आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळची शान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बघता क्षणी जाणवतं की, पोखराला हिमालयाच्या पर्वतरांगांचा वरदहस्त लाभलेला आहे. कस्की जिल्ह्याच्या मध्यभागी स्थित असलेले हे नेपाळमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर! काठमांडूपासून साधारणपणे २०० किमी अंतरावर वसलेले. येथे उंच शिखरांपैकी एक शिखर आहे, ‘अन्नपूर्णा’. या शिखरावर चढाई करतानाचा बेस कॅम्प म्हणूनदेखील पोखरा येथे ट्रेकर्स थांबतात.किंवा पोखरा येथून सुरुवात करतात.
अर्थातच मागील काही दशकांत पोखरा हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणूनही नावारूपाला आले आहे. गुरखा सोल्जर्स येथे सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतात. ‘पर्यटक’ म्हणजे, स्थानिकांची रोजीरोटी म्हणायला हरकत नाही. पोखराच्या पर्यटनाचा आनंद मिळवून देणारी गोष्ट म्हणजे, त्याला लाभलेली हिमालयाची भव्यदिव्य पार्श्वभूमी! पोखराच्या निसर्गसौंदर्यात भर घालणारा माउंट फिशटेल हा पोखरामधून कुठूनही दिसतो. त्याचबरोबर अन्नपूर्णा, धवलगिरी, मनास्लु ही ८००० मी.पेक्षा जास्त उंची असलेली शिखरेदेखील आपण पोखरामधून सहज पाहू शकतो.

फेवा लेक (Phewa Lake) : तीन मोठ्या तलावांपैकी एक म्हणजे, ‘फेवा लेक’. आपण फेवा लेकच्या संथ, शांत निवांत पाण्यात बोटिंगचा आनंद लुटू शकतो. या फेवा लेकच्या मध्यभागी एक छोटे बेट आहे आणि त्या बेटावर ‘बाराही मंदिर’ आहे. येथून आपण बोटी घेऊन या मंदिरालादेखील भेट देऊ शकतो. दुर्गा देवी अजीमाच्या रूपाने येथे वराह(बाराही) रूपात आहे.
सेती : अदृश्य होणारी सेती नदीदेखील आपल्याला पोखरा येथे काही ठिकाणी दृश रूपात पाहायला मिळते.

देवी धबधबा : पोखरा एअरपोर्टपासून २ कि.मी.वर असलेला हा धबधबादेखील एक प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आहे.

महेंद्र गुफा : या चुनखडीच्या गुंफा येथे बघण्यासारख्या आहेत. येथील रहिवासी या गुंफांना वटवाघुळाच्या गुंफा असेही म्हणतात.

वर्ल्ड पीस पॅगोडा : फेवा लेकच्या दक्षिणेकडील टोकाला आपल्याला हा पॅगोडा पाहायला मिळतो. या पॅगोड्याची विशेषत: म्हणजे यात चारही दिशांना तोंड करून बसवलेल्या बुद्धाच्या चार मूर्ती आहेत. उंचावर वसलेल्या या पॅगोडावरून अन्नपूर्णा शिखराचे खूप सुंदर दर्शन होते.

जुना बाजार : हा येथे असलेला सर्वात जुना पारंपरिक बाजार आहे. येथे असलेली मंदिरं ही नेपाळच्या नेवारी संस्कृतीची, आर्किटेक्चरची छान ओळख करून देतात. पोखरा शहरात सर्वात पवित्र मानली जाणारी जागा म्हणजे, ‘विंध्यवासिनी मंदिर’.

इंटरनॅशनल माउंटन म्युझियम : नेपाळ लक्षात राहतो, तो एव्हरेस्टमुळे! नेपाळच्या माउंटेनियर्स असोसिएशनने या म्युझियमची स्थापना केली. उद्देश, आतापर्यंत यशस्वी, अयशस्वी ट्रेकिंग-सहलींची नोंद घेणे, त्यामध्ये राहिलेल्या त्रुटी कमी करण्यासाठी दिशादर्शन होणे आणि ट्रेकिंगला प्रोत्साहन मिळून या क्षेत्राचा विकास करता येणे.
अन्नपूर्णा नॅचरल हिस्टरी म्युझियम : हे एकमेव असं म्युझियम आहे, ज्यामध्ये नेपाळमध्ये सापडणाऱ्या फुलपाखरांपैकी ९० टक्के फुलपाखरं आहेत. तसेच नेपाळमध्ये सापडणाऱ्या दुर्मिळ अशा वनस्पती, पक्षी, प्राणी यांचादेखील येथे संग्रह आहे. सुरुवातीला विद्यार्थांकरिता बनवले गेलेले हे संग्रहालय नंतर पर्यटकांच्याही पसंतीस उतरले. फुलपाखरांच्या संग्रहामुळे या संग्रहालयाला ‘बटरफ्लाय म्युझियम’ असंदेखील नाव पडलं.

