आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल पे मत ले यार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनातल्या ताणतणावांचा खूप विपरीत परिणाम शरीरातल्या हार्मोन्सवर होत असतो. विशेषत: स्त्रियांच्या. त्यामुळे शरीरासोबत मनाची काळजी घ्यायलाही प्रत्येकीने शिकले पाहिजे. डिप्रेशन जवळ करण्यापेक्षा आनंदाने जगले पाहिजे. आपण करतो ती सगळी कामे आनंद देणारी असतातच असे नाही; पण आवडीचे, आनंद देणारे एखादे काम आपण नक्की करू शकतो.

डिप्रेशन म्हणजे नैराश्य हा विषय घेऊन नुकताच जागतिक आरोग्य दिन साजरा झाला. या निमित्ताने पुढे आलेल्या आकडेवारीत तीनपैकी एक व्यक्ती नैराश्यग्रस्त असल्याचे स्पष्ट होते. महिलांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण पुरुषांपेक्षा दुप्पट आहे. ते स्वाभाविक आहे, कारण स्त्रियांमध्ये महिन्याला होणाऱ्या हार्मोनल बदलांसह आपली सामाजिक आणि सांस्कृतिक रचना याला कारणीभूत आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की, कित्येक स्त्रियांना आपण डिप्रेशनमध्ये आहोत, हे समजतदेखील नाही. मग घरातच तिला लेबल्स लावली जातात. ही मूडी आहे, हिला कशात स्वारस्य वाटत नाही, वगैरे. मासिक पाळीमुळे होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलांमुळे तिच्या मूड्समध्ये सतत बदल होत असतात. खूपदा सौम्य प्रकारच्या डिप्रेशनकडे हे तात्पुरते हार्मोनल बदल असतील, म्हणून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे हा फरक प्रत्येक महिलेने समजून घेणे खूप आवश्यक आहे.
 
परवा काही कामानिमित्त एका कॉम्प्युटर संस्थेमध्ये गेले होते. बऱ्याच वर्षांपासून तेथे जाणेयेणे असल्याने संचालिका अरुणाताईंशी छान मैत्री झाली आहे. त्यांच्या कामाचा आवाका, उत्साह, आणि स्वभाव समोरच्या व्यक्तीला नेहमीच प्रोत्साहित करणारा. या भेटीत मात्र त्या काहीशा शांत, उदास वाटल्या. थोड्या गप्पा झाल्यावर सांगितले की, आता कंटाळा येतो, नको वाटते आता. काही करण्याची इच्छा उरली नाहीये. बरेच प्रोजेक्ट त्यांनी बंद केले होते. ही संस्थाही बंद करण्याच्या विचारात त्या आहेत. कामाची आवड, त्यात आवडीचे काम, कोणती आडकाठी नाही, आर्थिक अडचण नाही, मग का असे? तर नको वाटते, इच्छा होत नाही इतकेच. अरुणाताई या सौम्य डिप्रेशनमधून जात आहेत, हे त्यांच्याशी अजून थोड्या गप्पा मारून समजले.
 
डिप्रेशन ही अचानक उद्भवणारी समस्या नाही, हळूहळू उत्साहात बदल होऊ लागतो. कठीण परिस्थितीत निराश वाटणे ही स्वाभाविक गोष्ट आहे, कारण हे तात्पुरत्या स्वरूपाचे असते. पण डिप्रेशनमध्ये आवडत्या गोष्टींमधला रस निघून जायला लागतो, कंटाळा येतो, लोकांना टाळले जाऊ लागते, सणसमारंभात उत्साहाने मिरवणारी ती कार्यक्रम टाळू लागते, आपल्याकडे कुणाचे लक्ष जाऊ नये अशा पद्धतीने वावरू लागते. लोकांपासून दूर राहण्याची कारणे शोधणे, कार्यक्रम टाळणे ही डिप्रेशनची सुरुवात आहे, असे ढोबळमानाने म्हणता येऊ शकते. थकवा, झोप नीट न लागणे किंवा खूप झोप येणे, विसराळूपणा वाढणे, एकाग्र न होता येणे, नकारात्मक विचार मनात येणे अशी सर्वसाधारण लक्षणे दिसतात. स्त्रियांच्या बाबतीत अतिकाळजी करणे, खूप भीती वाटणे, खूप भूक लागणे किंवा न लागणे, रडावेसे वाटणे हे ठळकपणे दिसते.
 
महिलांमध्ये या आजाराला साधारणत: वयाच्या १५व्या वर्षापासून सुरुवात होते. याशिवाय वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या कारणांमुळे डिप्रेशन येते. जसे की, किशोरवयीन मुलींमध्ये डिप्रेशन येण्याचे मुख्य कारण लिंगभाव विषमता हे आहे. तू मुलगी आहेस, हे करू नकोस, हे कर, हे बरे दिसत नाही, अमुक ठिकाणी जाऊ नकोस, अशी बंधने दिसतात. तर तरुण वयात प्रेमभंग, फसवले जाणे, दबावाखाली किंवा नावडत्या मुलाशी करावे लागलेले लग्न, सासरी जुळवून घेणे, घटस्फोट, जोडीदाराचा मृत्यू वा प्रिय व्यक्ती गमावण्याची भीती, शारीरिक व लैंगिक शोषण, शारीरिक व्यंग, नोकरी करत असतील तर त्या ठिकाणची स्पर्धा, वरिष्ठांचा दबाव, केवळ स्त्री म्हणून पात्रतेपेक्षा कनिष्ठ दर्जाचे काम करावे लागणे वा जे काम ती करते त्याचा योग्य मोबदला न मिळणे, पदोन्नती डावलली जाणे यांसारखी अनेक कारणे दिसतात.
 
स्त्रीच्या नैराश्यामागे जैविक कारणांची यादीसुद्धा आहे. वयात येताना, गर्भधारणा काळ, गर्भपात, प्रसूती, रजोनिवृत्ती या काळात तिच्यातले हार्मोन्स झपाट्याने बदलतात. जीवनातल्या ताणतणावांचा खूप विपरीत परिणाम हार्मोन्सवर होतो. त्यामुळे शरीरासोबत मनाची काळजी घ्यायलाही प्रत्येकीने शिकले पाहिजे.  आपण करतो ती सगळी कामे आनंद देणारी असतातच असे नाही; पण आवडीचे, आनंद देणारे एखादे काम आपण नक्की करू शकतो. सौम्य डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी, डिप्रेशनमध्ये जाऊ नये म्हणून काय करता येईल, याचा विचार करून कृती करायला हवी. डिप्रेशनची कारणे समजून घेऊन जीवनशैलीत बदल करणे खूप गरजेचे आहे.
 
‘डिप्रेशनमधून बाहेर ये’ असे म्हणून डिप्रेशनमध्ये गेलेली व्यक्ती बाहेर पडू शकत नाही. त्या व्यक्तीला भावनिक, मानसिक आधाराची गरज असते. त्यांना समजून घेणे, प्रोत्साहित करणे, संयम ठेवणे महत्त्वाचे असते. ‘One Size Fits All’ अशी कॉन्सेप्ट डिप्रेशनमध्ये असणाऱ्या पेशंटसाठी नसते. डिप्रेशन जास्त असेल तर वेळीच योग्य उपचार घेणे गरजेचे ठरते.
 
v.nishigandha@gmail.com
बातम्या आणखी आहेत...