एकूणच वैद्यकशास्त्राने यावर सविस्तर विचार केलेला आहे. अगदी आयुर्वेद काळापासून या विषयाचा वेगळा विचार करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे बालरोग ही आधुनिक वैद्यकाची स्वतंत्र शाखा आज अस्तित्वात आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदानेही एक स्वतंत्र शाखा म्हणून या बालरोगांचा विचार केलेला आहे.
 
 
आयुर्वेदाच्या ज्या आठ विविध शाखा आहेत. त्यामध्ये बालरोग ही एक स्वतंत्र शाखा आहे. इतर शाखांमध्ये शल्यचिकित्सा (Surgery) कायचिकित्सा (medicine) आदींचा समावेश आहे.काश्यपसंहिता नावाचा एक स्वतंत्र ग्रंथ आयुर्वेदशास्त्रात आहे. 
 
या ग्रंथामध्ये विविध बालरोगांचे सविस्तर वर्णन आहे. या बालरोगांची सोडवणूक आयुर्वेद पद्धतीने करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन या लेखात केलेले आहे. यामध्ये बालकांना रोग होऊ नयेत, ते स्वस्थ राहावेत यासाठी कोणती काळजी घ्यावी यासासंबंधीचाही विचार केलेला आहे.  या बालरोगांचा विचार करणाऱ्या शाखेला कौमारभृत्यतंत्र अशी संज्ञा आयुर्वेदात दिलेली आहे.
 
 
अगदी गर्भाशयामध्ये असल्यापासून ते बालवय (१६ वर्षे) संपेपर्यंत बालकांची कशाप्रकारे काळजी घ्यावी याचा नीट विचार आयुर्वेदीय संहितांनी केलेला आहे. अगदी लहानवयात त्यांना होणाऱ्या व्याधी हे मातेच्या दुधामुळे होऊ शकतात. यामध्ये अतिसार हा मुख्य रोग होय. यामध्ये मातेला दुधातील दोष दूर करण्यासाठी चिकित्सा दिली जाते.  दात येण्याच्या वेळी होणारे विविध त्रास ही बालकांमधील हमखास दिसणारी तक्रार होय. 
 
या तक्रारींना आयुर्वेदाने दंतोद्भभजवन्य रोग अशी संज्ञा दिली आहे. यामध्ये ज्वर (ताप येणे) अतिसार, खोकला, उलटी होणे, सर्दी होणे, डोळे येणे, डोकेदुखी अशा तक्रारी विशेषकरून आढळतात. अशाप्रकारचे व्याधी होऊ नयेत म्हणून दात येण्याच्या सुमारास लहान बालकांना प्रीनन मोदक नावाचे एक औषध सांगितले आहे.
 
यामध्ये चारोळी, ज्येष्ठमध, साळीच्या लाह्यांचे पीठ आणि खडीसाखर हे एकत्र करून त्याचे लाडू बनवून ते बालकांना द्यावेत म्हणजे दंतोद्भभवजन्य विकारांपासून बालक दूर राहते. या लाडूमुळे बालकांचे बलही वाढते आणि व्याधीला तोंड द्यायला त्याचे शरीर सज्ज होते. याखेरीज देवदार, गजपिंपळी, हळद, रिंगणी, डोरली अशी वनस्पतीजन्य औषधे तसेच अतिविशादी चूर्ण अशी काही औषधे या बालविकारांवर दिली जातात.
 
बालकांमध्ये नेहमी आढळून येणारी एक तक्रार म्हणजे मलावरोध होय. या तक्रारीवर काय करावे? असा प्रश्न पालकांना नेहमी पडतो. साधारणपणे दीड-दोन वर्षांच्या बालकांमध्ये ही तक्रार खूप आढळते. काहींना तर दोन-दोन दिवस मलप्रवृत्ती होत नाही, झाली तर अतिशय घट्ट स्वरूपात होते. 
 
अशावेळी बालकाच्या आहाराचा विचार करावा लागतो. हल्ली लहान बालकांनाही आईस्क्रीम, फ्रीजचे पाणी आदी अतिथंड वस्तू देण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचबरोबर ब्रेडसारखे काही पदार्थ, दुधाएेवजी चहा-कॉफी देणे या काही कारणांमुळे बालकाचा कोठा रूक्ष (कोरडा) होतो आणि मलावरोधाची तक्रार निर्माण होते. यावर त्रिफळा चूर्ण वैद्यकीय सल्ल्याने योग्य प्रमाणात देत राहिल्यास उपयोग चांगला होतो. 
 
