आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन हिमयुगांच्या मध्‍यावर ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत थंडीची लाट आली. अमेरिका अंतर्बाह्य गोठली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही परिस्थिती कायम होती. ध्रुवीय चक्रीवादळाचा हा परिणाम आहे, अशा बातम्या डिसेंबर 2013मध्ये भारतीय वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर छापल्या. पण, अशा त-हेची परिस्थिती विसाव्या शतकातच दोन ते तीन वेळा निर्माण होऊन गेलेली होती. विसाव्या शतकामध्ये किमान दोन वेळा नायगारा धबधबा गोठला होता. अठराव्या शतकात युरोप आणि अमेरिकेत 1830-40च्या दरम्यान थंडीचा प्रचंड कडाका पडला होता. या पर्यावरणीय अवस्थेला ‘लिट्ल आइस एज’ म्हटले जाते. विज्ञान कथाकारांनी यावर कादंब-या लिहिल्या होत्या. त्यातली ‘आइस’ या नावाची अ‍ॅना कॅव्हानाची कादंबरी 1967मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या कादंबरीत सध्याच्या युरोप, अमेरिकेपेक्षाही भयानक परिस्थितीचे वर्णन करण्यात आले होते.
किम स्टॅन्ली रॉबिन्सन या लेखकाने नंतर काही काळातच ‘आइस एज’ नावाची कादंबरी लिहिली. त्यातही नव्या हिमयुगाच्या आगमनाचे प्रत्ययकारी चित्रण होते. याशिवाय ‘न्यूक्लिअर विंटर’ नावाची संकल्पनाही ब-याच विज्ञानकथांमध्ये आढळते. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकी जनता बरीच धास्तावलेली होती. रशिया आणि अमेरिका यांनी जर युद्ध पुकारले, तर त्यात अण्वस्त्रांचा वापर केला जाईल, अशी खात्रीच ब-याच जणांना भेडसावत होती. साम्यवादी रशियात लेखकांवर बरीच बंधने होती. त्यामुळे या भीतीला त्यांनी शब्दबद्ध केले नव्हते. तरीही स्टुगार्स्की बंधूंच्या लेखनात कुठे कुठे ही शक्यता डोकावताना दिसते. याउलट, अमेरिकी लेखकांवर अशी विषयांची बंधने नसल्यामुळे ‘अणुयुद्धोत्तर दुर्धर हिवाळा’ ही संकल्पना वारंवार प्रकट होताना दिसते. आण्विक युद्धानंतर जो प्रचंड साधा आणि आण्विक धुरळा उडतो, त्यामुळे पृथ्वीवर हिमयुगासारखी परिस्थिती निर्माण होते. सूर्यदर्शन कठीण होते. सर्वत्र हिमनद्यांचा संचार होतो. विषुववृत्तापर्यंत हिमाच्छादन वाढते. अशा प्रकारची पार्श्वभूमी वापरून त्यातून वाचलेल्या मानवी समूहांचे जीवन, या प्रकारच्या कथा-कादंब-यांमधून चितारण्यात आलेले होते.
अमेरिकेत डिसेंबर 13मध्ये तापमान काही ठिकाणी उणे 51 अंश से.पर्यंत घसरले. पण ही परिस्थिती नवी नाही. प्रत्येक शतकात हे घडते. यासाठी उत्तर ध्रुवीय चक्रीवादळे कारणीभूत ठरतात, हेही आता सिद्ध झाले आहे. ही चक्रीवादळे दोन्ही ध्रुवीय प्रदेशात पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या फिरण्यामुळे होत असतात. दरवर्षी ती इतकी भयावह नसतात. काही वेळा मात्र ‘विअर्डिंग ऑफ द वेदर’ प्रकारातली परिस्थिती उद््भवते. तापलेल्या उत्तर अमेरिकी खंडातली आणि युरोपातली गरम हवा उत्तरेकडे सरकते. त्यामुळे विक्षिप्त जलवायुमानाची (फ्रिक वेदर कंडिशन) परिस्थिती निर्माण होते. ही गरम हवा ध्रुवीय प्रदेशात पोहोचली की ध्रुवीय चक्रीवादळ वर उचलले जाते आणि युरोप, अमेरिकेवर त्यातले थंड वारे पसरतात. याच सुमारास दक्षिण गोलार्धात मात्र सरासरी तापमान वाढते. म्हणजे, एका ध्रुवावर हिमवर्षावासह कडाक्याची थंडी आणि दुस-या ध्रुवावर घामाच्या धारा, असे दृश्य असते.
