आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षद्वीप: एक आनंदयात्रा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करणारा हा द्वीपसमूह, आज भारताचा एक केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखला जातो. या बेटांविषयी बऱ्याच आख्यायिका सांगितल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे, राजा चेरुमन पेरूमल याची. हा राजा म्हणे, काही अरब व्यापाऱ्यांच्या प्रभावामुळे मक्का येथे गेला. त्याच्या राज्यातले लोक त्याला शोधण्यासाठी निघाले असता त्यांचे जहाज येथील एका बेटावर येऊन धडकले. त्याच बेटाला आज बंगाराम म्हणून ओळखतात. जहाज दुरुस्त होईपर्यंत ते लोक बंगाराम आणि आजूबाजूच्या बेटांवर वास्तव्य करून राहिले. पण येथील स्वर्गातीत सौंदर्याने त्यांना भुरळ पाडली आणि नंतर ते येथेच वास्तव्य करून राहिले. अजून एक आख्यायिका अशीही सांगितली जाते की, एक मुस्लिम धर्मगुरू उबैदुल्ला येथून जहाजाने जात असता त्याचे जहाज पण येथेच येऊन धडकले. मग त्याने याच बेटावर वास्तव्य केले. येथील मुलीशी विवाह केला आणि मुस्लिम धर्म प्रचार आणि प्रसाराचे काम केले. याच काळात मग येथे बऱ्याच मशिदी बांधण्यात आल्या. इब्न बटूटा या एका अरब प्रवाशाच्या गोष्टींमध्येदेखील लक्षद्वीप बेटांचा उल्लेख आढळतो.
पण याचबरोबर भूगोलवेत्त्यांचा अभ्यासदेखील सांगतो की, साधारण
इ. स. १५०० पूर्व काळात येथे मनुष्यवस्ती होती. अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे, आपण बुद्धांच्या ज्या जातक कथा ऐकतो, त्यामध्येदेखील या बेटांचा उल्लेख आहे. सातव्या शतकात काही मुस्लिम मिशनरीज येथे आले होते. त्यानंतर चोला राजवंशाच्या राजांनी येथे राज्य केले. साधारण १४९८-१५४५मध्ये येथे पोर्तुगीजांनी राज्य केले. त्यानंतर मुस्लिम पंथाच्या आरक्कल घराण्याच्या राजाने येथे राज्य केले आणि नंतर आला टिपू सुलतान. टिपू सुलताननेदेखील १७९९ पर्यंत या बेटांवर हुकमत गाजवली. पण १७९९मध्ये त्याच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांची येथे सत्ता होती. १९४७ला भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर ही बेटे भारताकडे आली. ही बेटे भारताकडे आणण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांची कामगिरी फार महत्त्वाची ठरली. १९५६मध्ये या बेटांना भारत सरकारने केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. १९७३मध्ये या बेटांना ‘लक्षद्वीप’ असे नाव देण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने आज येथे भारताचा नौदलाचा तळ, INS द्वीपरक्षक आहे.
भारताच्या नैऋत्य किनाऱ्यावरून २०० ते ४४० किमी अंतरावर ही बेटे आहेत. अतिशय कमी म्हणजे, ३२ स्क्वे.किमी. एवढं क्षेत्रफळ असलेली ही बेटे. खाऱ्या पाण्याचा प्रदेश आहे जवळजवळ ४२०० स्क्वे.किमी आणि २०००० स्क्वे.किमी नुसते पाणीच आहे. ही सर्व बेटे मिळून लक्षद्वीपचे १० विभाग तयार होतात, जे केरळच्या कार्यकक्षेत येतात. लक्षद्वीपची राजधानी म्हणजे, कवरत्ती हे बेट! हा द्वीपसमूह १२ प्रवाळी क्षेत्र, ३ कोरल रिफ्स, आणि ५ पाण्याखाली बुडालेल्या खडकांपासून तयार होतात. असा हा एकूण ३९ मोठी आणि काही छोटी बेटे मिळून तयार झालेला प्रदेश आहे. या द्वीपसमूहापैकी फक्त १० बेटांवरच मनुष्यवस्ती आहे. १७ बेटे निर्मनुष्य आहेत. पैकी ४ बेटे तर अलीकडे तयार झाली आहेत. वस्ती असलेली बेटे म्हणजे कवरत्ती, अगत्ती, कल्पेनी, मिनीकॉय, अमिनी, कदमत, चेतलत, अन्ड्रोट, बित्रा आणि किल्तन. या बेटसमूहात फक्त चार बेटे मुख्य मानली जातात. कवरत्ती, अगत्ती, अमिनी, आणि मिनीकॉय!!
बेटावरील लोकसंख्येचा विचार करायचा झाला, तर २०११च्या जनगणनेनुसार या बेटावर फक्त ६५०००च्या आसपास लोक आहेत. सर्वात कमी लोकसंख्या ही बित्रा या बेटावर २७१ एवढीच. लोकसंख्या जरी कमी असली, तरी येथील साक्षरतेचे प्रमाण जवळजवळ ९५% आहे. लक्षद्वीपमधील बहुतांश लोक हे भारताच्या नैऋत्येस असलेल्या मलबार कोस्टवरून स्थलांतरित होऊन आलेले आहेत. यातील ९३ टक्केपेक्षा जास्त लोक हे मुस्लिम धर्मातील सुन्नी पंथाचे अनुयायी आहेत. मिनीकॉय बेटावरील लोक मात्र बहुतांश मालदीवकडून आलेले आहेत. बेटांवर प्रामुख्याने तीन भाषा बोलल्या जातात, त्यातही मुख्यत्वेकरून मल्याळम आणि माहल या भाषा होत. मिनीकॉय बेटावर माहल हीच भाषा बोलली जाते. ९३ टक्के जनता मुस्लिम असल्याकारणाने येथे ईद-उल-फित्र, बकरी ईद, मुहर्रम, मिलाद-उन-नबी यासारखे सर्व सण साजरे केले जातात. आता प्रश्न येतो की, तेथे आपण जाणार कसे?
लक्षद्वीपला पोहोचायचे म्हणजे दोन मार्ग आहेत. लक्षद्वीपचे विमानतळ अगत्ती येथे आहे. कोची येथून अगत्तीला जाण्यासाठी विमानसेवा आहे व नंतर एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी सी प्लेनची व्यवस्था आहे, त्याचबरोबर बोट/क्रुझदेखील आहेत. कोचीवरून लक्षद्वीपलादेखील जहाजाने जाता येते. अशी सहा जहाजे कोची येथून अगत्तीपर्यंत जातात. लक्षद्वीपमधील लोकांचा व्यवसाय म्हटले तर मासेमारी, नारळ विक्री, नारळाचा काथ्या काढून त्यापासून वस्तू बनवणे, झावळ्यांपासून वस्तू बनवणे असे उद्योग येथे चालतात. पर्यटनक्षेत्र आता आता येथे विकसित होऊ लागले आहे.
(nileshg.21@gmail.com)