आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठीण समय येता मित्र धावून येतात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2007 मध्ये शिक्षणासाठी मुंबईत राहायला होतो. सप्टेंबर महिन्यात एकदा एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी पुण्याला जायचं होतं. दादर स्टेशनवर आलो. सकाळचे 7.53 वाजले होते. आता मी मुंबईत चांगलाच रुळलो होतो. मला काय झालं होतं कोणास ठाऊक पण मी उगीच घाई केली. सुटलेली इंद्रायणी गाडी पकडायचा प्रयत्न केला. हात सुटला आणि पडलो. कमरेखालचा भाग प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यामध्ये अडकला. राहिलेल्या सहा बोगी घासतच गेल्या. खाली पडलो. शरीर बधिर झालं होतं. पण शुद्धीवर होतो. पोलिस तिथून दिसत होते पण अपघात झाल्याचे त्यांच्या ध्यानात आले नाही. लोक गोळा झाले. एका मित्राचा मोबाइल नंबर पाठच होता, त्याला बोलावण्यात आलं.

अ‍ॅम्ब्युलन्स आली. मित्र व विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते आले. सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तीन दिवस आयसीयूत होतो, पण तेव्हाचं मला काहीच आठवत नाही. अधूनमधून आई यायची इतकं आठवतं. कमरेच्या हाडाचे तीन तुकडे झाले होते. मी हेवीवेट (85 किलो) असल्यामुळेच मांडीचे हाड तुटले नाही. मांडीच्या हाडापर्यंतचे सगळे स्नायू कापले गेले होते.

चार महिने मला बेडवरून उठताच येत नव्हतं. त्यामुळे झोपूनच असायचो. सामाजिक चळवळीत काम करणार्‍या कार्यकर्त्यांना नेहमी ऐकावं लागतं, की बंद करा लष्कराच्या भाकर्‍या भाजणं वगैरे. पण या अपघातामुळे मला चार लोकांत काम करण्याचं महत्त्व प्रकर्षाने जाणवलं. मी विवेकानंद केंद्राच्या कामाशी जोडला गेलो असल्याने व परिवारातील अन्य संस्थांच्या कार्यकर्त्यांशीही जिवाभावाचे बंध तयार झाले होते. त्यामुळे सतत कुणी ना कुणी भेटायला यायचे. कित्येकदा आपला प्रत्यक्ष परिचय नसलेली माणसेही पुष्कळ असायची. रक्ताचे नातेसंबंध नसतानाही दोन तीन तास प्रवास करून कितीतरी जण यायचे. आस्थेने विचारपूस करायचे. कार्यकर्ते शिफ्टमध्ये थांबायचे. यामुळे आधार वाटायचा. निराशा जवळही फिरकत नसे. लोक भेटायला येतात, त्यातही एक मोठा आनंद असतो. आपल्या मुलाला चालता येत नाहीय, पुढे चालताच येणार नाही का याची चिंता आई-बाबांच्या चेहर्‍यांवर स्पष्ट दिसायची. बाकीच्या तरुणांप्रमाणे माझा मुलगा चालू शकत नाही, याची अस्वस्थता जाणवायची.

सोलापुरात असताना वडिलांनी पॉकेटमनी कधी हातावर टेकवल्याचं आठवत नाही. घरीही वायफळ खर्च केलेलं त्यांना आवडायचं नाही. त्यामुळे मला वडील कंजूष वाटायचे. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. आता माझे बाबा मला खूपच उदार झाल्याचे दिसत होते. औषधपाण्यासाठी खर्च करताना ते मला दिसत होते. बाबांची ती काटकसर अस्थानी नव्हती, हे मला ध्यानी आलं.

अपघात होऊन चार महिने लोटले तरी मला उभं राहता येत नव्हतं. एके दिवशी मला उभं करण्याचा प्रयत्न झाला, पण मी गळून पडलो. पहिल्यांदाच मनात शंका येऊन गेली मी पुन्हा माझ्या पायांवर उभं राहू शकेन की नाही. खूप दिवस झोपून असल्याने असे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सर्वांनी धीर दिला. अनेकांनी अनेक प्रकारे मदत केली. उपचार सुरूच होते. हळूहळू जखम भरून येऊ लागली. दीड-दोन वर्षांत पूर्ववत चालू फिरू लागलो. पत्रकारितेतलं शिक्षण पूर्ण केले. आज या व्यवसायात पत्रकार म्हणून काम करतोय. आज मागे वळून पाहतो तेव्हा असं वाटतं की आजारपण, अपघात टाळायचा आपण प्रयत्न करू शकतो. पण पूर्णपणे टाळणे प्रत्येक वेळी शक्य होतंच असं नाही. आपण चार लोकं जोडली असली तरी तीच कठीण समयी शक्ती बनून आपली सोबत करते. बिझी लाइफ म्हणून रडत बसण्यापेक्षा दिवसातून, आठवड्यातून थोडासा वेळ चांगली कामे करणार्‍या संस्था संघटनांसाठी द्यावा. काहीही मोबदल्याची अपेक्षा न करता निखळ मैत्री करावी. या आजारपणात प्रणव बोंदे आणि सुनील कुलकर्णी या मित्रांची खंबीर साथ मिळाली होती हे आवर्जून नमूद केले पाहिजे.
शब्दांकन : सिद्धाराम भै. पाटील