आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारणांची पडताळणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या समजुती, आपल्या धारणा आपल्या जीवनाला घडवत-बिघडवत असतात. धार्मिकतेच्या बाबतीत नाही तर सगळ्याच बाबतीत. त्या वेळोवेळी पडताळल्या पाहिजेत. परिस्थितीनुरूप स्वीकारल्या-बदलल्या किंवा नाकारल्या पाहिजेत. आयुष्य उगाच अवघड करून जगण्यात काय मजा?  
 
आपण नेहमी भविष्याच्या चिंतेने ग्रासलेले असतो, उद्याच्या काळजीने आज हातात असलेला क्षण जगायचे सोडून उद्याच्या तजविजीच्या मागे धावत असतो. अर्थात आपण नेहमी कम्फर्ट झोनमध्ये जगण्याला प्राधान्य देत असतो. आणि तसे जगण्यासाठी आपल्याभोवती काही चौकटी आखून ठेवलेल्या असतात. परंपरांमधून आलेल्या गोष्टींच्या माध्यमातून त्या स्वीकारलेल्या असतात. काही संकेत, काही समजुती, काही धारणा मार्गदर्शकासारख्या स्वीकारलेल्या असतात. आपण आणि आपले निर्णय त्यावर जास्त अवलंबून असतात.
 
२/४ दिवसांपूर्वी मैत्रिणीची वाट पाहत एके ठिकाणी थांबले होते. ओळखीचे एक काका हातात औषधांनी आणि ग्लुकोजच्या बाटल्यांनी भरलेली पिशवी घेऊन जात होते. त्यांच्याशी बोलले तर चक्कर येऊन पडल्यामुळे काकूंना रुग्णालयात दाखल केल्याचे समजले. लगेच त्यांना भेटायला गेले. ६०/६५ च्या आसपाय वय असेल काकूंचे. बोलता बोलता काकांनीच तक्रार केली, ‘ऐकत नाही, सारखे कशाचे न कशाचे उपवास धरत असते. सलग ३ दिवस उपवासाचे फळ आहे हिची ही दवाखान्यातली भरती.’ काकूंना म्हणाले, ‘कशाला धरता उपवास? त्रास होतो, सहन होत नाही. वयोमानानुसार आधीच शरीराच्या कुरबुरी असतात त्यात पुन्हा तुम्ही कशाला भर घालता?’ तर म्हणे देव मागे लागतो. १०/१५ वर्षांपूर्वी कुठलासा उपवास केला नव्हता तर तुझ्या काकांचे व्यापारात खूप नुकसान झाले होते. गंमत आहे ना? योगायोगाने घडलेल्या एकदोन घटनांना देवाच्या कोपाशी जोडून त्याचे सामान्यीकरण केले जाते. त्यालाच प्रमाण मानून ते आयुष्यभर पुढे नेले जाते. पिढ्या न पिढ्या ते पुढे सरकवले जाते. यापलीकडे काही असू शकते हे समजून घेण्याच्या मन:स्थितीत काकू नव्हत्याच.
 
धार्मिकतेच्या बाबतीतच नाही तर सगळ्याच बाबतीत वेगवेगळ्या धारणा धरून आपण जगत असतो. पहिले मूल वाढवताना जे केले तेच दुसरे मूल वाढवताना केले जाते, पण दुसरे मूल पहिल्यापेक्षा वेगळे आहे याचा विचार केला जात नाही. पहिल्याने जो प्रतिसाद दिला तसा प्रतिसाद दुसरा देईलच किंवा त्याने द्यावा असे कसे ठरवता येईल? पालक दिवसभर मुलांना अभ्यासासाठी दट्ट्या लावत राहतात. मुलांच्या मागे अभ्यासासाठी मागे लागताना पालक ही गोष्ट विचारात घेतात का की, पिढी दर पिढी मुलांचा आयक्यू वाढतोय. तुम्ही जे १० तासांत करत होता, त्यासाठी त्यांना तास दोन तास पुरेसे ठरू शकतात. त्यांच्याकडे माहितीचे किती स्त्रोत आहेत, अफाट माहितीचे विश्व त्यांच्यापुढे खुले आहे याचा विचार तुम्ही केलाय का?
 
वर उल्लेखलेल्या काकूंसारख्या स्त्रिया स्वतःच्या प्रकृतीला धोक्यात घालतातच पण मुली, सुनांनाही हा वारसा सक्तीने देतात तेव्हा हा विचार करत नाहीत की, जीवनशैली बदलली आहे, कामाचे स्वरूप बदलले आहे, ताण वाढले आहेत, त्याच पद्धतीने आणि त्याच नियमांनी हे करणे आजच्या काळात शक्य आहे का?

