आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसनमुक्त समाज: एक वास्तव स्वप्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण जगात आज अमली पदार्थांविरोधात दृश्य-अदृश्य स्वरूपाचे युद्ध सुरू आहे. हे युद्ध प्रत्येकालाच लढायचे आहे. जो याकडे कानाडोळा करील, माघार घेईल, वा हसण्यावारी नेईल, त्याच्या पुढ्यात संकटांचे पहाड असतील...
समाजात सर्व स्तरांत ‘अल्कोहोल व ड्रग्ज’चे व्यसन करणाऱ्या व्यक्तींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. यात शाळकरी मुले, कॉलेजातील मुला-मुलींची संख्या खूप वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांत व्यसनी व्यक्ती व्यसन करून राजरोजपणे सहभागी होताना आपण बघतो व त्याकडे कानाडोळाही करतो. आजपर्यंत शाळा, कॉलेजात विविध ‘डे’ (दिन) साजरे केले जातात. तसा २६ जून जगभरात साजरा केला जातो, तो जागतिक अमली पदार्थविरोधी दिन म्हणून. संपूर्ण जगात आजमितीला एक दृश्य-अदृश्य स्वरूपाचे युद्ध सुरू आहे, ते म्हणजे अमली पदार्थ व व्यसनाधीनतेविरुद्धचे युद्ध. हे युद्ध करण्यासाठी जगातील सर्व देश एकत्र येऊन एक संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेला नाव देण्यात आले, ‘द युनायटेड नेशन्स ऑफीस ऑन ड्रग्ज अॅण्ड क्राइम’ (UNODC). या सर्व देशांनी मिळून अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळण्यास सुरुवात केली, ती १९८७ पासून.
आपण बघतो की, कर्करोग, लिव्हर सिरॉसीस, कावीळ आदी आजार उद‌्भवतात, त्याचे कारण असते व्यसन! मग ते व्यसन तंबाखू, विडी, सिगारेट, गांजा, चरस, अफू, गर्द, ब्राऊन शुगर व तत्सम नवनवीन अमली पदार्थांमुळे लागते. तसे ‘व्यसन’ या आजाराबद्दल बोलायचे झाले तर हा वाढत जाणारा आजार आहे, तसेच तो एक विचारांचा आजार आहे. व्यसन या आजारावर आपण आपल्या विचारांनीच मात करू शकतो. आज भारतामध्ये नवीन अमली पदार्थ तस्करीच्या मार्गाने येत आहेत. भारतात जवळपास ३० लाख व्यक्ती अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या आहेत, असे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. चीन, पाकिस्तान, इराण या देशांबरोबर भारत हा ‘हेरॉईन’ नामक अमली पदार्थांचा मोठा ग्राहक आहे. तसेच भारतात ‘मेथाडॉन’ हा नवीन ड्रग्जचा प्रकारही दिसून येतो.

‘मेथाडॉन’ हे गुंगी आणणारे औषध आहे. डॉक्टर हे औषध पेशंटला गुंगी देण्यासाठी वापरतात. डॉक्टरांच्या अधिकृत प्रिस्क्रिप्शनशिवाय हे औषध मिळत नाही. मिळू नये. या औषधाचा वापर वेदना कमी होण्यासाठी होतो. अशाच प्रकारचे आणखी एक ड्रग्ज ज्याला ‘मेटाम्फेटामीन’ असे संबोधले जाते. हे ड्रग्ज जगासमोर एक नवी समस्या आहे. आपल्या भारत देशात ‘मेटाम्फेटामीन’ ड्रग्जचा व्यापार अधिक वाढत चालल्याचा निष्कर्ष एका अहवालातून समोर आला आहे. २००३मध्ये कायद्याची अंमलबजावणी झाली. मेटाम्फेटामीन हे रसायन बहुतांश चीन, थायलंड, मेक्सिको आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये तयार होते. ‘मेटाम्फेटामीन’चा वापर एक प्रकारचा मानसिक आजार, निद्रानाश, मेंदूला इजा अशा अनेक गंभीर शारीरिक व मानसिक चिंतेशी निगडित आहे.

आपल्या देशात व्यसनाधीनता दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्या प्रमाणात जर बघितले गेले, तर जास्तीत जास्त लोक आपले व्यसन लपविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यातून ते आपले शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान करून घेत आहेत. या व्यसनाधीनतेवर मात करण्यासाठी आणि एका निरोगी व सुदृढ समाजाची निर्मिती करण्यासाठी साऱ्या समाजबांधवांनी एकत्र येऊन या ‘व्यसनरूपी’ सैतानाचा ‘वध’ करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडायला हवे. ‘२६ जून’ या अमली पदार्थविरोधी दिनाला व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी आपला हातभार लावला पाहिजे.

कोणताही माणूस हा मूलत: वाईट नसतो. तो जसा त्याच्या चुकीच्या संगतीमुळे किंवा विचारांमुळे वाईट बनतो, तसेच हाच माणूस आपले वाईट विचार बदलून चांगले विचार आचरणातही आणू शकतो. कोणताही व्यसनी व्यसनासमोर शक्तिहीन होत जाताे व स्वत:ला दोषी समजताे. पण तो ते मान्य करत नसतो. अशा वेळी त्याला गरज असते, ती मानसिक आधाराची व त्याच्याकडे असलेल्या गुणांच्या प्रशंसेची. कारण व्यसनी माणूस हा आपल्या भावना प्रकट करू शकत नाही. व्यसनी व्यक्तीला अपराधीपणाची वागणूक दिली गेल्याने ती व्यक्ती व्यसनात आणखी जखडत जाते. हे चक्र भेदण्याचा संकल्प जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त झाला, तर ती समाज म्हणून मोठीच कामगिरी ठरेल, यात शंका नाही.
(nileshsoberlife@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...