आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदमानची अपूर्वाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंडमान/अंदमान : मिनी भारत!!
बंगालच्या उपसागरात असलेला, निळ्याशार पाण्याने वेढलेला हा द्वीपसमूह!!
“एमेराल्ड ब्ल्यू अँड यू”
निळ्याशार पाण्याने वेढलेली पाचूंची बेटे आणि तुम्ही!!

...काळं पाणी म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या, पण आता स्वर्गातीत सौंदर्यामुळे नावाजलेले, अनेक देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेले पर्यटनस्थळ, अंदमान!! भारताने जपून ठेवलेलं एक सुंदर गुपित! आपण राहतो त्या जगापासून दूर, कल्पनातीत सौंदर्याने नटलेलं एक अनोखं जग!! सर्वप्रथम या अंदमानबद्दल सर्वसाधारण म्हणजे इतिहास, संस्कृती, खाद्यसंस्कृती, जाणार कसे अशा गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊ या.

अंदमानचा इतिहास :
अंदमानचा इतिहास आपल्या रामायणाइतकाच प्राचीन आहे. आपण रामायणात ऐकतो की, रावणाने सीतेला श्रीलंकेस पळवून नेले. रामाने जेव्हा हनुमानाला सीतेचा शोध घेण्याची आज्ञा केली तेव्हा हनुमान या बेटावर येऊन गेला, अशी आख्यायिका आहे. त्या वेळी या बेटावर मलय लोकांची वस्ती होती. हे लोक हनुमानाला मलय भाषेत हंडूमान म्हणत. त्याचाच अपभ्रंश म्हणून की काय या बेटांना आज “अंदमान” म्हणतात. आजही आपण अंदमानात गेलात की सगळीकडे अंदमानच्या ऐवजी आपल्याला “अंडमान” असंच नाव दिसतं. शेकडो वर्षांपासून येथे नेग्रिटोज आणि मंगोलॉइड्स या दोन जमातींचे वास्तव्य आणि वर्चस्व होते. साधारणपणे १७ व्या शतकापर्यंत ही बेटे जगापासून वेगळी, अलिप्त अशीच होती. निकोबारचे नावदेखील तेथील आदिवासी लोकांवरून पडले असावे, कारण निकोबार म्हणजे “Land of Nakeds”. जगाच्या नकाशावरदेखील ही बेटे दिसली ती भूगोलवेत्ता क्लाउडीयस तोलेमस (तोलेमी) यामुळे. त्याने तर या बेटांना मनुष्यभक्षक लोकांची भूमी, असं म्हटलं होतं. चिनी बौद्ध भिक्षु झुआन झँग आणि मार्को पोलो यांनादेखील १७व्या शतकात या बेटांबद्दल माहीत झाले.

आपण म्हणतो, मराठ्यांनी साता समुद्रापार आपले झेंडे गाडले, ते काही खोटे नाही. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांचा आरमारप्रमुख कान्होजी आंग्रे याने या बेटांवर राज्य केले. १८व्या शतकात अंदमान येथे मराठ्यांच्या नौदलाचे आरमार होते. ते कायम ब्रिटिश, पोर्तुगीज आणि डच व्यापारी जहाजांवर हल्ला करत आणि त्यांना लुटत. साधारणपणे १९व्या शतकात ब्रिटिशांनी ही बेटे काबीज केली आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना, स्वातंत्र्यसैनिकांना भारतातून हद्दपार करून येथे बंदी बनविण्यात येऊ लागले. त्यानंतर दुसर्‍या महायुद्धात जपानी लोकांनी ही बेटे काबीज केली. जपानी सैनिकांचे बंकर्स आजदेखील आपल्याला येथे आज पाहायला मिळतात. १९४७च्या स्वातंत्र्यानंतर अंदमान निकोबार बेटे भारताकडे सोपवण्यात आली आणि आता ती भारताचा केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखली जातात.

अंदमानची भौगोलिक परिस्थिती :
भौगोलिकरीत्या अंदमान निकोबार हा द्वीपसमूह बंगालच्या उपसागरात आहे आणि भारतापेक्षा तो म्यानमार या देशापासून जवळ आहे. आपण विचारदेखील करू शकणार नाही, असा हा ५७२ बेटांचा द्वीपसमूह आणि भारताचा केंद्रशासित प्रदेश! या बेटांचे क्षेत्रफळ ८२४९ स्क्वे.किमी. एवढे असून त्यातील ६४०८ स्क्वेअर किमी हे अंदमानचे क्षेत्रफळ आहे आणि १८४१ स्क्वे.किमी. एवढे निकोबारचे क्षेत्रफळ आहे. या ५७२ बेटांपैकी फक्त ३६ बेटांवरच मनुष्यवस्ती आहे. वस्ती असलेल्या बेटांपैकी २६ बेटे अंदमानमध्ये असून १० बेटे निकोबारमध्ये आहेत. अंदमान निकोबार बेटे भारतापासून १४००किमी. अंतरावर आहेत. या बेटांचा जवळजवळ ९० टक्के भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. भारताच्या एकूण समुद्रकिनार्‍यापैकी १/४ म्हणजे २००० किमी एवढा मोठा समुद्रकिनारा लाभलेला हा बेटांचा समूह आहे. या बेटांवरचे किमान तापमान २३ डिग्री, तर कमाल तापमान ३१ डिग्री एवढे असते आणि हवामान दमट. अंदमान येथे वर्षाला ३१८० मिमी पावसाची नोंद होते. २०११च्या जनगणनेनुसार अंदमानची लोकसंख्या ३,८०,५८१ एवढी होती, ज्यात २,०२,८७१ पुरुष आणि १,७७,७१० स्त्रिया होत्या. अंदमान निकोबार मुख्यत्वेकरून ३ जिल्ह्यांत विभागलेले आहे- अंदमान्स, निकोबार्स आणि उत्तर व मध्य अंदमान.

अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेश असल्याकारणाने उपराज्यपाल हा तेथील प्रशासन प्रमुख आहे. पुरातत्त्व खात्याच्या माहितीनुसार या बेटांवर मध्यअश्मयुगात सर्वात पहिली वस्ती होती. विविध जमातींचे लोक राहात असल्यामुळे त्यांना अंदमानी म्हणत. ग्रेट अंदमानीज, ओंगेस, जारावाझ, शोम्पेंस यासारख्या जमाती येथे आजही आहेत. बर्‍याच लोप पावत चाललेल्या जमाती या बेटांवर अजूनही आहेत. काही दुर्मीळ वन्यपशु, पक्षीदेखील फक्त येथेच आढळतात. दुगोंग नावाचा सागरी सस्तन प्राणीदेखील फक्त येथेच सापडतो.

जवळजवळ १८५० पर्यंत येथील लोक बाहेरील जगापासून वंचित होते. बाहेरील जगाशी त्यांची ओळखदेखील नव्हती. अठराव्या शतकात इंग्रज जेव्हा भारतात आले, त्या वेळी या बेटांबद्दल जगाला माहीत झाले. परंतु इंग्रजांच्या काळात हे ठिकाण काळ्या पाण्याची शिक्षा देण्याचे ठिकाण म्हणून कुप्रसिद्ध होते. कारण कोणत्याही आरोपीला ब्रिटिश सरकार येथे कैद करून ठेवायचे किंवा फाशीची शिक्षा द्यायचे. सुरुवातीच्या काळात येथे जाण्यास बंदी होती. अनेक प्रतिष्ठित लोक तेथे जात नसत. पण कालांतराने हे चित्र पालटले. आज भारतातून अंदमानमध्ये गेलेल्या वेगवेगळ्या धर्माचे जसे की बंगाली, तेलुगू, तामीळ, मल्याळम यांचेच प्रमाण तेथे सर्वात जास्त आहे.

अंदमानच्या लोकसंख्येपैकी ७०% लोक बंगाली भाषा बोलतात. बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये येथे निकोबारीज, तेलुगू, तामीळ, मल्याळम, बंगाली, हिंदी आणि इंग्लिश अशा अनेक भाषा बोलल्या जातात. तेथे असलेल्या शिक्षणसंस्थांपैकी बर्‍याच संस्थांमध्ये बंगाली भाषा हे शिक्षणाचे माध्यम आहे आणि त्या खालोखाल तामीळ आणि तेलुगू. तरीदेखील अंदमान हा बहुभाषिक प्रदेश असल्याने येथील जनता इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यास प्राधान्य देते. पदवीपर्यंतचे शिक्षण अंदमान येथे झाल्यानंतर तेथील लोक/ विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणासाठी मुख्यभूमी भारतात येतात. कृषी क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर ४८,६७५ हेक्टर जागा ही कृषीसाठी वापरली जाते. पाऊस चांगला पडत असल्यामुळे तांदळाचे उत्पादन येथे फार मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्याचबरोबर नारळ आणि सुपारी, मसाल्याचे पदार्थ जसे की लवंग, दालचिनी, जायफळ आणि मिरे यांचे उत्पादनदेखील येथे मोठ्या प्रमाणावर होते.

औद्योगिक क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर जवळजवळ १४०० छोट्या इंडस्ट्रीज येथे आहेत. त्यातील काहीच मुख्य उत्पादन म्हणजे हस्तकला, शंखशिंपल्यांपासून बनवलेल्या वस्तू!!

