आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतसखा मॉरिशस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉरिशस. फ्रेंच भाषेत त्याला म्हणतात, "मॉरीस'. हा देश म्हणजे एक बेटच आहे. भारत आणि मॉरिशसचे अगदी अठराव्या शतकापासून घनिष्ठ संबंध आहेत. मराठी माणसांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर सद्य:स्थितीत मॉरिशसच्या राजकारण व समाजकारणावर पूर्णपणे मराठी पगडा आहे. मी तर म्हणेन की, आफ्रिका खंडातील महाराष्ट्र म्हणजे मॉरिशस.

भारताचा आणि मॉरिशसचा संबंध तसा खूप जुना, म्हणजे साधारण सन १७३०पासूनचा! १७३०मध्ये पाँडेचेरी आणि तामिळनाडूमधून काही कामगार येथे आणण्यात आले तेव्हापासून खरं तर भारत आणि मॉरिशसचे नाते निर्माण झाले. मॉरिशस येथे ऊस खूप मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे साधारणपणे १८२०च्या सुमारास भारतीय कामगारांना गुलाम म्हणून येथे उसाच्या लागवडीसाठी आणण्यात येत असे. १८३४मध्ये जेव्हा गुलामी बंद झाली त्यानंतर हेच कामगार, मजूर लोक काही करार करून येथे आणण्यात येऊ लागले.

२ नोव्हेंबर १८३४ ला सर्वात पहिला मजुरांचा एक ग्रुप ‘अॅटलास’ या जहाजाने मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे आणण्यात आला. ज्या Immigration Depotला हा ग्रुप आला त्याला आज लोक ‘आप्रवासी घाट’ असेच म्हणतात. पोर्ट लुईसमधील हा आप्रवासी घाट २००६मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केला आहे. १८३४पासून २०व्या शतकाच्या पूर्वार्धात जवळजवळ ५० लाख मजूर भारतातून येथे आणण्यात आले. कालांतराने त्यापैकी दोन तृतीयांश लोक कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करून राहिले. येथे आलेल्या भारतीयांमध्ये बिहार, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र येथील लोकांचे प्रमाण खूप मोठे आहे.

हे झाले ऐतिहासिक संबंधाबद्दल; पण खरे परराष्ट्रीय संबंध सुरू झाले ते म्हणजे १९४८ सालापासून आणि सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध असल्यामुळे हे अजून दृढ होत गेले. आज बघितलं तर आपल्याला दिसून येते की, मॉरिशस येथील ७०% लोकसंख्या ही भारतीय आहे. हिंदी महासागरातील चाचेगिरी आणि आतंकवाद यांना संपुष्टात आणण्यासाठी भारताने जो पवित्रा घेतला आहे, यात मॉरिशस कायम भारताबरोबर राहिला आहे. येथे असलेल्या भारतीयांच्या लोकसंख्येमुळे मॉरिशसशी असलेल्या व्यापारिक संबंधामुळे येथील चलनदेखील "Rupees' हेच आहे. फक्त "मॉरिशियन Rupees, MUR' म्हणून ओळखले जाते. म्हणजे, १ MUR हे १.७७ INR भारतीय Rupee/s. मॉरिशसबद्दल सगळं तर काही एका लेखात संपणार नाहीय; पण आजच्या या लेखात या देशाच्या भौगोलिक परिस्थितीबद्दल आपण माहिती करून घेऊ.

