आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'माणूस बेजार इथेही आणि तिथेही...'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध शायर निदा फाजली यांच्या कवितेत प्रतिमा आणि प्रतीकांनी ज्या पद्धतीने शब्दरूप घेतले आहे, ते अनेकांना साधता आले नाही. फाजलींच्या कवितेत उमटणाऱ्या वेदनेतील सर्वसमावेशकता प्रसिद्ध मराठी कवी लोकनाथ यशवंत यांनी ‘माणूस बेजार इथेही आणि तिथेही...’ या अनुवादित कवितासंग्रहातून मांडली आहे.
प्रसिद्ध शायर निदा फाजली यांची कविता म्हणजे, आयुष्याच्या प्रत्येक परिघातून दु:खाला अन् वेदनेला छेदणारी अनुभूती आहे. त्यांच्या कवितेतील वेदना जगण्याचे संपूर्ण भावविश्व सामावणारी कलाकृती आहे. प्रतिमा आणि प्रतीकांनी ज्या पद्धतीने शब्दरूप घेतले आहे, ते अनेकांना साधता आले नाही. ती मराठीत यापूर्वी वाचनात आली नाही. मात्र, त्यांच्या वेदनेतील सर्वसमावेशकता प्रसिद्ध मराठी कवी लोकनाथ यशवंत यांनी त्यांच्या विराट अनुभवाचे वास्तव ‘माणूस बेजार इथेही आणि तिथेही...’ या अनुवादित कवितासंग्रहातून मांडले आहे. लोकनाथ म्हटले की, अल्पाक्षरी कविता आलीच. पृथ्वीतलावरील मानवी गोंधळ नेमक्या शब्दात त्यांनी टिपला आहे. निदा फाजली आणि लोकनाथ यांच्या कवितेतील ‘इत्तफाक’ एकच आहे. पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस आणि जीव आनंदात आणि सुखाने जगला पाहिजे, हीच दोन्ही कवींची आंतरिक तळमळ आहे. म्हणूनच फाजलींच्या अद्वितीय कालातीत कवितांचा अनुवाद आईच्या मराठी भाषेत केल्याचा लोकनाथ यांना गर्व वाटतोय. कवितासंग्रहातील ‘शर्त’ या पहिल्याच कवितेत
तुम्हाला सैन्यात भर्ती व्हायचं आहे?
जरूर व्हा
मात्र लक्षात असू द्या
युद्धाच्या वेळी तुमचा देश जे म्हणेल तेच सत्य असेल
आणि त्या ‘सत्या’साठी
तुम्हाला तुमच्या जीवाशी खेळावं लागेल
तुमच्या मित्रांची
आणि शत्रूंची यादी राजकारण्यांसोबत बदलत राहील.
युद्ध संपल्यानंतर
तुम्ही अमर शहीदही होऊ शकता
किंवा महामूर्खही!!


‘शहरा माझ्यासोबत चल तू’ या कवितेत फाजली म्हणतात-
शहरा,
माझ्यासोबत चल तू
ओरडणाऱ्या, लढणाऱ्या, झगडणाऱ्या
कर्फ्यू, नारे
यांच्या बाहेर निघ तू
तुझ्या शुष्क डोळ्यांत
भरली आहे रेती
वाटते तू अनेक वर्षांत झोपला नाहीस...

या कवितेतून शहरी संघर्षाचे वास्तव्य टिपलेले दिसून येते. कुठलेही शहर असो, दिवसाच काय रात्रीही आपले कार्य बजावत असते अविरत. रात्रंदिवस एक करणाऱ्या शहरात ओरडण्याचा आणि झगड्याचा कायम कर्फ्यु असतो. स्वत:च्या हक्कासाठी नारे असतात. मात्र, माणूस झोपत नाही. माणसांचं संवेदनशील मन मरतं अन् जागृतही होतं. माणसाच्या शक्तीतील फॉस्फरस भरून गेला आहे आता. त्यामुळे तो कधी रडत नाही अन् दचकतही नाही. त्याला प्रचंड आत्मविश्वास असल्यामुळे मोर्चे, जलसे आणि तमाशा नित्याचेच झाले आहे.
‘आत्महत्या’ या कवितेत ते म्हणतात -
काय खूप माणूस होता तो,
खूपच जोरदार तो म्हणायचा -
आईच्या अंधाऱ्या उदरापासून
तर स्मशानापर्यंत एकच रस्ता आहे
ज्यावर आपण चालत आहोत
चाकावर स्वार होऊन झिजत आहोत
आयुष्यभर गुंतत गेला तो स्वत:च्या आतच आत
प्रत्येक क्षणी नवा प्रश्न आणि जगणं कठीण.
संकुचित विचार करणं त्याला आवडत नव्हतं.

