आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nilesh Amrutkar Article About Women's Self Help Group, Divya Marathi

बचत गटांचे नवे समीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवर्‍याने मारले, सासूने घराबाहेर काढून दिले, त्यामुळे लोकांकडे धुणीभांडी करण्याची वेळ आलेल्या, आयुष्याची फरपट झालेल्या महिलांची उदाहरणे केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर नाशिकसारख्या मोठ्या शहरातही दिसतात. मात्र, परिस्थितीपुढे हतबल न होता या महिलांनी स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण व्हावे, याकरिता त्यांच्या जीवनात बचत गटामार्फत त्यांना दिशा देण्याचे आणि केवळ कुटुंबातच नव्हे तर समाजातही आत्मसन्मान मिळवून देण्याचे कार्य काँग्रेसच्या नूतन शहराध्यक्ष आणि नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांनी केले. ‘जिजाऊ’ मार्केटिंगच्या माध्यमातून एका बचत गटापासून सुरू केलेल्या या महिलांच्या स्वावलंबनाची चळवळ आता 15 हजार महिलांच्या घरात पोहोचली. संख्या वाढवण्यावर भर न देता त्यांच्या उद्योजकीय सबलीकरणालाही प्राधान्य देत 5 ते 10 हजार रुपयांचा हिशोब करणार्‍या बचत गटांची उलाढाल आता 4 कोटींच्या घरात पोहोचली आहे.

महिलांची सेवाभावी संस्था असावी, महिलांनी समाजाप्रति सेवाभाव ठेवावा तसेच त्यांनी स्वावलंबी व्हावे, यासाठी नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली. राज्यातील तिसर्‍या क्रमांकाची ही संस्था झोपडपट्टीपासून उच्चभ्रू वसाहतीत राहून बचत गट चालवणार्‍या सर्वांनाच आधार देणारी ठरली. संपूर्ण जिल्ह्यात बोरस्ते यांनी स्वत: फिरून सभासद जमा केले. जिल्ह्यातील नामांकित पतसंस्था, सहकारी बँका बुडाल्याने सहकाराविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण झालेले होते. अशाही परिस्थितीत महिलांकडून चांगला प्रतिसाद लाभला. त्यातून संस्थेच्या कार्याचा परीघ वाढत कार्यक्षेत्रही विस्तारले. बोरस्ते यांनी महिलांना संघटित केले. या महिलांनीच त्यांना राजकारणात सक्रिय व्हावे, अशी मागणी केली. ओझर येथील रेणुका पतसंस्थेत संचालकपदापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांनी बचत गटांना अर्थसाहाय्य करण्यासाठी विनातारण आणि 11 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत सावकारशाही मोडीत काढली.

बचत गटांची चळवळ 700 बचत गटांपर्यंत पोहोचली. परंतु त्यांना गुणात्मक विकासासाठी प्रवृत्त करून पुढे आणण्याचे काम शासकीय माध्यमातून होणे गरजेचे असताना ते काम संस्थापातळीवर करण्यात आले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच साक्षरता अभियान, कुपोषण, भ्रूणहत्या, दारूबंदी याविषयी जागृती निर्माण करण्यात आली. तसेच महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांच्यातील उद्योजकाला वाव मिळावा, यासाठी ‘ब्रँडिंग’ची संकल्पना पुढे आली. या बचत गटांच्या उत्पादनाला एकाच ब्रँडखाली आणण्यासाठी ‘जिजाऊ’ नावाने ब्र्र्रँड विकसित करण्यात आला. बचत गट म्हणजे केवळ वडे-कुरडई-पापड हे समीकरण खोडून ‘जिजाऊ’ने आपल्या पदार्थांच्या मार्केटिंगवर भर देत स्वत:साठी बाजारपेठ तयार केली. दिवाळीच्या मुहूर्तावर जिजाऊ महिला बचत गट सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत विविध फराळाचे पदार्थ तयार केले. पंधरा दिवसांत दहा लाखांची उलाढ़ाल करत आगळीवेगळी ओळख निर्माण केली. विशेषत: खाद्यपदार्थ, नावीन्यपूर्ण उत्पादने, व्यापार आणि सेवा अशा चार प्रकारांत बचत गटांच्या उत्पादनाचे वर्गीकरण करण्यात आले.

