आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा साहित्यासाठी युवकांचे संमेलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवलेखक अनेक संमेलनांच्या व्यासपीठापासून दुरावले जातात. अर्थातच आयोजकांचा प्रामाणिक प्रयत्न असतो की सर्वांना संधी मिळावी, मात्र वेळेचं बंधन आयोजकांना कुठेतरी थांबण्यास बांधील असते. परिणामी बहुतांश युवा लेखकांना व्यासपीठाचा स्पर्श न होताच तेथून परतावं लागतं. शिवाय अनेकवेळा युवकांनी हे करावे, ते करू नये, साहित्य क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करा असे उपदेशवजा सल्ले देणारे ज्येष्ठ साहित्यिक, मंडळी व्यासपीठावर पहायला मिळतात. युवकांनी साहित्य क्षेत्रात काहीतरी करावे असे सांगताना युवकांना मात्र व्यासपीठावर कुठेही स्थान दिले जात नाही. अशाच तमाम नवरचनाकारांना, नवोदितांनादेखील राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावं या उद्देशाने विदर्भातील एक प्रमुख नगर असलेल्या अकोला येथे राज्यस्तरीय पहिले युवा मराठी साहित्य संमेलन १५ जानेवारी २०१७ रोजी आयोजित करण्यात आलेले आहे.
या युवा संमेलनाची मूळ संकल्पना युवा गझलकार प्रवीण हटकर यांच्याकडून समोर आली आणि महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध युवा साहित्यिकांनी या संकल्पनेला केवळ दुजोराच दिला नाही तर कार्यतत्परतेने पूर्णत: पाठपुरावादेखील केला. 

सृष्टी बहुउद्देशीय संस्था यांच्या सहकार्य, विद्यमाने हे संमेलन घेण्यात येत आहे. यामध्ये सर्वप्रथम ‘स्वामी विवेकानंद साहित्यनगरी’ असे संमेलन नगरीला नाव देण्यात आले. संमेलनाची सुरुवात स्थानीय लोकमान्य सभागृह येथे उद‌्घाटनीय समारंभापासून होईल. हे युवकांचे साहित्य संमेलन असल्याने चाळीस वर्षे ही वयाची अट बांधील असल्याने प्रमुख वक्त्यांपासून सहभागी रचनाकारांपर्यंत सर्वच चाळीस वर्षांआतील असणार आहेत. उद‌्घाटन समारंभाला प्रसिद्ध युवा मान्यवरांची तथा वक्त्यांची हजेरी असेल. तसेच याप्रसंगी विविध क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा युवक-युवतींना मान्यवरांच्या हस्ते ‘युवा आयकॉन’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  आपल्याच अवतीभोवती वावरणारे पण वेगळे काम करून स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केलेले, इतरांना प्रेरणा देणाऱ्या अशा १० युवक-युवतींना हा त्यांच्या संघर्षाला पुरस्कार दिला जाणार अाहे. संमेलनाच्या दुसऱ्या भागात पुस्तक प्रकाशन सोहळा झाल्यानंतर कविसंमेलन घेण्यात येणार आहे. परिसंवाद हे यातील नंतरचे सत्र असून ‘युवा साहित्य आणि समस्या’ हा परिसंवादातील विषय राहील. त्यानंतर गझल रचनाकार गझल मुशायरामधून स्वरचित गझल सादर करतील आणि अंतिम सत्र समारोपीय 
सत्र असेल.  कौतुक ठरावं असे काही ऐतिहासिक आणि परिवर्तनाची चाहूल दर्शविणारे निर्णय युवा संमेलनाच्या आयोजन समितीकडून घेण्यात आले. त्यातील प्रमुख निर्णय ‘‘मानधनबंदीचा’’ आहे. राज्यामध्ये विविध प्रकारची साहित्य संमेलनं होत राहतात. त्यामध्ये प्रमुख वक्ते आयोजकांकडून (अपवाद वगळता) मोठ्या मानधनाची अपेक्षा बाळगुण असतात. ज्यावेळी मानधन देण्यास आयोजक असमर्थ ठरतात, त्यावेळी प्रमुख, विशेष वक्ते कार्यक्रमाला येण्यास नकार देतात. ही वस्तुस्थिती आहे. कलेच्या संमेलनाला आर्थिकतेची झालर म्हणजे कलेचा बाजार असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. याच मानधन प्रवृत्तीला युवा साहित्य संमेलनाकडून नाकारण्यात आलं ही उल्लेखनीय बाब आहे. या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दुर्गेश सोनार, उद‌्घाटक प्रा. डॉ. संतोष हुशे आणि स्वागताध्यक्ष अॅड. पप्पू मोरवाल राहणार आहेत. यामध्ये एक रुपयादेखील संमेलनाध्यक्षांनी मागितला नाही व आयोजकांनीदेखील दिला नाही. या संमेलनामध्ये कुणालाच मानधन दिले गेले नसल्याची ही बाब ऐतिहासिकच म्हणावी लागेल. त्याचबरोबर संबंधित तज्ज्ञांनी, जानकारांनी या मानधनबंदीचे स्वागत केले आहे. आयोजन समितीचा दुसरा एक निर्णय असा की, राजकीय पाठबळ न घेता व राजकीय वक्त्यांना व्यासपीठावर किंवा संमेलनामध्ये नाममात्रही स्थान न देता संमेलनाला राजकीय वर्तुळापासून दूर ठेवले आहे. आयोजकांकरिता त्रस्त ठरलेल्या परंपरागत मानधन व राजकीयतेला युवावर्गच परिवर्तित करण्याची क्षमता बाळगू शकतो असे समजायला हरकत नाही.....मानधनबंदी असणारं, नवलेखकांना पूर्ण व्यासपीठ देणारं, राजकीय वर्तुळापासून अलिप्त असलेलं हे एकदिवसीय राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन भविष्यातील साहित्य संमेलनाकरिता दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.
 
लेखक हे अकाेला येथील युवा साहित्य संमेलनाचे सल्लागार प्रमुख अाहेत. 
- गिरीश माेखडकर, अकाेला
बातम्या आणखी आहेत...