इथे एक गोष्ट स्पष्ट करणे भाग आहे; ती म्हणजे, पृथ्वीच्या वातावरणाचे, त्यातील बदलाचे, त्या संबंधित घटनांबद्दलचे संशोधन ख-या अर्थाने सुमारे दीडशे वर्षांपूर्वी म्हणजे 1850-60च्या सुमारास सुरू झाले. जोपर्यंत दूरसंवेदन करणारे उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करू लागले नव्हते, तोपर्यंत जागतिक जलवायुमानाबद्दलची परिस्थिती ‘हत्ती आणि सात आंधळे’ अशी होती. त्यानंतर प्रथम ‘मोन्डेक्स’ प्रकल्पातून आणि इतर माहिती संकलनातून जे सत्य समोर आले, ते वैश्विक गोंधळ म्हणजे ‘केऑस’ सिद्धांताने शब्दबद्ध केले. बीजिंगमध्ये एखाद्या फुलपाखराने पंख फडफडवले, तर त्याचा परिणाम म्हणून न्यूयॉर्कमध्ये झंझावात उद््भवू शकतो, अशी ‘केऑस’ सिद्धांताची मांडणी होती. याचा अर्थ, पृथ्वीवरील एका कानाकोप-यातील घटनेचा दुस-या टोकावरील भूभागाच्या पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेतील भयाण गारठा का निर्माण झाला, याची कारणे इतरत्र शोधावी लागतील. या गारठ्याचा अमेरिकेतील पर्यावरणावर जसा परिणाम होईल, तसा तो इतरत्रही होईल; पण तो परिणाम किंवा इतरही अनेक परिणाम उघड व्हायला अजून काही वर्षे जावी लागतील. सध्या भारतात आणि महाराष्ट्रातही अकाली गारठा आणि पावसाच्या घटना घडत आहेत. यामागेही जागतिक स्तरावर घडणा-या घटना कारणीभूत आहेत. फक्त त्या स्थानिक पातळीवर घडत असल्याने आपल्याला त्याची सुसंगती लावता येत नाही.
अमेरिकेच्या जलवायुमानावर अनेक घटक प्रभाव पाडतात. पॅसिफिक महासागराचे तापणे, एलनिनो प्रवाह, गल्फस्ट्रीम, विषुववृत्तीय अटलांटिकमधील परिस्थिती आणि ध्रुवीय वारे हे यातील सहज लक्षात येणारे काही घटक आहेत. याशिवाय ज्वालामुखीचे जगात इतरत्र होणारे उद्रेक, हे जागतिक हवामानासंबंधीचे सर्व अंदाज चुकवू शकतात. 1883 मध्ये क्राकाटोआ (जावा आणि सुमात्रा बेटांदरम्यानचा ज्वालामुखी) नावाच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्यानंतरची काही वर्षे सर्वत्र असाच पर्यावरणीय गोंधळ झाला होता. 1983च्या सुमारास माउंट सेंट हेलेन्स (स्कॅमॅनिआ काउंटी, वॉशिंग्टन, अमेरिका येथील ज्वालामुखी) या ज्वालामुखीनेही जागतिक जलवायुमानाचे अंदाज चुकवले होते. या वर्षी आणि 2013मध्ये जगभर पाच ज्वालामुखींचे उद्रेक झाले. त्यांचे जलवायुमानविषयक परिणाम कळायला वेळ लागेल. तेव्हाच खरे म्हणजे, या घटनेबद्दल अधिक स्पष्टीकरण मिळू शकेल.
