आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनाच्या नाना त-हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्यटन म्हणजे श्रमपरिहार, पर्यटन म्हणजे मनोरंजन, पर्यटन म्हणजे साहस, पर्यटन म्हणजे व्यवसाय किंवा कामानिमित्त केलेला प्रवास, आणि पर्यटन म्हणजे अभ्याससुद्धा!! जगामध्ये आपल्यासारख्याच इतर अनेक प्रकारच्या व्यक्ती राहतात. आपल्या संस्कृतीव्यतिरिक्त इतर संस्कृतींचा, तेथील लोकांच्या राहणीमानाचा अभ्यास करणे, तेथील लोकांना जाणून घेणे, हादेखील पर्यटनाचा हेतू असू शकतो. कोणत्याही देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर थेट परिणाम करणारा घटक जर कोणता असेल तर तो म्हणजे पर्यटन!

धकाधकीच्या जीवनात कामाच्या व्यापातून एक-दोन दिवस मोकळे मिळाले रे मिळाले, की दूर कुठेतरी निवांत स्थळी निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन राहण्याची इच्छा प्रत्येक जण उराशी बाळगून असतो. आपापल्या परीने ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्नदेखील करतो. कामानिमित्त, व्यवसायानिमित्त आपण अनेकदा फिरतो; पण केवळ हौस, आवड म्हणून फिरणार्‍या भटक्यांची दुनियाच निराळी!! पर्यटनाची आवड म्हटल्यावर इच्छित स्थळी पोहोचवणार्‍या वाटेत येणार्‍या, पण फारशा परिचित नसलेल्या ठिकाणांचादेखील आपल्याला आस्वाद घेता येतो.

अलीकडे सुटी मिळाली की, भटकंतीला जाणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण बर्‍याचदा फिरणे, भटकंती म्हणजे काय, हेच लोकांना नीटसे माहीत नसते. नुसतंच राहतं ठिकाण सोडून निवांत स्थळी जाऊन मस्ती करणे, म्हणजे पर्यटन का? तर असं नाही. सहल जर आनंददायी आणि यशस्वी करायची असेल तर आपल्या आवडीप्रमाणे आणि हेतूंप्रमाणे योग्य पर्यटन स्थळांची निवड करणे खूप गरजेचे आहे. सहलीचे नियोजन करताना अगदी आरामात, धावपळ न होता आपल्याला हवे तिथे भेटी देता येतील, हव्या त्या ठिकाणी तुम्हाला हवा तेवढा वेळ देता येईल, असे सुटसुटीत नियोजन असायला हवे.

पर्यटन करायचे, फिरायला जायचे, पण कशासाठी? याचा जर आपण एकूण विचार केला, तर आपल्यासमोर अनेक गोष्टी येतात. पर्यटन कशासाठीही असू शकते? श्रमपरिहार, विश्राम, व्यवसाय, शिक्षण किंवा अजून इतर काही विशिष्ट हेतूनेसुद्धा पर्यटन केलं जाऊ शकतं. नेहमीच्या रामरगाड्यातून थोडासा विरंगुळा सर्वांनाच हवा असतो. श्रमपरिहार, विश्राम यासाठी केलेले पर्यटन म्हटले तर हवामानबदल किंवा जागाबदल, थोडक्यात म्हणजे नित्यनेमाच्या गोष्टीतून थोडासा विरंगुळा यासाठी केले जाणारे पर्यटन! यात मग अजून बरेचसे प्रकार आहेत, जसे की सांस्कृतिक पर्यटन. ज्यात आपण आपल्या आणि इतर संस्कृतींचा अभ्यास करतो, त्याबद्दल माहिती जाणून घेतो. धार्मिक पर्यटन, ज्यात आपण धार्मिक स्थळांना भेटी देतो. आरोग्यासाठी पर्यटन किंवा वैद्यकीय पर्यटन. बर्‍याचदा डॉक्टर्स आपल्याला तब्येत सुधारण्यासाठी अशा प्रकारचा सल्ला देताना. तसेच खेळाशी संबंधित पर्यटन किंवा कौटुंबिक पर्यटन.

बर्‍याचशा लोकांना नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्तदेखील फिरावे लागते. अर्थात, यामध्ये पर्यटनाचा मुख्य हेतू हा फक्त "नियोजित केलेले काम करणे' एवढाच असतो. यामध्ये मग पर्यटक इच्छित स्थळी जाऊन ठरवल्याप्रमाणे वेगवेगळ्या लोकांना भेटतो, त्यांच्या कंपनीतील उत्पादनाबद्दल माहिती देतो, गरजेनुसार संबंधित सभा (मीटिंग्स) किंवा परिषदांना (कॉन्फरन्स) हजेरी लावतो. तुम्हाला माहीतही असेल, अशा प्रकारच्या पर्यटनाला एक विशिष्ट नावदेखील आहे, “MICE (Meetings-मीटिंग्स, Incentives-इन्सेन्टिव्हज, Conferences-कॉन्फरन्सेस and Exhibitions-एक्झिबिशन्स)”!!

आपण बरेचदा ऐकतो की, अमक्याचा मुलगा इकडे शिकायला गेला, तिकडे शिकायला गेला. त्यामुळे वर वर पाहता वाटत नसले तरी शिक्षणासाठीदेखील पर्यटन केलं जाऊ शकतं. शैक्षणिक पर्यटन या क्षेत्राचा विकास होण्याचं मुख्य कारण म्हणजे, त्यासाठी बाहेरगावी किंवा बाहेरील देशांत गेलेल्या व्यक्तीला वर्गाबाहेरील, तांत्रिकदृष्ट्या सबळ करणार्‍या गोष्टी अनुभवता येतात.

काही वेळा पारंपरिक पर्यटनापेक्षा वेगळे असे, म्हणजे एखाद्या इच्छित स्थळी जाऊन तेथील स्थानिक लोकांच्या सान्निध्यात राहून त्या जागेतील कार्यपद्धती, तेथील वातावरण, खाद्यसंस्कृतीविषयी अभ्यास, रीतीरिवाज याविषयी अभ्यास, माहिती करून घेणे अशा विविध कारणांसाठी पर्यटन केले जाते. यालाच मग खाद्य पर्यटन (Food Tourism), पर्यावरण पर्यटन (Eco Tourism) आणि ग्रामीण भागातील कृषी पर्यटन (Agro -Rural Tourism) असेही लोक म्हणतात. पण निसर्गाचं वेड लावणारं सौंदर्य अनुभवत पर्यटन करणे, म्हणजे पर्वणीच!! पर्यटनासाठी जाणार्‍या सर्वांसाठी बर्‍याच ठिकाणी हव्या त्या सर्व सुविधा उपलब्ध असतात. पण बरीचशी ठिकाणं अशी असतात की, ती अनेकांना माहीतदेखील नसतात. मग तेथील सुविधांबद्दल तर बोलायलाच नको. अशा ठिकाणी जाणे म्हणजे साहसी लोकांसाठी पर्वणीच असते. याबद्दल सविस्तर माहिती पुढील लेखामध्ये घेऊ या.
nileshg.21@gmail.com