अंदमानला कसे जाणार?
अंदमानला जाण्यासाठी हवाईमार्ग आणि जलमार्ग दोन्ही मार्गाने जाता येते. अंदमानात प्रवेश आपण पोर्ट ब्लेयर या अंदमानच्या राजधानीत करतो. साधारणपणे भारतभूमी ते अंदमान (पोर्ट ब्लेयर) जाण्यासाठी तीन मुख्य ठिकाणे आहेत- चेन्नई, विशाखापट्टणम आणि कलकत्ता. या ठिकाणांपासून पोर्ट ब्लेयर पर्यंतचे अंतर पुढीलप्रमाणे-
१.कलकत्ता ते पोर्ट ब्लेयर : जलमार्ग , अंतर : १२५५ किमी.
हवाईमार्ग , अंतर : १३०३ किमी.
२.चेन्नई ( मद्रास ) ते पोर्ट ब्लेयर : जलमार्ग , अंतर : ११९० किमी
हवाईमार्ग , अंतर : १३३० किमी.
३.विशाखापट्टणम ते पोर्ट ब्लेयर : जलमार्ग , अंतर : १२०० किमी.
हवाईमार्ग, अंतर : ९२६ किमी.

वेगवेगळ्या विमान कंपन्या माफक दरात आपल्याला अंदमान येथे घेऊन जातात. भारतीय पर्यटकांना अंदमान येथे जाण्यास कोणत्याही विशिष्ट परवानगीची गरज नाही, पण काही आदिवासी भागांना भेट द्यायची असेल तर उपायुक्तांची परवानगी लागते. विदेशी पर्यटकांनादेखील तशी परवानगी काढावी लागते. विदेशी पर्यटकांना ही परवानगी पोर्ट ब्लेअर येथे उतरल्यावर काढता येते.

अंदमानची खाद्यसंस्कृती :
एखाद्या देशाला भेट देणे, किंवा पर्यटनाला जाणे म्हणजे खवैयांसाठी मेजवानीच. तेथे मिळणार्‍या खाद्यपदार्थांमध्ये मिसळले जाणारे साहित्य जरी सारखे असले तरी बनवण्याच्या पद्धतीमुळे पदार्थाची चव बदलते. चहूबाजूंनी समुद्र असल्याने अंदमानच्या खाद्यसंस्कृतीमध्ये मासे, खेकडा, झिंगा अशा प्रकारच्या प्राण्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तम आणि विविध प्रकारचे समुद्री जीव येथे मुबलक प्रमाणात असल्याने या सर्वांपासून बनविलेल्या डिशेस आपल्याला येथे खायला मिळतात. समुद्री प्राण्यांबरोबर येथे इतर प्राण्यांचे मांसदेखील खातात. उष्ण कटिबंधीय प्रदेशात मिळणारी फळे जसे की केळी, आंबा, फणस, संत्री, अननस , पेरूदेखील येथे मोठ्या प्रमाणावर मिळतात. पूर्वीच्या काळी जेव्हा येथे फक्त आदिवासी राहात, तेव्हा ते फळे आणि कच्चे मासे यावर आपली गुजराण करत. येथे मिळणार्‍या पदार्थांमध्ये उत्तरेकडून ब्रह्मदेश (म्यानमार), दक्षिणेकडून इंडोनेशिया, पूर्वेकडून थायलंड आणि पश्चिमेकडून भारतातून आलेल्या अनेक खाद्यपदार्थांचा समावेश होतो. पर्यटन व्यवसाय जसजसा विकसित होऊ लागला, तसतसा येथील खाद्यसंस्कृतीतही बदल होत गेला आणि अनेकविध प्रकारचे खाद्यपदार्थ आज आपल्याला येथे चाखायला मिळतात. खास अंदमानचा असा कोणताही विशिष्ट पदार्थ जरी आपणास सांगता आला नाही तरी तेथे मिळणारे सर्वच पदार्थ उत्तम मिळतात, यात तिळमात्र शंका नाही.

नारळ-खजुरांच्या झाडांनी समृद्ध, ८० फुटापर्यंत खोलवर स्पष्ट दिसेल इतके पारदर्शक, नितळ पाणी असलेले सुंदर आणि आकर्षक समुद्रकिनारे, त्याखाली नितांत सुंदर असे कोरल्स व अन्य समुद्री जीव यांना कवेत घेऊन सांभाळणारे अंदमान निकोबार द्वीपसमूह आज निसर्गसौंदर्यामुळे भारतातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहेत. एवढ्या सुंदर ठिकाणी भटकंतीला जायला तसा विशिष्ट काळ वेळ पाहिजे, असे काही नसले तरी सप्टेंबर ते मार्च या काळात आपण येथील पर्यटनाचा आनंद उत्तमरीत्या लुटू शकतो.

विदेशी पर्यटकांसाठी अंदमान म्हटले की तेथील निसर्गसौंदर्य, निळाशार समुद्र, समुद्रकिनारे, तेथे खेळले जाणारे क्रीडाप्रकार या आणि इतर अनेक गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या तरी या सर्वांबरोबर आपण सर्व भारतीय या बेटांशी सावरकरांमुळे खूप भावनिकरीत्या जोडले गेलो आहोत. त्यांच्या आणि त्यांच्याबरोबर इतर अनेक क्रांतिवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातनांचं प्रतीक म्हणजे तेथील सेल्युलर जेल!! या सेल्युअर जेलविषयी सविस्तरपणे आपण पुढील लेखात जाणून घेऊ.
निलेश गायकवाड
nileshg.21@gmail.com
बातम्या आणखी आहेत...