आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्भुत नि स्‍वर्गीय ! (नीलेश गायकवाड)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेटांचे विश्व मला कायम अचंबित करणारे वाटते. म्हणजे, अख्ख्या जगात एक बेट आणि एका बेटावर वसलेलं एक अख्खं जग!! एका बेटावर सगळा संसार वसवणे, ही काही सोपी गोष्ट नाही. लक्षद्वीप पर्यटनाचा विचार केला, तर तेथील पर्यटनाचा विकास कसा झाला, हीसुद्धा एक मनोरंजक कहाणीच आहे.

लक्षद्वीपमधील पर्यटन क्षेत्राचा विकास
१९५६ ते १९६२ या काळात मुख्य भूमी भारत ते लक्षद्वीप या प्रवासाची काहीही सोय नव्हती. १९६२मध्ये मात्र एम. व्ही. सी. फॉक्स नावाचे छोटे जहाज सुरू झाले. त्या काळात तर लक्षद्वीप येथे पर्यटन चालू करावे किंवा करता यावे, अशी काहीही व्यवस्था या बेटांवर नव्हती. व्यवस्थाच काय, पण एक साधी इमारतदेखील या बेटांवर नव्हती. त्यानंतर पूर्णपणे विकसित असलेले, एक जहाज एम. व्ही. अमिनदिवी सुरू झाले आणि त्याने या बेटांचा चेहरामोहराच बदलून टाकला.
एम. व्ही. अमिनदिवी बरोबरच सर्व ऋतूत चालणारी जहाजे एम. व्ही. भारतसीमा आणि एम. व्ही. टिपू सुलतान साधारणपणे १९८८मध्ये या पर्यटन क्षेत्रात रुजू झाली आणि लक्षद्वीपच्या पर्यटनाला गती मिळाली. रोजगारी आणि कमाईच्या साधनांमध्ये भर म्हणून लक्षद्वीपचा पर्यटन व्यवसाय सुरू झाला. १९७४मध्ये एक छोटी सुरुवात म्हणून येथील निर्मनुष्य बेट बंगाराम येथे आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू केले गेले. पण पर्यटनाला आलेल्यांची तेथे कायमस्वरूपी अशी काही व्यवस्था नसल्याने पर्यटकांचा ओघ कमी झाला.

व्यवसाय सुधारण्यासाठी मग कोचीमधल्या एका हॉटेल समूहातून विडा उचलला. कडमत, कल्पेनी, मिनीकॉय या बेटांवर पर्यटनास प्रोत्साहन दिले आणि १९८३मध्ये ही सर्व बेटे पर्यटनासाठी खुली करण्यात आली.

SPORTS (सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ नेचर टुरिझम अँड स्पोर्ट‌्स) ही संस्था लक्षद्वीप येथील पर्यटनाच्या विकास कार्यात कार्यरत आहे. या बेटांचे निसर्गसौंदर्य, प्रवाळी क्षेत्र, जैविक विविधता, स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे हे जरी सगळे खरे असले तरी या बेटांवर मिळणाऱ्या सुविधांमध्ये जमीन-आसमानचा फरक आहे. म्हणजे असे की, लक्षद्वीपची काही बेटे ही केवळ डायव्हिंग किंवा वॉटर स्पोर्ट‌्ससाठी विकसित केली गेली, तर काही फक्त पर्यटकांना शांतता, निवांतपणा, आराम मिळावा यासाठी विकसित केली गेली. या सगळ्यामागे फक्त एकच हेतू होता की, पर्यटकांनी निसर्गाचा आस्वाद घ्यावा, त्याची नासधूस करू नये! त्यातून ही पर्यटनाला आव्हान देणारी नैसर्गिक परिस्थिती, बेटांचा छोटा आकार! त्यामुळेदेखील येथील पर्यटन क्षेत्राचा विकास करताना खूप विचार केला गेला. त्या मर्यादांचा त्रास करून न घेता त्यांचाच आधार घेत हव्या त्या जागी, हव्या त्या सोयी उपलब्ध करून देऊन पर्यटनाचा विकास केला गेला.

कडमत (कडमट) बेट
कायाकिंग आणि स्नोर्कलिंगसाठी प्रसिद्ध म्हणजे कडमत बेट. पाण्याच्या थेंबासारख्या असलेल्या या बेटाचे क्षेत्रफळच मुळी ३.२ किमी एवढे आहे. या बेटाचे वैशिष्ट्य म्हणजे, येथील कोरल रीफ, समुद्री गवत आणि समुद्री कासवे. या सर्व गोष्टी दुर्मीळ असल्याने हा परिसर ‘प्रोटेक्टेड एरिया’ म्हणून जाहीर केला गेला आहे. येथील पोटापाण्याचा मुख्य व्यवसाय म्हणजे मासेमारी.

बंगाराम बेट
हे एक प्रवाळी बेट आहे. याची साधारण लांबी ८.१ किमी आणि रुंदी ४.२ किमी एवढी आहे. १९७४मध्ये येथे एक रिसोर्ट चालू केले गेले. पण या बेटावर जाण्यासाठी व्यवस्थित सुविधा नसल्याने, येथे पर्यटन त्या वेळी हवे तसे विकसित झाले नाही. अगत्ती बेटावर विमानतळ झाल्यानंतर येथील पर्यटनाला गती मिळाली. समुद्री पक्ष्यांच्या असंख्य जाती आपण फक्त याच बेटावर पाहू शकतो. आपल्याला फार फार तर ‘सिगल’ माहीत असतो. पण येथे पक्ष्यांच्या अनेक जाती आपल्याला पाहायला मिळतात. बंगाराम बेट हे स्नोरक्लिंग, स्कुबा व समुद्रात खोलवर जाऊन मासेमारी करणे, या सर्व गोष्टींसाठी खूप प्रसिद्ध आहे. अर्थात, हा लक्षद्वीपच्या सौंदर्याचा केवळ एक पैलू आहे. परंतु तोदेखील पर्यटकांना स्वर्गसुखाची अनुभूती देण्यास पुरेसा ठरणारा आहे.
नीलेश गायकवाड
nileshg.21@gmail.com
बातम्या आणखी आहेत...