आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nilesh Zalate's Article On Situation Of Nilesh Bhil

शौर्याच्या दारी... अंधाराची वस्ती...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव जिल्ह्यातल्या कोथळी गावच्या निलेश भिलचा यंदा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्यपदक देऊन गौरव केला गेला. उजाड वस्तीत राहणाऱ्या एका धैर्यवानाचा शोध घेतला गेला, याबद्दल शासन-प्रशासनाचे आभारच आहेत. परंतु या निमित्ताने निलेशसारख्याच गरिबीने लादलेल्या अंधारयात्रेचे सोबती असलेल्या इतरही समाजघटकांची सत्ताधारी आणि विरोधकांनी पुरेशा गांभीर्याने दखल घेतली आहे का? निलेश आणि त्याची आई शौर्य पदक स्वीकारण्यासाठी दिल्लीला गेले असताना, इकडे फाटक्या झोपडीत त्याचे वडील आणि इतर भावंडं दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत होते, याची जाण ही व्यवस्था याही पुढे ठेवणार का? की ‘मुलगा शोधला, त्याला शौर्यपदक दिले, आमचे कर्तव्य संपले’, ही परिचित भाषाच कानी पडत राहणार ...
काय घडली होती घटना
३० ऑगस्ट रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी बुलडाण्याचे ओंकार उगले हे कुटुंबीयांसह संत मुक्ताईच्या दर्शनासाठी आले होते. तेथे पूर्णा नदीचे बॅक वॉटर मंदिराच्या समोरच्या बाजूस सोडून घाट तयार करण्यात आला आहे. ओंकार उगलेंचा एकुलता एक मुलगा भागवत उगले (वय वर्षे ११) घाटावर हातपाय धुण्यासाठी गेला असता, पाय घसरून पाण्यात पडला. मुलगा गटांगळ्या खाताना दिसताच त्याच्या आईने आरडाओरड सुरू केली. पाणी खोल असल्याने मुलगा बुडू लागला. ही घटना लक्षात येताच मंदिरात दर्शनासाठी आलेल्या निलेशने कशाचीही पर्वा न करता खोल पाण्यात सूर मारला आणि त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या भागवतचे प्राण वाचविले. बघता बघता निलेशच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक झाले. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन यांच्या हस्ते त्याचा सत्कार झाला. शाळेने आणि स्थानिक नेत्यांनी पुरस्कारासाठी त्याची शिफारस केली. यथावकाश महाराष्ट्रातल्या इतर बालकांसह त्याची राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली.

राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री एकनाथराव खडसे अर्थात नाथाभाऊ, यांचं मुक्ताईनगर तालुक्यातलं कोथळी हे जन्मगाव. नाथाभाऊ यांच्यामुळेच हे गाव चर्चेत आणि आकर्षणाचं केंद्रही. पण आता हे गाव आणखी एका कारणाने चर्चेत आलं आहे. ते कारण ठरला आहे, निलेश भिल. महाराष्ट्रातून ज्या चार मुलांना यंदा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाले, त्यातला हा निलेश. १० वर्षांचा एक आदिवासी मुलगा. त्याचं कर्तृत्व निश्चितच गावाचा अभिमान वाढवणारं.
जळगावपासून ६०-६५ किमी अंतरावरचं हे गाव. संत मुक्ताईचे तीर्थक्षेत्र म्हणूनही जुन्या पिढीत परिचित. पण गावाच्या आकर्षक कमानीतून दुतर्फा झाडे असलेल्या रस्त्यावरून गावात प्रवेश केला की अंदाज येतोच की, आता हे गाव नाथाभाऊंचे आहे. गाव बऱ्यापैकी सुधारलेले. प्रशस्त घरं, साफसुथरे रस्ते आणि गावाची शाळा वेगळी ओळख करून देत होते. गावात येताच एका ५० वर्षांच्या गृहस्थांना निलेशबद्दल विचारलं, तर ते स्वत:ची गाडी घेऊन आम्हाला भिल वाड्याकडे घेऊन गेले. तिथे विचारपूस केली, तर समजलं की, त्याचं कुटुंब खदानीकडे राहतं. मग थेट निलेशच्या शाळेत पोहोचलो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथळी. याच शाळेत एकनाथ खडसेसुद्धा शिकलेले. शाळेत पोहोचल्यावर समजले, निलेश गावात नाही. तो आणि त्याची आई शिक्षकांसोबत दिल्लीला गेले आहेत, २६ जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार स्वीकारायला. प्राथमिक शाळेत विषयवार अनेक फायली असतात. पण एखाद्या विद्यार्थ्याची ‘स्पेशल फाइल’ या शाळेत पहिल्यांदाच तयार झाली आहे. शिक्षक कौतुकाने आम्हाला निलेशची ती फाइल दाखवत माहिती देत होते. निलेशचे शाळासोबती, मित्र, शिक्षक साऱ्यांच्याच चेहऱ्यावर अभिमान झळकत होता. आम्हालाही त्यांचं खूप अप्रूप वाटत होतं.