माणूस एकदा जन्माला आला की, त्याच्या मृत्यूच्या प्रवासाला प्रारंभ होतो. मृत्यू हा अटळ असतो. आईच्या अंधाऱ्या उदरापासून स्मशानापर्यंतचा तो रस्ता असतो. आयुष्यात ज्यांना संघर्षाची प्रार्थना करता येत नाही. तो स्वत:मध्ये गुंतत जातो. स्वत:मध्येच जळत असतो. आपल्या भावनांना वाट मोकळी करण्यास ‘स्पेस’ त्याचेजवळ नसते. त्यामुळे प्रत्येक क्षणात नवे प्रश्न अन् जगणे कठीण होते. संकुचित विचार करणे त्याला जमत नसतानाही आत्महत्येच्या टोकापर्यंत जावे लागते, ही मानवी शोकांतिकाच नाही तर काय?
सहज सोप्या कवितांमधून जीवनाचे तत्त्वज्ञान निदा फाजली यांनी मांडले आहे. वेगवेगळ्या प्रतिमा आणि प्रतीके वापरून उजेडवाटाही दाखविल्या आहेत. ‘ईश्वराच्या या दुनियेला ईश्वरच जबाबदार आहे’ असा प्रवास या काव्यसंग्रहातून दिसून येतोय. युद्ध, प्रार्थना, अब्रू, एकात्मता, सत्य, इलाज, आत्महत्या, मी आज झगडलो, हे रक्त माझं नाही, वडिलांच्या मृत्यूवर, माणसाचा शोध, पासपोर्ट अधिकाऱ्याच्या नावाने, सीमेपलीकडचं, एक पत्र वाचून..., एका उद्ध्वस्त गावाची कथा, मृत्यूचा कालवा, मुंबई, लढाई, बस असेच जग राहा, इथेही आणि तिथेही यासारख्या दर्जेदार कविता वाचकांना अंतर्मुख केल्याशिवाय राहात नाहीत.
माणसात राक्षस आहे
इथेही आणि तिथेही
इश्वर रक्षक आहे
इथेही आणि तिथेही
हिंस्र राक्षसांची
फक्त नांव वेगवेगळी आहे

या कवितेतून मानवाच्या धार्मिक प्रवृत्तीचे दर्जेदार विवेचन करण्यात आले आहे. पृथ्वीवरील लोकांना स्वर्ग, जन्नत ही आयुष्याच्या अंतानंतरची दुसरी आनंदयात्रा वाटतेय. पण, माणूस माणसाजवळ असला तर कधी संवेदनशील तर कधी संवेदनाहीन होतो. तात्पर्य, माणसाला सुख कुठे मिळतेय, याचा शोध स्वत:ला घ्यावा लागणार आहे. एकीकडे टोकाची विषम स्थिती तर दुसरीकडे सम संख्येचा बाजार आज मानवालाच हिणवताना दिसतो. ठेच लागलेला माणूस आणि सुटबुटात वावरणारा माणूस भिन्न पातळीवर दिसून येतो. मनाचा आरसा कुणाला म्हणावा- माणूस धर्म धर्म करतोय, पण स्वत:चे मुडदे पाडतो आणि स्वकेंद्रित विचार करतोय. हे इथेही आणि तिथेही सुरू आहे का? हा प्रश्न वाचकाला ठिकठिकाणी वाचायला मिळतोय. देशाच्या फाळणीमुळे ज्यांचे मनोविश्व उद्ध्वस्त होऊन जाते, अशा अगणित सहृदांना हे पुस्तक लोकनाथ यशवंत यांनी अर्पण केले आहे. चित्रकार संजय मोरे यांची निर्मिती असलेला मुखपृष्ठावरील मानवी मुखवट्यांचा सुबक चेहरा पद्धतशीर वाचकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी होतो. मात्र, हाच मुखवटा कवितेचे वेगळेपण सांगून जातोय. नवी मुंबईच्या सृजन प्रकाशनाने हा अनुवादित काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. निदा फाजली यांच्या काव्यावर प्रेम करणाऱ्या मराठी वाचकांसाठी वाचनीय असा हा संग्रह आहे.
माणूस बेजार इथेही आणि तिथेही...
मूळ कविता : निदा फाजली
अनुवाद : लोकनाथ यशवंत
प्रकाशक : सृजन प्रकाशन, नवी मुंबई
किंमत : ‌~ १००/-
hemaparas.barsagade82@gmail.com
बातम्या आणखी आहेत...