आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ कुमारिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सोन्याच्या पाटल्या घेईन बाईसाहेब,’
सुईण म्हणाली.
झन... झनन... नन... नन... नन... नन, मोठी परात वाजू लागली.
सर्व गावात बातमी पसरली की, जहागीरदारांच्या घरी पुत्ररत्न जन्मास आले आहे. मिशांवर ताव देत सूरजप्रकाश दरवाजात येऊन उभा राहिला. फुगून छाती दुप्पट झाली होती. गावातले लोक अभिनंदन करावयास, आनंद जाहीर करावयास येत होते. तोंड गोड करून परतत होते. आज सूरजप्रकाशकडे जणू जत्रा भरली होती. त्याच्या कानाला सतत मोबाइल होता. हास्याचे फवारे वातावरणात सतत मिठास घोळत होते. सूरजप्रकाशचा धाकटा भाऊ चंद्रप्रकाश सिंगापुरात राहत असे. त्याचे संपूर्ण कुटुंब अभिनंदन करत होते. सूरजप्रकाशच्या आवाजात अशी बुलंदी होती, जणू काही त्यांनी युद्ध जिंकले होते. दहा दिवसांनंतर विहिरीचे पूजन झाले, सूर्यपूजा झाली. मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना हाताचे छाप लागले. सूरजप्रकाशचा वंश एक हात वाढला. कुलदीपक अवतरला होता. सव्वा महिन्याने पूजन झाले. गोवर्धन पूजा झाली. प्रदक्षिणा घातल्या गेल्या. आता फक्त एक नवस फेडावयाचा शिल्लक उरला होता. नवरात्रीच्या दिवसांत दुर्गाष्टमीच्या दिवशी नऊ कुमारिकांचे जेवण करायचे. नंतर दक्षिणा द्यायची आणि मग गावजेवण. त्यानंतर जावळ. बस्स. दीपक चंद्रकलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढत होता. त्याच्या बाललीला कुटुंबीयांना मोहून टाकत असत. नारळाच्या दुधासारखा शुभ्र वर्ण, हरणासारखे मोठे आणि चंचल डोळे, सुबक ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे, धारदार नाक, रुंद खांदे, चंचल नजर मन मोहून घेई. आता दीपक गुडघ्यांवर रांगू लागला. भिंतीला हात टेकून उभा राहू लागला. खुदकन हसल्यावर त्याचे मोत्यासारखे दोन दात चमकू लागत. नवरात्रीच्या ब-याच आधी सूरजप्रकाशने नातेवाइकांना फोन केले होते. जावळासाठी निमंत्रणे धाडली होती. चंद्रप्रकाशला निमंत्रणासोबत जिव्हाळ्याने पत्र धाडले होते. पत्रात मजकूर होता, ‘चंदू, तू सहकुटुंब या कार्यास हजर असावेस, अशी माझी इच्छा आहे. तूसुद्धा देवीआईपाशी नवस बोल. तुझा वंशही माझ्यासारखा वृद्धिंगत होईल. मुलींचे काय घेऊन बसलास? ते परके धन. दोन्ही पोरी एक दिवस तुला सोडून सासरी जातील. मुलगा असला की सून येते. गरमगरम भाकरी रांधून वाढते. म्हातारपणाला आधार हवा ना? नाही तर तुझ्याबरोबर वंश बुडतीला लागेल.’


चंद्रप्रकाशने उलट टपाली कळवले, ‘बरे आहे. मी सहकुटुंब येत आहे.’
सूरजप्रकाश श्रद्धेने, आस्थेने गावजेवणाच्या तयारीस लागला. नवस फेडला जाणार म्हणून तो प्रफुल्लित होता. देवीच्या देवळाच्या सोप्यावर ग्रॅनाइट, संगमरवरी दगड लागत होते. सूरजप्रकाश जातीने सर्व सामानाची निवड करून देवळावर पोहोचवत होता. कुमारिकांसाठी पोशाख, खेळणी, देवीआईच्या प्रतिमा वगैरे सर्व जय्यत होते. गडीमाणसांना फर्मान जारी झाले होते की, अष्टमीच्या दिवशी गाडी सजवून कुमारिकांना बसवून आणायचे. त्यांना जेवू घातल्यानंतर घरी सुखरूप पोहोचवायचे. नवरात्र आले. विलायतेहून चंद्रप्रकाश सहकुटुंब आला. उषा शिकलीसवरली होती. आल्याबरोबर तिने घरातल्या सर्व कामांची जबाबदारी पत्करली. पण एक गोष्ट तिच्या मनात सलत असे, दादासाहेबांनी कधीही तिच्या दोन मुलींच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला नाही. प्रेमाने जवळ घेतले नाही. कधीही आशीर्वाद दिला नाही. त्या समोर आल्या तर उपहासाने, हेटाळणीच्या सुरातच बोलत असत. ती विचार करत असे की, थोड्या दिवसांचा प्रश्न आहे; आम्हाला इथं जन्मभर थोडंच राहायचं आहे.


देवळात कलशस्थापना झाली. अखंड ज्योत, होमहवन, रामायणाचे अखंड पारायण वगैरे सकाळच्या प्रहरी सुरू होत असे. आज अष्टमी होती. सूरजप्रकाश खुशीत होता. लांबलचक आणि मोठा शामियाना उभारला गेला होता. एका बाजूला खाटेवर मोठ्या परातींमध्ये लाडू सजले होते. गरमगरम पु-यांची रास लागत होती. गावातल्या इतरांची झुंबड होतीच. शामियाना खच्चून भरला होता. कुमारिकांचे पूजन आणि जेवण याचा उत्साह होता; पण आधी कुमारिका जेवल्या पाहिजेत, मगच इतरांचे जेवण व्हायचे. जशी संध्याकाळ झाली तसा अंधार पसरत गेला.


आकाशात चांदणे टिमटिमू लागले. सूरजप्रकाशला नवस फेडायची घाई झाली होती. त्याचे डोळे कुमारिकांच्या येण्याकडे लागले होते. जसा अंधार वाढत गेला तशी त्याची अस्वस्थता वाढत गेली. त्याच्या दृष्टिक्षेपात अजूनही गडीमाणसे नव्हती. आता लोकांत खुसफूस सुरू झाली. हळूहळू सबंध गाव अंधारात बुडाले. वाढत्या अंधाराबरोबर सूरजप्रकाशच्या काळजाचे ठोके वाढू लागले.


सूरजप्रकाशचा चेहरा काळवंडला. जणू त्याला राहूने ग्रासले होते. त्याचा आवाज मंद पडला. ललाटावर काळजीने आठ्या पडल्या. मान खाली पडली. रात्रीचे पावणेनऊ वाजून गेले. कुमारिका आणि गडीमाणसांचा पत्ता नव्हता. हळूहळू लोक जाऊ लागले. काही सूरजचा डोळा चुकवून जाऊ लागले. भाजी, पु-या थंड होऊ लागल्या. लाडवांवर माशा भिणभिणू लागल्या. चुलीची आंच मंदावू लागली. शामियान्यात इकडून तिकडे कुत्री फिरू लागली. सगळीकडे स्मशानशांतता भासू लागली. देवळाच्या चौथ-यावर सूरजप्रकाश, चंद्रप्रकाश, आचारी आणि गुरुजी थकून बसले.

(पूर्वार्ध )

अनुवाद : अरविंद दाभोळकर