भौगोलिक माहिती :
मॉरिशस. फ्रेंच भाषेत त्याला म्हणतात ‘मॉरीस’. हा देश म्हणजे एक बेटच आहे. या देशाच्या राजधानीचे शहर म्हणजे पोर्ट लुईस. मुंबई ते पोर्ट लुईस हे अंतर साधारणपणे ४६६७ किमी आहे. हिंदी महासागरात आफ्रिका खंडाच्या आग्नेय दिशेला हा देश आहे. मॉरिशसची खासियत म्हणजे, जवळजवळ आठ दशलक्ष वर्षांपूर्वी ज्वालामुखीमुळे तयार झालेले ते बेट आहे!! मॉरिशसची अजून एक खासियत म्हणजे, हा देश हा पर्वतरांगांनी वेढलेला आहे. ह्या पर्वतरांगांची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारण ३०० मी. ते ८०० मी. अशी आहे. पर्वतरांगांनी वेढलेला माझ्या पाहण्यातला हा पहिला देश! हा देश म्हणजे एकच देश असं नसून खुद्द मॉरिशस, त्याच्या पूर्वेला ५६० किमी अंतरावर असलेले रॉड्रीग्स, अगालेगा बेटे आणि सेंट ब्रँडन द्वीपसमूह यांनी मिळून बनलेला आहे. मॉरिशस बेटे, रॉड्रीग्स आणि रीयुनियन हे सर्व मिळून मॅस्करीन बेटे यांचा एक हिस्सा आहे. वातावरण म्हणाल तर हा उष्णकटिबंधीय प्रदेश आहे. येथे मुख्यत्वेकरून दोनच ऋतू असतात. नोव्हेंबर ते एप्रिल उन्हाळा आणि जून ते सप्टेंबर हिवाळा. पावसाचं प्रमाण पाहिलं तर वर्षभरात ९०० मिमी ते १५०० मिमी येथे पडतो.

या देशाचे क्षेत्रफळ २०४० स्क्वे. किमी असून यापैकी १८६४.८ स्क्वे. किमी हा भूभाग आहे. या देशातील सर्वात मोठे शहर आणि राजधानी म्हणजे पोर्ट लुईस!! या देशाची लांबी, रुंदी जर आपण मोजायचं ठरवलं तर लांबी ६५ किमी आणि रुंदी ४५ किमी. या देशाचा समुद्रकिनाराच १५० किमीचा आहे आणि तो पण पांढऱ्याशुभ्र चमचमणाऱ्या वाळूने आच्छादलेला!! आपल्या देशात आपण अनेक नद्यांचे उगमस्थान कोठेतरी पर्वतावर आहे, असे ऐकतो, पाहतो; पण या देशातील नद्या, धबधबे हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसाच्या वाहण्याने जमिनीवर ज्या भेगा पडतात, अशा ठिकाणीच तयार झालेले आहेत.
आज मॉरिशसच्या राजकारण व समाजकारणावर पूर्णपणे मराठी पगडा आहे. मी तर म्हणेन की, आफ्रिका खंडातील महाराष्ट्र म्हणजे मॉरिशस!! मॉरिशसचा किनारा सोडला तर आजूबाजूला जवळपास ४९ छोटी छोटी बेटे आहेत, ज्यावर मनुष्यवस्ती नाही आणि त्यापैकी काही बेटे लुप्त होत असलेल्या प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी खास राखीव आहेत.

जायचे कसे?
मुंबई छत्रपती शिवाजी विमानतळ टर्मिनस येथून मॉरिशसला जाण्यासाठी एअर मॉरिशस, एअर इंडिया या एअरलाइन्स आहेत. मुंबईपासून मॉरिशसचे अंतर साधारणपणे ४७०० किमी इतके आहे. आणि हा प्रवास जवळपास सहा तासांचा आहे. मुंबईपासून मॉरिशसला जाण्यासाठी दर आठवड्याला पाच फ्लाईट‌्स आहेत. त्याचबरोबर दिल्ली आणि चेन्नईपासूनदेखील आपण विमानाने मॉरिशसला जाऊ शकतो.

