आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केमिकल लोचा कसा टाळाल?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केमिकल लोचा म्हटले की, मुन्नाभाई एमबीबीएस आठवतो. अगदी तसं नाही, पण ज्या केमिकल्सच्या स्त्रावांमुळे मेंदूपर्यंत संदेश पोहचवला जातो त्यात असमतोल निर्माण झाल्यावर नैराश्य येऊ शकते. आज या रासायनिक स्त्रावांविषयी जाणून घेऊ

आनंदी, उत्साही राहावे, जगण्याचा पुरेपूर आनंद घ्यावा असे कुणाला वाटत नाही? खूपदा ताण असह्य झाला की, असे वाटते संगणकावर ज्याप्रमाणे नको असणारा भाग सिलेक्ट करून डिलिट करता येतो तसे विचारांच्या, ताणाच्या बाबतीत करता आले तर... आनंदी राहता आले तर... चमत्कार नाही होणार, पण आनंदी राहणे आपल्या हातात आहे. फक्त वर्तनात नियमितता असणे महत्त्वाचे आहे. नैराश्य काही रातोरात व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढत नाही. मागच्या लेखात नैराश्याची काही कारणे बघितली, त्यासोबतच ‘केमिकल लोचा’ हेही एक कारण आहे. याविषयी विस्ताराने सांगायचे असल्याने मागच्या लेखात उल्लेख करणे जाणीवपूर्वक टाळले होते.
 
केमिकल लोचा म्हटले की, मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमा आठवला ना? अगदी तसा नाही, पण ज्या केमिकल्सच्या स्त्रावांमुळे मेंदूपर्यंत संदेश पोहचवला जातो त्यात असमतोल निर्माण झाल्यावर नैराश्य येऊ शकते. आज या रासायनिक स्त्रावांविषयी माहिती करून घेऊ या आणि प्राथमिक स्तरावर नैसर्गिकरीत्या समतोल कसा साधता येईल याचा विचार करू या.
 
डोपामाइन : डोपामाइन हे एक न्यूरोट्रान्समीटर म्हणून शरीरात उपस्थित असणारे रासायनिक संयुग आहे ज्याला आनंद देणारे ट्रान्समीटर असे म्हटले जाते. Motivation Molecule किंवा Reward Chemical असेही म्हणतात याला. मूड, अध्ययन, एकाग्रता, फोकस, झोप, स्मृती या घटकांवर या डोपामाइनचा प्रभाव असतो. डोपामाइन कमी झाल्यास कामात चालढकल करणे, निरुत्साह वाटणे, झोप न येणे, मूड स्विंग्ज, विसराळूपणा, लक्ष केंद्रित न करता येणे, लैंगिक इच्छा कमी होणे, गोड खावेसे वाटणे, कॅफीन घ्यावेसे वाटणे, स्वतःच्या क्षमतांवर शंका निर्माण होणे, ताण हाताळता न येणे, वाढलेले वजन कमी करण्यास असमर्थ ठरणे, स्नायू दुखणे अशी काही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. डोपामाइनची पातळी वाढवण्यासाठी मोठ्या ध्येयाचे छोटे छोटे भाग करून कृती करायला हवी. ही छोटी छोटी ध्येये पूर्ण झाली की, डोपामाइनचा स्त्राव सुरू होतो. पहिले ध्येय संपण्यापूर्वी दुसरे ध्येय समोर ठेवणे आवश्यक असते, त्यासोबतच संगीत, छंद जोपासणे, ध्यान, व्यायाम, आहार-विहारात योग्य बदल करणे आवश्यक ठरते.
 
सेरोटोनिन : सेरोटोनिन हे पचनसंस्थेत प्रामुख्याने सापडते. हे नैसर्गिकरीत्या मूड स्विंग्ज कमी करण्याचे काम करते. आनंदी, शांत, भावनिकरीत्या स्थिर, चिंता कमी करण्याचे काम सेरोटोनिन करते. सेरोटोनिन कमी झाल्यास हात पाय थरथरणे, अतिसार, डोकेदुखी, गोंधळून जाणे तर गंभीर लक्षणांमध्ये स्नायू ताठर होणे, दुखणे, उच्च रक्तदाबाचा त्रास होणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, अंगावर काटा येणे अशी लक्षणे दिसतात. एकटेपणा वाटतो, चिंता वाढते. सेरोटोनिनचे प्रमाण वाढविण्यासाठी रोज कोवळ्या उन्हात फिरायला हवे, सामाजिक कार्यात सहभाग घ्यायला हवा. व्यायाम, आहार आणि ध्यानधारणेचा समावेश जीवन शैलीत करणे आवश्यक आहे.
 
ऑक्सिटाॅसिन : याला लव्ह हार्मोन म्हणून ओळखले जाते. हे विश्वास, मानसिक स्थैर्य, नातेसंबंध, शिथील होण्याच्या क्रियेवर प्रभाव टाकते. ऑक्सिटॉसिन भावनिक स्मृतींना स्फूर्ती देते. याच्या कमतरतेमुळे जवळीकतेचे नातेसंबंध प्रस्थापित
करण्यास अडथळे निर्माण होतात. नातेसंबंधावरचा विश्वास कमी होतो. प्रेमात पडलेल्या व्यक्तीमध्ये आॅक्सिटाॅसिनची पातळी पहिल्या सहा महिन्यांत अधिक दिसून येते, असे एका संशोधनाअंती पुढे आले आहे. आॅक्सिटाॅसिनची पातळी वाढवायची असल्यास मैत्री करायला हवी, प्राणी पाळायला हवे, त्यांचे लाड करायला हवे.
 
एंडाॅर्फिन्स : यांना ताण आणि वेदना कमी करणारे म्हणून ओळखले जाते. आनंदी, लक्ष केंद्रित करायला मदत करणारे हे रसायन चिंता दूर ठेवते, आणि वेदनाशामक गोळ्यांचे काम करते. याच्या कमतरतेमुळे तीव्र वेदना, बेफिकीर स्वभाव, जोखीम घेण्याची वृत्ती वाढते, व्यसनाधीनतेकडे कल वाढतो, शारीरिक, मानसिक दुखणे वाढते, चिंता वाढते. एंडाॅर्फिन्स नैसर्गिकरीत्या वाढवायचे असेल तर व्यायाम करणे, भरपूर हसणे, डार्क चाॅकोलेट खाणे, तसेच अरोमा किंवा मसाज थेरपी घेतल्याने फायदा होतो.

‘फील गुड’ रसायनं वाढवण्यासाठी खाली दिलेल्या सात गोष्टी आवर्जून करा आणि बघा तुमच्या तुमच्यातले आनंदाचे झरे तुम्हाला नव्याने सापडतात की नाही.
} नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा करा
} आरोग्यदायी आहार घ्या
} मनमोकळे आणि भरपूर हसा
} मैत्री करा
} काही तरी नवीन शिकत राहा.
} स्पर्श, गंध यांची अनुभूती घ्या.
} निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा.
 
 v.nishigandha@gmail.com
बातम्या आणखी आहेत...