आजमितीस अमेरिकेचे राष्ट्रीय धोरण हे अमेरिकेच्या आर्थिक नाड्या हातात असलेले बडे उद्योगधंदे ठरवत आले आहेत. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी पर्यावरणीय प्रश्नांचा वापर करून घेतलेला आहे. 1985च्या सुमारास ओझोन होल अर्थात ओझोन विवराचा खूप गवगवा झाला होता. हे ओझोन विवर खरे म्हणजे ओझोनचा थर विसविशीत व्हायला सीएफसी (क्लोरो फ्लुरो कार्बन्स) कारणीभूत ठरतात, अशी हाकाटी पिटण्यात आली. त्याच सुमारास अमेरिकी रासायनिक उद्योगांनी सीएफसीला पर्यायी रसायने शोधून काढली, मग विविध जागतिक संघटनांद्वारे ती इतर म्हणजे बहुतांश विकसनशील देशांच्या गळ्यात बांधून भरपूर पैसा कमावला. त्यानंतर पद्धतशीरपणे ओझोन थराबद्दलची हाकाटी कमी झाली. ओझोन विवर मागे पडले आणि मग जागतिक तापमानवाढीबद्दल ओरड सुरू झाली. खरे तर पृथ्वीवरील इतर कुठल्याही देशापेक्षा जास्त कारखाने आणि जास्त पेट्रोल जाळणा-या महागड्या गाड्या एकट्या अमेरिकेत आहेत. जागतिक परिषदांमध्ये प्रदूषण कमी करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा स्टॉकहोम, जोहान्सबर्ग, रिओ व अशा इतरही अनेक परिषदांमध्ये अमेरिकेने स्वत:वर कुठलीही बंधने घालून द्यायला नकार दिला आहे. राशेल कार्सनपासून (‘सायलेंट स्प्रिंग’ या गाजलेल्या पुस्तकाच्या लेखिका आणि जागतिक कीर्तीच्या पर्यावरणतज्ज्ञ) अनेक पर्यावरणतज्ज्ञांना अमेरिकी उद्योगधंद्यांनी आपला शत्रू मानले आहे.
या उद्योगांनी आम्ल पर्जन्याच्या प्रश्नावर बोलायचे टाळले आहे. एवढेच नव्हे, तर मोटारींमुळे होणारे प्रदूषण दुर्लक्षित राहावे, म्हणून गाईची ढेकर, गोव-या जाळणे आदी मुख्यत: विकसनशील देशांतील परंपरेने चालत आलेल्या इंधन स्रोताशी संबंधित क्रियांना जागतिक तापमानवाढीसाठी जबाबदार ठरवले आहे. ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी सायन्स अँड टेक्नोलॉजी या नियतकालिकाचे मुख्य संपादक असलेल्या लॉरेन्स हेक्ट यांनी, 1993मध्येच जागतिक तापमानवाढ ही बकवास असून सध्याच्या जलवायुमानातील गडबड ही आगामी हिमयुगाची नांदी असू शकते, असा इशारा दिला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपण दोन हिमयुगांच्या मध्ये असून त्या हिमयुगातील मधला काळ संपत आलेला असू शकतो. हिमयुग एका दिवसात येत नाही, असे त्यांनी म्हटले होते. हिमयुग ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे, असेही त्यांचे म्हणणे होते; पण तिकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले गेले.
आतापर्यंतचे जाणवले गेलेले पर्यावरणाचे प्रश्न हे नेहमीच अमेरिकी उद्योगधंद्यांच्या अर्थकारणाशी संबंधित आहेत. युद्ध करून जगावर सत्ता गाजवणे किंवा नवी भूमी पादाक्रांत करणे शक्य नाही, हे उमजलेल्या अमेरिकी उद्योगधंद्यांनी सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन पर्यावरणाचा शस्त्र म्हणून वापर करायला सुरुवात केली आहे. या वर्षीच्या तीव्र हिवाळ्याचा ते असाच फायदा घेतील, यात शंका नाही. कारण कडाक्याच्या थंडीमुळे जगात गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. अशा परिस्थितीत आपल्या जवळचा साठवलेला गहू अमेरिका बाजारात हुशारीने चढ्या भावात विकणार, हे निश्चित आहे. संकट जगावर येवो वा स्वत:वर येवो, त्यातून स्वत:चा फायदा करून घ्यायचे तंत्र अमेरिकींनी चांगलेच विकसित केले आहे. डिसेंबर महिन्यात हिमवर्षावासह आलेली कडाक्याची थंडीही त्यांच्यासाठी अशीच आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरणार आहे.