आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोविकारतज्ज्ञ फक्त वेड्यांचे डाॅक्टर नव्हेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनोविकार : वेड लागले तरच मनोविकारतज्ज्ञांकडे जातात हा निव्वळ गैरसमज आहे. लौकिक अर्थाने समाज ज्यांना वेडा म्हणतो अशांचे प्रमाण १० टक्के असते. उर्वरित सर्व लोक उतमरीत्या कार्यरत पण सल्ला घेणारे असतात.
एखाद्या व्यक्तीला कुणी डाॅक्टर, नातेवाईक किंवा परिचिताने मनोविकारतज्ज्ञाला दाखवा, असा सल्ला दिल्यास अजूनही बरेचदा मला काय वेड लागले आहे का? अशी प्रतिक्रिया मिळते. त्यामुळेच अगदी आवश्यकता असूनही रुग्ण किंवा नातेवाइकाच्या विरोधामुळे मनोविकारावर योग्य उपचार होत नाहीत किंवा फार उशिरा मनोविकारतज्ज्ञांपर्यंत पोहोचल्याने आजार गंभीर बनतो, उपचाराचा कालावधी लांबतो. केवळ वेड लागले तरच मनोविकारतज्ज्ञांकडे जातात हा निव्वळ गैरसमज आहे. मनोविकारतज्ज्ञांकडे उपचारासाठी जाणाऱ्यांपैकी लौकिक अर्थाने समाज ज्यांना वेडा म्हणतो अशांचे प्रमाण फार तर १० टक्के असते. उर्वरित सर्व लोक उतमरीत्या समाजात कार्यरत असलेले पण विविध कारणांसाठी सल्ला घेणारे असतात. तीव्र स्वरुपाचा स्किझोफ्रेनिया किंवा मूड डिसआॅर्डर या आजारांच्या रुग्णामध्ये असंबद्ध बोलणे, मनाशी बडबडणे, हसणे, मारहाण करणे, कपड्यांचे भान नसणे, अशी वेडेपणाची लक्षणे असतात. असे अल्प प्रमाणातील रुग्ण सोडल्यास इतर विविध कारणांसाठी मनोविकारतज्ज्ञांकडे उपचार घेणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. यामध्ये साधारणपणे खाली व्याधींनी ग्रस्त रुग्णांचा समावेश होतो. मनुष्याला निरामय आयुष्य जगण्यासाठी निरोगी शरीर आणि निरोगी मन या दोन्हीची आवश्यकता आहे. म्हणूनच शरीराच्या रोगाप्रमाणे मनाच्या विविध समस्येसाठी त्वरित उपचार करून आपण सुखाने आयुष्य जगू शकतो.

मानसिक आजार
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकसंख्येच्या जवळपास २० टक्के लोकांना नैराश्य किंवा चिंतेचे आजार जडले आहेत. त्यांना होणारा त्रास इतरांना लक्षात येण्यासारखा नसला तरी स्वत:ला त्रस्त करणारा असतो. बाह्यरुग्ण विभागात अशा रुग्णांची संख्या मोठी असते. फिजिशियन, मेंदूचे तज्ज्ञ, पोटाचे तज्ज्ञ, मधुमेहतज्ज्ञ इत्यादी तज्ज्ञांकडे जाणाऱ्या रुग्णांपैकी जवळपास ३० टक्के लोक हे नैराश्य, चिंतेने (अॅन्झायटी) ग्रासलेले असतात. योग्य मानसोपचाराने काही महिन्यांत उत्तम सुधारणा होते. याशिवाय भीती वाटणे, संशय येणे, विशिष्ट वस्तू वा परिस्थितीची भीती (फोबिया), वारंवार एक विचार किंवा कृती करणे (मंत्रचळ, ओसिडी) इत्यादीचेही अनेक रुग्ण आहेत.
व्यसनाधीनता : व्यसनमुक्ती हा मनोविकार शास्त्रातील एक महत्त्वाचा भाग आहे. दारू, सिगारेट, गांजा, अमली पदार्थ (सध्यातर कोकेन, व्हाइटनर, इंटरनेटचे व्यसन) इत्यादीवर उपचार आवश्यक आहेत. दारूचे व्यसन हा एक गंभीर शारीरिक, मानसिक, सामाजिक आजार आहे. (जो रुग्णासोबतच संपूर्ण कुटुंबाची वाताहत करतो) व्यसनमुक्तीसाठी आता नवनवीन उपचारपद्धती प्रभावीपणे वापरल्या जातात.
