आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक निर्णायक प्रसंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यात डिसिजन मेकिंग अर्थात निर्णय घेणं याला अनन्यसाधारण महत्त्व असतं. या संदर्भात दिरंगाई किंवा टाळाटाळ केल्यास त्याचे गंभीर परिणाम कसे होतात, त्याची अनेक उदाहरणं वा विदारक चित्रं आपल्या डोळ्यांसमोर तरळतात. व्यसनी व्यक्तीस आपण अपराधी आहोत, याची ‘बोच’ असल्याने त्याला त्याच्यातल्या भावना प्रकट करणे कठीण जाते. अशा वेळी इतरांनी योग्य तो निर्णय घेऊन, त्याला बाहेर काढणे गरजेचे असते. व्यसनी हा गुन्हेगार नसून तो विचारांच्या आजाराने जखडलेला असतो. चांगल्या माणसांसमोर माझं खरं रूप प्रगट होईल, या भीतीपोटी तो समाजापासून सतत लांब राहण्याच्या प्रयत्नात असतो. प्रत्येक बाबतीत, प्रत्येक क्षेत्रात येणार्‍या अपयशामुळे आयुष्य म्हणजे फार मोठे संकट आहे, असा त्याचा चुकीचा समज झालेला असतो. व्यसन केले तरच मानसिक बल प्राप्त होते, अशी चुकीची धारणा त्याच्यात निर्माण होते. त्यातूनच व्यसनाचे प्रमाण वाढत जाते. अशा वेळी माणूस म्हणून तो कधीच चुकीचा नाही, हा विचार त्याच्या मन:पटलावर बिंबवणे आवश्यक ठरते.

माझ्या रिहॅबमध्ये ‘राकेश’ नावाचा एक उमदे व्यक्तिमत्त्व असलेला पेशंट दाखल झाला. घरची परिस्थिती पूर्वीपासून जेमतेम होती. परंतु ‘आधार नसेल शिक्षणाचा तर अंधार होईल आयुष्याचा’ हा स्वानुभव असणार्‍या त्याच्या मातेने शिक्षणाचे महत्त्व वेळीच जाणून त्याला दहावीनंतर पुढील शिक्षण देण्याचा निर्णय घेतला व त्याच्या आईवडलांनी काबाडकष्ट करून त्याला वाणिज्य शाखेत दाखल केले. राकेशला लहान वयातच परिस्थितीचा अंदाज आला असल्याने त्याने पार्टटाइम नोकरी करून कॉलेज करण्याचा निर्णय घेतला. आयुष्याच्या सारीपाटावर हळूहळू फासे उलटे पडत असल्याची चिन्हे दिसत असतानादेखील ‘पुढचा डाव माझाच, यापुढचा डाव नक्की माझाच’ अशी मृगजळासमान भासणारी आशा मनात धरून शिक्षणात यश संपादन करत नोकरीतसुद्धा पदोन्नती अनुभवत राहिला. मेहनत करून त्याने स्वत:चे घर, वाहन घेतले. घरच्यांनी त्याच्या लग्नाचा विचार करून त्याचा होकार गृहीत धरून त्याला साजेशी रूपवान व सुसंस्कारी मुलगी बघून लग्न करून दिले.

कालांतराने त्याचा संसार वेल बहरू लागला. त्याला मुलगा झाला. इथेच त्याच्या सुखमय आयुष्याला दृष्टही लागली. विवाहपूर्व आयुष्यात अधूनमधून ‘एकच प्याला’ घेणारा राकेश आता मात्र पूर्णत: ‘तळीराम’ झाला. परिस्थितीशी झगडून पदोपदी यश संपादन करत सुखाचा सोपान चढणारा राकेश सोपानाच्या शेवटच्या पायरीवर आपटला. त्याचा संसारपट उद‌्ध्वस्त झाला. मात्र घरच्यांनी योग्य वेळी निर्णय घेऊन त्याला रिहॅबमध्ये आणले. राकेशनेदेखील मी पूर्णत: तुमच्या स्वाधीन असल्याचा निर्णय घेतला. मी त्याच्यावर ‘सायको थेरपी’द्वारा उपचार केले. थेरेपीज् केल्या. आज राकेश तोच सोपान नव्या उमेदीने चढताना बघून मला आनंद वाटत आहे.

असाच एक अजय नावाचा तरुण. लहान वयातच पितृप्रेमाला मुकलेला. आईदेखील जुन्या आजाराने त्रस्त असलेली. त्यात त्याच्यावर दोन लहान भावंडांची जबाबदारी. आईचे औषधपाणी, घरखर्च, भावंडांची देखभाल हे सर्व त्याला एकट्यालाच करावे लागे. इयत्ता सहावीत असताना फी भरण्यास पैसे नसल्याच्या कारणाने शिक्षणाशी फारकत घेऊन १२ वर्षांचा अजय झेपेल तेवढे ओझे, भाजीचे कॅरेट भरून बाजारात सकाळी नेऊ लागला. त्यातून जे पैसे मिळतील त्यात भावंडांचे शिक्षण, आईची औषधे आणत होता. पण कालांतराने त्याचे मातृछत्रदेखील हिरावले गेले. चिकाटीने परिस्थितीशी सामना करत न खचता गॅरेजचे काम शिकला. भावांना शिकवले. आईकडची होती नव्हती तेवढी संपत्ती तिच्या माहेरच्यांनीच लाटली. अजयला पाव आणादेखील मिळाला नाही. तरीसुद्धा स्वबवळावर अजय जुन्या वाड्यातून निघून १०X१०ची खोली भाड्याने घेऊन भावंडांसमवेत राहू लागला. त्याचा मनमिळाऊ स्वभाव व प्रामाणिक वागण्याने समाजात चांगली ओळख असल्याने भाऊबहिणींस नोकरी व्यवसाय मिळवून दिला व स्वत: ड्रायव्हिंग शिकून चांगल्या ठिकाणी नोकरीत लागला.

पैसा कमावू लागला. फ्लॅटमध्ये राहायला गेला. अशातच त्याचे लग्न झाले. पैसा आला तसे त्याच्याशी संबंध न ठेवणारे नातलग अवतीभोवती पिंगा घालू लागले. अजय भूतकाळात जाऊ लागला. एक-एक प्रसंग आठवला की, नातेवाइकांची त्याला चीड येऊ लागली. त्याचे डोके सुन्न होऊ लागले. त्याची अक्षरश: झोप उडाली. शेवटी त्याने ‘मदिरे’चा आधार घेतला. त्यात तो आकंठ बुडाला. मात्र त्याच्या भावंडांनी मोठ्या भावाने आई-बापाचे कर्तव्य बजावल्याची जाणीव ठेवून त्याला रिहॅबमध्ये आणण्याचा ‘निर्णय’ घेऊन त्याला वेळीच दाखल केले. मेन्टल थेरपी, फिजिकल थेरपी, फन थेरपीचा योग्य परिणाम होऊन अजय आज मला म्हणाला, “सर पहिला घोट घेताना घ्यावा की न घ्यावा, अशा निर्णायक प्रसंगी जर मी न घेण्याचा ‘निर्णय’ घेतला असता तर?’’

संबंधित तथा आपणासारख्या सुज्ञ व सुजाण वाचकांनी व्यसनाधीन व्यक्तींबाबत योग्य निर्णय घेऊन त्यांचे व्यसन सोडविणे निर्णायक ठरविणे योग्य होणार नाही का? शेवटी ‘निर्णय’च महत्त्वाचा!

नीलेश राजहंस
nileshsoberlife@gmail.com
बातम्या आणखी आहेत...