गुरखा म्युझियम : ‘भित्रं राहून जगण्यापेक्षा मरण बेहत्तर’ असा जगण्याचा मंत्र मानणारे गुरखा याचंदेखील एक म्युझियम आहे. गुरखा जमातीतील लोक, १८१५मध्ये ब्रिटिश आर्मीमध्ये गेले आणि नंतर भारतीय लष्करात. तीन मजली असलेल्या या म्युझियममध्ये प्रकाश आणि ध्वनीच्या माध्यमाने गुरखा घालायचे ते कपडे, त्यांची हत्यारे, त्यांचे वेगवेगळ्या चळवळीमध्ये भाग घेतलेल्या प्रसंगांचे फोटोग्राफ्स हे सर्व आपल्याला बघायला मिळते.

पोखरा : एक साहसी क्रीडा क्षेत्र
या सर्व पर्यटनस्थळांबरोबरच ‘पोखरा व्हॅली’ हे एक साहसी क्रीडा क्षेत्र म्हणूनदेखील विकसित होत आहे. पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग, माउंटन बायकिंग, अल्ट्रालाइट एअरक्राफ्ट फ्लाइट, बोटिंग असे एक ना अनेक... या सर्व साहसी खेळ प्रकारांचा आनंद येथे घेता येतो. माउंटन बायकिंगसाठी तुमच्याकडे वेळ आणि उत्तम नकाशा असला की झालं. तेथील रहिवासीदेखील तुम्हाला बायकिंगचा आनंद लुटता यावा म्हणून मार्ग दाखवून मदत करतात. त्याचबरोबर ‘अल्ट्रालाइट एअरक्राफ्ट फ्लाइट’चे म्हणजे क्या कहने!! संपूर्ण पोखरा व्हॅलीचं दर्शन!! उंचावरून अगदी पक्ष्यांना उडताना पोखरा जसे दिसत असेल, तसा नजारा! सप्टेंबर ते जून या काळात ही फ्लाइट‌्स चालू असतात.
फ्लाइंगबरोबरच बेग्नास आणि रूपा या दोन तलावातील बोटिंग उत्तम! साहसी खेळाचा आनंद देणारा एक उत्तम खेळ म्हणजे, पॅराग्लायडिंग. यामुळे हिमालयीन पर्वतरांगा, मंदिरे, बौद्ध मठ, तलाव, जंगल यांचा उत्कृष्ट नजारा आपल्याला बघायला मिळतो. कोणाला गोल्फचा आनंद लुटायचा असेल, तर उत्तम ठिकाण म्हणजे, पोखराच. त्यासाठी जागतिक दर्जाचे दोन उत्तम गोल्फ कोर्स पोखरा येथे आहेत. अजून एक वेगळा, पण थरारक असा खेळ प्रकार म्हणजे राफ्टिंग!! जगात जेथे कोठे रिव्हर राफ्टिंगचे साहसी खेळ खेळले जातात, त्यामध्ये उत्कृष्ट व्हाईट वॉटर राफ्टिंग म्हणून नेपाळच्या राफ्टिंगचा उल्लेख अगदी आवर्जून केला जातो. नेपाळमध्ये त्रिशुली नदीत हे राफ्टिंग केले जाते. याचबरोबर काली गंडकी आणि सेती नदीमध्येदेखील वॉटर राफ्टिंगचा आनंद लुटता येतो. वेळेअभावी अन्नपूर्णा ट्रेक करणे ज्यांना शक्य नाही, त्यांच्यासाठी पोखरा हायकिंग हा पर्याय आहेच.

या साहसी खेळांबरोबर सारंगकोट किल्ला चढाईदेखील पर्यटक करू शकतात. जुन्या बाजारापासून साधारणपणे ५ किमी अंतरावर हा किल्ला आहे. या किल्ल्यावरून अन्नपूर्णा शिखरावरचा सूर्योदय आणि सूर्यास्त बघण्याची मजाच निराळी!! सारंगकोटपासून साधारण १५ कि.मी.वर कस्किकोट येथून आपल्याला पोखरा व्हॅली, फेवा लेक आणि बर्फाच्छादित हिमालयाचे सुंदर दर्शन घडते. घालचौक, सिरुबरी ही प्रेक्षणीय स्थळे पोखरापासून जवळच आहेत.

नेपाळ हा विषय संपण्यासारखा नाहीच. नेपाळमधील वाइल्ड लाइफ सफारीज, चितवन नॅशनल पार्क, तेथील राहणीमान, खाद्य संस्कृती यांबद्दल अजून खूप सांगायचं आहे, मात्र ते पुढील लेखात!!

nileshg.21@gmail.com