मनोकायिक आजार : अनेक रुग्ण असे असतात की ज्यांना वेगवेगळ्या शारीरिक तक्रारी जाणवतात. (जुनाट डोकेदुखी, अंगदुखी, पाठदुखी, पोटदुखी) यासाठी ते विविध तज्ज्ञांना भेटतात. अनेक तपासण्या करतात, पण त्रास कमी होत नाही. याशिवाय अनेक स्त्रियांमध्ये ताणतणावामुळे चक्कर येणे, बेशुद्ध होणे, दातखीळ बसणे इत्यादी त्रास होतात (हिस्टेरिया). अशा सर्व रुग्णांना मनोविकारतज्ज्ञांच्या उपचाराने लक्षणीय फायदा होतो.
ताणतणाव : शहरी लोकसंख्येमध्ये अनेकांना वेगवेगळ्या कारणाने ताणतणाव जाणवतो. ज्याचा त्यांच्या कामावर, तब्येतीवर, नातेसंबंधांवर विपरीत परिणाम होतो. यामध्ये कामाचे, वरिष्ठांचे, परीक्षेचे दडपण / भीती, एकटेपणाची भीती, प्रेमसंबंध तुटल्याने ताण (ब्रेकअप) यापासून ते नवरा बायकोचे, सासू सुनेचे न पटणे अशा विविध गोष्टी असतात. यासाठी शक्यतो औषधीचा वापर न करता समुपदेशन, रिलॅक्सेशन, वेळेचे व्यवस्थापन, व्यायाम इत्यादींनी उपचार केला जातो.
डोकेदुखी (मायग्रेन / टेंशन इत्यादी)
सतत डोकेदुखीचा त्रास होत असल्यास त्याचे लक्षणांवरून किंवा तपासणीने योग्य निदान करून उपचार केले जातात. विशेषत: स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.
झोपेच्या समस्या
विविध कारणांमुळे किंवा विशिष्ट कारण नसतानाही केवळ झोप येत नसेल, झोप आल्यावरही फ्रेश वाटत नसेल थकवा जाणवत असेल. स्वप्नांचा त्रास होत असेल. झोपेत हालचाल, बडबड, घोरणे असल्यास त्यावरही मनोविकारतज्ज्ञ उपचार करतात.
लैंगिक समस्या
पुरुषांच्या लैंगिक समस्या (उदा. ताठरपणाची समस्या, शीघ्रपतन, स्वप्नदोष, इच्छा न होणे) तसेच स्त्रियांच्या लैंगिक समस्येवर उपचार केला जातो.

मतिमंदत्व व लहान मुलांच्या वर्तणूक समस्या
जसे अतिचंचलता, आॅटिझम, अंथरुणात लघवी होणे, अभ्यासात गती नसणे, लक्षात न राहणे, शाळेची भीती वाटणे, चिडचिड करणे, मोठ्यांचे न ऐकणे इत्यादी समस्यांवर मनोविकार तज्ज्ञांद्वारे उपचार होतो.
तसेच वृद्धांच्या मानसिक समस्या
(स्मृतिभ्रंश इत्यादी), इपिलेप्सी किंवा फिटचा आजार, स्वभावदोष, जुळवून घेण्याच्या समस्या (अॅडजेस्टमेंट प्राॅब्लेम), नातेसंबंधाच्या समस्या (रिलेशनशिप प्राॅब्लेम), विवाहपूर्व नंतर समुपदेशन, प्रसूतीनंतर उद्््भवणारे मानसिक आजार, उद्योगधंद्याशी संबंधित समस्या, नैसर्गिक आपत्ती, अपघात, अत्याचार इत्यादींमुळे मानसिक धक्का बसलेल्यांचे उपचार अशा अनेक प्रकारच्या समस्येवर मनोविकारतज्ज्ञ मार्गदर्शन करतात.