दुधाचे योग्य प्रमाण, पाणी पिण्याचे योग्य प्रमाण असणे ही दक्षताही यासंदर्भात घ्यावी लागते. पोट डब्ब होणे अशीही एक तक्रार लहान बालकांमध्ये आढळते. अपचनामुळे हा त्रास होतो. पोटातील गॅसेस निर्माण होऊन बालक अस्वस्थ होते. कधी कधी त्यामुळे पोटदुखी निर्माण होते. याप्रसंगी हिंग, जिरे, ओवा, सुंठ, मिरे, पिंपळी सैंधव असे मिश्रण योग्य प्रमाणात वैद्यकीय सल्ल्याने देता येते. पोटाला वरून तेल लावल्यास फायदा होतो. तीव्र स्वरूपात अतिसार जुलाब हाही बालकांमध्ये साधारपणपणे मोठ्या प्रमाणात आढळणारा रोग आहे.  
 
यामध्ये साखर, मीठ, पाणी हे मिश्रण उपयोगी पडतेच, तसेच संजीवनी घुुटी, कुटजघनवटी अशा काही औषधांचाही जुलाब थांबविण्यासाठी उपयोग होतो. दूध, पाणी हे दूषित नाहीत याची खात्री करून घ्यावी लागते. दूध हे शक्यतो गाईचे द्यावे. (जे मातेच्या दुधावरच असतील त्यांना बाहेरचे दूध आवश्यक नसल्यास देऊ नये.) गाईचे दूध हे म्हशीच्या दुधाच्या तुलनेने पचायला हलके असते. खोकल्याचा त्रास हादेखील बऱ्याचवेळा बालकांमध्ये आढळतो.यावरही सुंठ, पिंपळी, मिरे, पुष्करमुळ, काकडशिंगी अशी वनस्पतीजन्य औषधी चूर्ण स्वरूपात मधातून देणे प्रशस्त होते.
 
 (अर्थात वैद्यकीय सल्ल्याने).कृमी हादेखील व्याधी बालकांमध्ये आढळतो. त्यावर वावडिंग हे एक उत्तम औषध आहे. दुधामध्ये वावडिंग उकळून ते दूध पिण्यास दिल्यास त्याचा फायदा होतो. विडांगारिष्ट, कृमिकुठार अशा काही औषधांचाही यामध्ये फायदा होतो.
 
अन्न खायला सुरुवात केली आहे अशा बालकांमध्ये कृमींचे प्रमाण आढळल्यास चाॅकलेट किंवा इतर गोड पदार्थ खाण्यात आहेत का? याचे परीक्षण करावे लागते.  लहान मुलांमध्ये चॉकलेट खाण्याची खूप सवय असते. 
 
मोठ्या प्रमाणात त्याचे केलेले सेवन हे त्यांच्या आरोग्यास नक्की घातक आहे.  एखादा पाहुणा म्हणून एखाद्या घरात जाताना त्या घरातील लहान मुलांसाठी चॉकलेट घेऊन जातो. ही गोष्ट बालकांना चॉकलेटची चटक लावायला कारणीभूत ठरू शकते. त्याचबरोबर अनेक पालकही मुलांना मोठ्या प्रमाणात अशा खाद्यपदार्थांची उपलब्धी करून देत असतात.  आपल्या मुलाला हे घातक आहे. हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. 
 
दात येण्याच्या सुमारास लहान बालकांना प्रीनन मोदक नावाचे एक औषध सांगितले आहे. यामध्ये चारोळी, ज्येष्ठमध, साळीच्या लाह्यांचे पीठ आणि खडीसाखर हे एकत्र करून त्याचे लाडू बनवून ते बालकांना द्यावेत म्हणजे दंतोद्भवजन्य विकारांपासून बालक दूर राहते. या लाडूमुळे बालकांचे बलही वाढते आणि व्याधीला तोंड द्यायला त्याचे शरीर सज्ज होते. याखेरीज देवदार, गजपिंपळी, हळद, रिंगणी, डोरली अशी वनस्पतीजन्य औषधे तसेच अतिविशादी चूर्ण अशी काही औषधे या बालविकारांवर दिली जातात.
बातम्या आणखी आहेत...