आपल्या धारणा प्रत्येकानेच वेळोवेळी पडताळून पहायला हव्यात. कालानुरूप त्यात योग्य ते बदल करायला हवेत. आताच्या परिस्थितीत अमुक एक धारणा लागू आहे की, नाही हे पडताळून बघायला हवे. समाज संक्रमण अवस्थेतून जातोय आणि बदल खूप जलद आणि विरुध्द दिशेने होत आहेत. तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी जितक्या पटकन प्रवाहात येतात तितक्याच लवकर कालबाह्य होतात. पूर्वापार चालत आले म्हणून किंवा आम्ही असे केले म्हणून तुम्ही असे करा, हे मार्गदर्शक तत्त्व आता १००% लागू ठरू शकत नाही, हे स्वीकारले पाहिजे. बदल हा निसर्गनियम आहे, तो डोळसपणे अंगिकारला पाहिजे. आपण बदल स्वीकारलेच नाहीत असे नाही. पण स्वतःला तटस्थपणे विचारा, जी गोष्ट मी धरून ठेवली आहे त्यात मला आनंद मिळतोय का? आनंद मिळत असेल तरी त्याचे परिणाम काय आहेत? पूर्वी घरी केलेला प्रसाद देवापुढे ठेवायचे. आता बाजारातून आणलेले पेढे लाडू ठेवले जातात. वाती, दुर्वा, हार-फुलं विकत आणले जातात, हा बदल केलाय नं परिस्थितीनुरूप? शनि शिंगणापूरच्या घरांनाही कालौघात दारे लागली. हे असे कित्येक बदल नकळत स्वीकारलेच नं? काय नुकसान झाले? विकतचा प्रसाद नाकारला का देवाने, की दुर्वा, फुलं नाकारली? जुने सगळे चूक आहे किंवा वाईट आहे असे म्हणत नाही मी. पण बदलाचा एक टप्पा नकळत स्वीकारला दुसरा डोळसपणे स्वीकारण्यास काय हरकत असावी?
 
चतुर्मासात कांदालसूण न खाण्यामागे किंवा मांसाहार न करण्यामागे, उपवास करण्यामागे काय कारण असेल तर फार खोलात न जाता इतके उत्तर सहज सापडू शकते की, या हवामानात ते शरीराला त्रासदायक ठरू शकते, पचनक्रिया मंदावलेली असते. पावसाळा असतो, आजार लवकर जडू शकतात. कांदालसूण जमिनीखाली उगवत असल्याने त्याला धरून रोगजंतूंचा शिरकाव शरीरात होऊ शकतो. अलीकडच्या काही वर्षांत ऋतुचक्र बदललंय, त्यामुळे कांदा लसून खाल्ला तर बाधेलच असे काही नाही. तो खाल्ला म्हणून काही वाईट करणार नाही देव. आपण चुकतोय हा अपराधभाव बाळगण्याची गरज नाही. आपल्या आहारात आपल्या निसर्गचक्राचा विचार केलेला आहे, तो पाळला जावा म्हणून आपल्या सण-उत्सव, धार्मिक कार्यांशी जोडला गेला आहे. माणसाला उन्मत्त व्हायला वेळ लागत नाही. त्याच्या वर्तनाला कुठे तरी अंकुश असावा म्हणून देवाशी आणि श्रद्धेशी हे सगळे जोडले गेले असावे. या सगळ्यांचा विपर्यास करून त्याला येणाऱ्या पिढीकडे सोपवायचे का?
 
धार्मिकतेशी संबंधित उदाहरणे जवळची वाटतात. ती आयुष्य प्रभावित करतात म्हणून दिली आहेत. देव आहे की नाही? कर्मकांड करावे की नाही? किती योग्य किती अयोग्य? यावर चर्चा करायची नाहीये. आपल्या समजुती, आपल्या धारणा आपल्या जीवनाला घडवत-बिघडवत असतात. धार्मिकतेच्या बाबतीत नाही तर सगळ्याच बाबतीत. त्या वेळोवेळी पडताळल्या पाहिजेत. परिस्थितीनुरूप स्वीकारल्या-बदलल्या किंवा नाकारल्या पाहिजेत. आयुष्य उगाच अवघड करून जगण्यात काय मजा? आणि जर आपल्याला ते करता येत नसेल तर कमकुवत साखळीच्या कैदेत असलेल्या, स्वतःच्या ताकदीचा अंदाज नसलेल्या बलदंड हत्तीपेक्षा आपली अवस्था वेगळी नाहीये.
 
 v.nishigandha@gmail.com
बातम्या आणखी आहेत...