मॉरिशसचा इतिहास
तसे पहिले तर सर्वप्रथम म्हणजे मध्ययुगीन काळात येथे अरब लोकांचे राज्य होते, त्यानंतर पोर्तुगीज. जवळपास १६३८पर्यंत डच लोक येथे येईपर्यंत कोणतीही वस्ती नव्हती. त्यानंतर १७१०च्या सुमारास डच लोक पण येथून निघून गेले. त्यानंतर पाच एक वर्षांनी येथे फ्रेंच लोकांनी वास्तव्य करावयास सुरुवात केली. सुएझ कालव्याअगोदर युरोप आणि पूर्वेकडील प्रदेश यांच्या दळणवळणाच्या मार्गातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून मॉरिशस ओळखले जात होते. २०व्या शतकाच्या सुरुवातीला नोव्हेंबर १९०१मध्ये गांधीजीदेखील दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परत येताना मॉरिशस येथे मुक्कामाला थांबले होते. तेथील भारतीयांना त्यांनी शिक्षणक्षेत्रात आणि राजकारणात रस घेण्याचा आग्रह केला. गांधीजी जेव्हा भारतात परतलेे, तेव्हा मॉरिशसमधील लोकांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी भारतातील एक वकील मणिलाल डॉक्टर यांना तेथे पाठवल्याचे समजते.

सण आणि उत्सव
अनेक वर्षं वेगवेगळ्या राजवटींचे साम्राज्य असल्याकारणाने येथे वेगवेगळ्या परंपरेचे आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. मॉरिशसमध्ये मॉरिशियन क्रिओल, इंग्लिश, फ्रेंच आणि इतर आशियाई भाषा बोलल्या जातात. तेथे साजरे केले जाणारे सण, उत्सव यावरून त्या देशाची संस्कृती किती उच्च दर्जाची आहे, हे लक्षात येते. आपल्यासारखेच येथेसुद्धा वेगवेगळे दिवस जसे की नवीन वर्ष १ आणि २ जानेवारी, गुलामीपासून मुक्ती मिळाली तो दिवस म्हणजे १ फेब्रुवारी, स्वातंत्र्यदिन १२ मार्च आणि आप्रवासी दिवस म्हणून २ नोव्हेंबर, असे अनेक दिवस साजरे केले जातात. त्याचबरोबर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये चायनीज स्प्रिंग फेस्टिव्हल साजरा केला जातो. फेब्रुवारीमध्ये थाईपुसम कॅवाडी हा तामिळी लोकांचा सण येथे तामीळ समाजाचे लोक साजरा करतात. फेब्रुवारी-मार्चमध्ये हिंदू सण महाशिवरात्री, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव, त्यानंतर दिवाळी, तेलुगू नवीन वर्ष उगडी, मुस्लिम सण ईद हे सर्व सण अगदी जोशपूर्ण वातावरणात, उत्साहात साजरे केले जातात.

खाद्यसंस्कृती
भिन्न संस्कृतीच्या लोकांमुळे मॉरिशस येथील खाद्यसंस्कृतीदेखील खूप समृद्ध आहे. येथील खाद्यसंस्कृतीवर क्रिओल, चायनीज, युरोपिअन आणि भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. येथे फ्रेंच संस्कृतीचा प्रभाव असल्यामुळे येथील फ्रेंच डिशेस प्रचंड लोकप्रिय आहेत. यामध्ये बौलीयन, तुना माशाचे सलाड, दौबे यांसारखे मांसाहारी पदार्थ फ्रेंच वाईन सोबत वाढले जातात. १९व्या शतकात तेथे गेलेल्या भारतीयांनी आपली उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृती तेथे रुजवली. आपल्या मुंबईत मिळणाऱ्या वडापाव सारखाच तेथे "ढोलपुरी' नावाचा एक पदार्थ मिळतो, जो स्थानिक पदार्थ म्हणून खूप प्रसिद्ध आहे. १९व्या शतकानंतर येथे चिनी लोक आल्यामुळे चायनीज पदार्थांची येथे चलती आहे. चायनीज लोकांनी येथील खाद्यपदार्थात भात आणि ‘स्टेपल डायट’ नावाची संकल्पना रुजविली. चायनीज आणि इतर एशियन रेस्टॉरंटची येथे रेलचेल आहे. एखाद्या एशियन हॉटेलमध्ये जेवण म्हणजे मॉरिशसच्या लोकांसाठी मेजवानीच!!
मॉरिशसबद्दल लिहायला अजून खूप आहे. तेथील पर्यटन स्थळांविषयी आपण येत्या अंकात माहिती करून घेऊ.
nileshg.21@gmail.com