शाळेची भेट आटोपून आम्ही निलेशच्या दोन किमी दूर असलेल्या घरी निघालो. सोबतीला त्याचा मित्र राजपाल होता. जिथे गावाची आकर्षक कमान आणि रस्ता सुरू होतो, तिथूनच एक कच्चा रस्ता फोडलेल्या डोंगराच्या कुशीतून निलेशच्या घराकडे जात होता. प्रचंड धूळ उडवत खडी क्रशरच्या प्रचंड आवाजाचा सामना करत एका उजाड अशा वस्तीवर आम्ही पोहोचलो. सगळीकडे धूळच धूळ होती. सगळी माणसं त्या धुळीने काळवंडलेली दिसत होती. कुठल्याही प्रकारची मूलभूत सोय नसलेल्या या वस्तीत प्रत्येक झोपडीच्या बाहेर तीन दगड लावून असलेलं अद्भुत किचन नजरेस पडत होतं. लहान-लहान पोरं-पोरी दुरून डोक्यावर हंडा, कळशांनी ढेकळांची रानं तुडवत पाणी आणताना दिसत होती. या वस्तीवरचे जवळपास सगळे कुटुंबप्रमुख त्या क्रशरवर दगड फोडण्याचं आणि ते उचलण्याचं कामं करतात. राजपालने आम्हाला एका ठिकाणी थांबवलं आणि एका कुडाच्या तुटक्या झोपडीकडे इशारा करत म्हटलं, हेच निलेशचं घर आहे...
आम्ही जसजसं झोपडीकडे जात होतो, तसं तिकडून एक इसम आमच्याकडे आशाळभूत नजरेने पाहात आमच्या दिशेने आला. तो इसम म्हणजे, रेवाराम भिल. निलेशचा जन्मदाता बाप. रेवाराम आम्हाला झोपडीकडे घेऊन गेले. झोपडीची अवस्था एकंदरीतच बिकट. ६ डिग्री तापमानात, कडाक्याची थंडी सोसत सगळीकडून उघड्या असलेल्या, या आशियान्यात ही माणसं कशी बरं राहात असतील? हा सवाल झर्रदिशी डोक्यात आला. निलेशचे दोन लहान भाऊ अनवाणी पायाने कुडाला टेकूनच उभे होते. आत चार-पाच कळकट भांडी आणि बाकीचा संसार त्या झोपडीच्या बाहेरच. मी त्यांना एक फोटो हवा आहे, असं म्हणून झोपडीसमोर उभे केले.
रेवाराम, त्यांची दोन मुले, आणि झोपडी असे फोटो घेताना, मला निलेशच्या धाडसी गोष्टीतली झोपडी अतिमहत्त्वाची वाटली. फोटोसाठी उभ्या निलेशच्या कुटुंबीयांच्या नजरेतली आशाळभूत दाहकता डोक्यात असंख्य प्रश्नांचं काहूर निर्माण करून गेली. सर्वात महत्त्वाचा सवाल हा डोक्यात आला की, गाव एवढं सुजलाम-सुफलाम बनवणाऱ्या नेत्याला या झोपडीत राहणाऱ्या लोकांचं जगणं का बरं दिसलं नाही? हा प्रचंड विरोधाभास मनाला अस्वस्थ करून गेला. पण आता याच झोपडीत अत्यंत मानाचा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार आता फोटो फ्रेम आणि पदकाच्या रूपाने दिसणार आहे... या झोपडीचे फोटो काढायला आता तुफान गर्दी होत आहे. निलेशइतकीच त्याची ही झोपडीही ‘टॉक ऑफ द टाऊन’ होतेय...
पुढील स्लाइड्सवर वाचा, निलेशला विशेष काहीच मदत नाही....
- मोदी सरकारले काय म्हणला निलेश...
-आणि पाहा त्याची दयनिय परिस्थिती...