आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षण एक प्रकाशाचा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यसनी अवस्थेत चित्रविचित्र भास होण्याच्या स्थितीतून बाहेर आल्यावर जयंताच्या तब्येतीत सुधारणा होत होती. मोकळेढाकळे वातावरण, टापटीपपणा, आवारातील सुंदर व फुललेली झाडे, तसेच प्रसन्न बैठक व्यवस्था हे बघून त्याला आपण ‘रिहॅब सेंटर’मध्ये आहोत, असे जाणवत नव्हते. तो सेंटरच्या सकाळ ते रात्रीपर्यंतच्या दिनक्रमांत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊ लागला होता. दिनक्रमाचा अविभाज्य घटक असलेल्या ‘वीक अँड स्ट्राँग थेरपी’ दरम्यान तो गतकाळातील घटनांना एक एक करून उजाळा देऊ लागला. मनाला बोचणार्‍या, आनंददायक घटना सांगत असताना मनाचा कमकुवतपणा, स्वभावदोष व स्वभावगुण यांमधील फरक त्याच्या निदर्शनास आले. आपण नेमक्या कोणत्या कारणांमुळे व्यसनांकडे वळलो, याची जाणीव त्याला हळूहळू होऊ लागली. त्याचबरोबर खोटे बोलून काय झाले? व खरे बोलून काय होते? यामधील भेद त्याच्या लक्षात आले. जसे एखादे झाड उंच असते, तेवढीच त्याची पाळेमुळे खोलवर घट्ट रुजलेली असतात. त्यानुसार आपल्या मनात अनेक चांगल्या-वाईट विचारांचे जाळे खोलवर घट्ट रुजलेले असते. त्यातून आपल्याला त्रासदायक विचार बाहेर काढायचे आणि त्या जागी नवीन आल्हाददायक विचार रुजवायचे असतात. शेवटी, व्यसनाधीनता हा एक विचारांचा आजार असतो. तो विचारांनीच बरा होऊ शकतो.

व्यसन करणारा जसा एका दिवसात व्यसनी होत नाही, तसेच त्याच्या स्वभावातदेखील अचानकपणे बदल होत नाहीत. त्याकरिता, त्याला मानसिक उपचार किंवा मानसिक आधाराची नितांत गरज असते. यामधून बाहेर येण्यास त्यास पुरेसा वेळ देण्याची आवश्यकता असते. अनिश नावाचा २३ वर्षांचा तरुण रिहॅब सेंटरमध्ये आला असताना, माझ्या असे निदर्शनास आले की, तो सतत ‘डिप्रेशन’मध्ये असतो. त्यामुळे तो सतत एकटाच राहतो किंवा एकटा राहणे पसंत करतो. एकदा मी त्याच्या जवळ जाऊन प्रेमाने बोलण्यास सुरुवात करणार, तोच तो चिडक्या स्वरात म्हणाला, ‘मला इथे का आणले? मला इथे ठेवून काहीही उपयोग होणार नाही. गेली चार-पाच वर्षं मी असेच आयुष्य जगतो आहे. उर्वरित आयुष्यसुद्धा असेच जाईल. माझ्या नशिबी जर असेच जगणे आहे, तर त्याला कोण काय करू शकेल आणि तुम्हीसुद्धा काय करणार?’

त्याचे असे नैराश्यपूर्ण बोल ऐकताच मला संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आठवला, ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’. व्यसनाधीन व्यक्तींनी दुर्गुणांवर मात करावी, यासाठी एक विशिष्ट पद्धती मानसोपचारादरम्यान वापरली जातेच. त्यानुसार मी अनिशला त्याचे स्वभावदोष न सांगता त्याच्यात असलेल्या स्वभावगुण व कलागुणांची प्राधान्याने जाणीव करून दिली. त्यामुळे आमच्यात मैत्रीचा पूल आपोआप बांधला गेला. नंतर मी त्याला रिहॅब सेंटरमधील दैनंदिनीची आणि इतर कार्यपद्धतीची माहिती दिली. आता तो स्वेच्छेने दैनंदिनीत सहभागी होऊ लागला. कालांतराने वेगवेगळ्या ‘थेरपी’ आणि ‘अ‍ॅक्टिव्हिटी’त भाग घेत असताना आत्मविश्वास वाढू लागल्याचे त्याने प्रामाणिकपणे मान्य केले.