हे वर्गीकरण असे आहे. खाद्यपदार्थ - पापड, लोणची, चटण्या, शंकरपाळे, चकली, भडंग, करंजी, भाजीपोळी; नावीन्यपूर्ण उत्पादन - थर्माकोल डेकोरेशन, हळदीकुंकू, ब्रोश, देवपूजेच्या साहित्याचा सेट, मशीनद्वारे मेहंदी कोन सूट करणे, अत्तरे, पिशव्या; व्यापार -कटलरीच्या वस्तू, धान्याचा बाजार, तांदूळ, गहू; सेवा - वीज बिल, पाणी बिल, घरपोच फराळ, मिठाई पोहोचवणे, बंगल्यात राहणार्‍यांना घरकामासाठी महिला उपलब्ध करून देणे. जिजाऊ मार्केटिंगमार्फत तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या उपक्रमात पहिल्या वर्षी दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांमध्ये 50 हजारांपर्यंत टप्पा गाठला. याच संस्थेने तिसर्‍या वर्षी दुपटीने व्यवसाय वाढवत थेट दहा लाखांपर्यंत मजल मारली. हे यश गाठताना कितीतरी कुटुंबांच्या चेहर्‍यावर या संस्थेने हसू फुलवले असेल, त्यांना दिशा दिली असेल, जगण्याला आत्मविश्वास दिला असेल.

अमेरिकेत पोहोचला फराळ
यंदा ‘जिजाऊ’ने आपल्या पदार्थांच्या पॅकिंगसाठी कल्पकता वापरून ग्राहकांना बचत गटाच्या उत्पादनांकडे वळवण्यात यश मिळवले. 29 बचत गटांतील किमान 300 ते 350 महिलांनी या उपक्रमासाठीची तयारी तीन महिने आधीच सुरू केली होती. बोरस्ते यांनी गेल्या वीस वर्षांत शेकडो महिलांना कौशल्यावर आधारित उत्पादने निर्मितीबरोबरच मार्केटिंग, पॅकेजिंगचे प्रशिक्षण दिले. स्वत: बोरस्ते जिथे जातात तिथे त्यांच्या बचत गटांच्या उत्पादनांचे जाणीवपूर्वक मार्केटिंग केले. त्यामुळेच नाशिकची उत्पादने आज उत्तर महाराष्ट्रापासून कोकण, मुंबईतही मोठ्या प्रमाणात विकली जाऊ लागली आहेत. एवढेच नव्हे तर अमेरिका आणि दुबईतही 500 किलो फराळाची ऑर्डर पाठवण्यात त्या यशस्वी ठरल्या.

कंपन्यांच्या आवारात स्टॉल
बचत गटांना बाजारपेठेची मोठी समस्या भेडसावत असते, तशी नाशिकमध्येही निर्माण झालेली असताना बोरस्ते यांनी ‘जिजाऊ’मार्फत स्वत:च बाजारपेठ निर्माण केली आहे. त्यासाठी महिंद्रा, स्नायडरसारख्या कंपन्यांच्या व्यवस्थापनांशी बोलून त्यांचा वर्धापनदिन असो की सण, उत्सव; या काळात कंपनीच्या आवारात स्टॉल उभारले जातात. तसेच, शासनाचा कृषी व पणन विभाग, महापालिकेचा सुवर्णजयंती विभाग, जिल्हा परिषद यांच्यातर्फे संयुक्तपणे वर्षभरातून वेळोवेळी विक्रीचे स्टॉल उभारले जात आहेत. वर्षभरात किमान दर महिन्याला चार ते पाच दिवस बचत गटांना थेट ग्राहक उपलब्ध होत असतात. यातून दर महिन्याला प्रत्येक महिलेला किमान पाच ते सात हजारांचे निश्चित उत्पन्न प्राप्त होऊ लागले आहे.

50 हजार महिला कार्यरत
नाशिक जिल्ह्यात जिजाऊ मार्केटिंग व महिला बचत गट सहकारी संस्थेच्या माध्यमातून 12 ते 15 हजार महिलांना बचत गटातून निश्चित उत्पन्न प्राप्त होऊ लागले आहे. त्यामुळे संस्थेचा आलेख उंचावत असून 2003-04ला 30 बचत गट, 70 महिलांचे 1 लाख 42 हजारांचे भांडवल होते. तेच 2013-14ला 700 बचत गट, 10 हजार महिला आणि 13 हजार सभासद संख्या पोहोचली असून 2 कोटी 15 लाखांचे खेळते भांडवल व ठेवी 2 कोटींपर्यंत प्राप्त झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक विश्वास ठाकूर यांनी नाशिक जिल्ह्यात ‘यशस्विनी अभियान’अंतर्गत 5 हजार महिलांना प्रशिक्षित करण्यात आले. नगरसेविका सुनीता निमसे, कविता कर्डक यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या आणि सामाजिक संघटनांच्या बचत गटांद्वारे किमान 50 हजार महिलांचे संघटन होऊन त्या स्वावलंबी बनल्या आहेत.