अनिश आता स्वत:हून त्याला असणार्‍या शंकांची उत्तरे मिळवू लागला. जास्तीत जास्त जबाबदारी स्वीकारून ती जबाबदारी पूर्ण करण्याचाही प्रामाणिकपणे प्रयत्न करू लागला. यामुळे आपल्यात विधायक काम करण्याची क्षमता आहे, याची त्याला जाणीव झाली. नंतर त्याला आपण आपला स्वत:चा व दुसर्‍याचा आदर कसा राखावा, प्रत्येकाशी आदराने वागणे, बोलणे कसे असावे, याबद्दल समजावले. अशा प्रकारे अनिश दुष्टचक्रातून बाहेर आलाच; परंतु त्याच्यासारख्याच इतरांनीही हे साध्य केले.

एकदा सेंटरमध्ये दैनंदिनी करीत असताना साधारणत: ४५ ते ५० वय असलेल्या दोन व्यक्ती भेटायला आल्या. स्वत:चा परिचय देऊन मला तुमच्याशी काही बोलायचे आहे, असे त्यांनी सांगितले. बोलताना सुरुवात कशी करावी, हे त्यांना सुचत नव्हते. परंतु त्यांना धीर दिल्यावर ते सांगू लागले, ‘माझ्या जिवलग मित्राचा मुलगा काही विचित्र व्यसन करतो. ते नेमके काय आहे? तो कशाची नशा करतो? हे नेमके कोणालाच कळत नाही. त्यामुळे आम्ही सर्व चिंतित आहोत.’ त्यावर मी त्यांना त्याचे नाव व वय विचारले असता विवेक नावाचा हा मुलगा नवव्या इयत्तेत शिकत असल्याचे कळले. पुढे ते म्हणाले, ‘तो वेळेवर घरातून निघतो. शाळेतूनदेखील वेळेवर घरी येतो. तसेच ट्यूशनलाही जातो, असे सांगतो. परंतु शाळेत गेल्यावर कळले की, विवेक शाळेत गैरहजर असतो. शिक्षकांशी खोटे बोलतो. त्यांना अपमानित करतो. चौकशीअंती कळले की, आवाराबाहेरील वयाने मोठ्या असलेल्या काही टवाळखोर व व्यसनी मुलांबरोबरच त्याची मैत्री आहे.’
हे सर्व ऐकल्यावर मी त्याला सेंटरमध्ये घेऊन येण्यास सांगितले. दुसर्‍या दिवशी विवेक सेंटरमध्ये आला. तो आला तेव्हा खूप घाबरलेला होता. आई-वडील निघून गेल्यावर तर जास्तच गोंधळला. मला ते लक्षात येताच, त्याला मी जवळ घेतले. मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तो गहिवरला, रडू लागला. त्यानंतर त्याने त्याची सर्व हकीगत सांगितली. त्यानंतरचे त्याचे दोन दिवस सेंटरमधल्या वातावरणाशी जुळवून घेण्यात गेले. मग आपण इथे राहून आपल्या वाईट सवयी सोडून चांगले वागू शकतो, असे त्याला वाटू लागले.

हळूहळू विवेक विविध प्रकारचे खेळ, जसे ट्रेझर हंट, क्लॅपिंग गेम, क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ यामध्ये रमू लागला. आपण मनापासून प्रयत्न केले तर निश्चितच बरे होऊ, याची त्याला खात्री पटली. या क्षणी जर त्याने असहकार पुकारला असता, तर प्रकाशाच्या दिशेने त्याने वाटचाल केलीच नसती. परंतु, वातावरण बदलले, आसपासची माणसं बदलली, तसे विवेकच्या विचारांतही बदल घडून आले.

अनिश असो वा विवेक, खरा प्रश्न विचारात बदल घडवण्याचा असतो. मनुष्य मुळातच विचारी असतो. परंतु, परिस्थिती, वातावरण, संगत यामुळे त्याचे पाऊल चुकते. परंतु मन आणि बुद्धिरूपी कॅमेर्‍यात सुविचारांचे रोल घालून प्रयत्नरूपी बटण दाबल्यास यशाचे फोटो बाहेर येण्यास फारसा वेळ लागत नाही...
nileshsoberlife@gmail.com