आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गशिक्षण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकाची जबाबदारी केवळ गणित किंवा संगणकाचा वापर शिकवणे नसून विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष, त्रास, वेदना आणि दारिद्र्याचे दु:ख अनुभवणा-यांविषयी व उंची मोटारींमधून जाणा-यांशी अत्यंत जवळचे नाते निर्माण करायला शिकवायला हवे.

अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकनचे पत्र शिक्षणक्षेत्रात प्रसिद्ध आहे. ते पत्र शाळा-शाळांत लावले जाते. पण जे. कृष्णमूर्ती यांनी शाळांना खूप पत्रे लिहिली आहेत. ती फारशी माहीत नसतात. कृष्णमूर्ती स्कूल्स जगभर स्थापन झाल्यावर कृष्णमूर्ती या शाळांच्या संपर्कात राहण्यासाठी शिक्षण म्हणजे काय हे संक्रमित करण्यासाठी दर 15 दिवसांनी जगातील या सर्व शाळांना पत्र लिहीत. ही सर्व पत्रे ‘लेटर्स टू स्कूल्स’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
या पत्रात कृष्णमूर्ती केवळ शाळांचे कामकाजाविषयीच भाष्य करत नाहीत, तरजीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच शाळांना देतात. त्यात जीवनविषयक विविध समस्यांचा ऊहापोह करतात. शिक्षण म्हणजे किती व्यापक जीवनभान आहे हे स्पष्ट करतात. त्यामुळे ही पत्रे शिक्षणाशी थेट संबंधित नसलेल्यांनाही आनंद देतात.
1 नोव्हेंबर 1983ला कृष्णजींनी शाळांना लिहिलेले पत्र हे निसर्गाप्रेमाचा एक सुंदर आविष्कार आहे. या पत्रातील काही भाग जरी वाचला तरी शाळा, शिक्षक यांच्याकडून त्यांची अपेक्षा किती उंचीची होती.... ते शिक्षण नेमके कशाला म्हणत होते याची कल्पना येते.

कृष्णजी लिहितात... ‘‘जगात गोंधळ असताना शिक्षकांची जबाबदारी खूप मोठी आहे. त्याला या शाळांमध्ये अशी माणसे निर्माण करावी लागतील की ज्यांच्यात राष्ट्रीय, प्रादेशिक, अलगतावाद, धार्मिक, जुन्या मृत परंपरांना चिकटून राहण्यापेक्षा वैश्विक जाणीव निर्माण झाली असेल...आजचे शिक्षण नेमके काय करत आहे...हे खरोखर मानवाला त्याच्या मुलांना अधिक सभ्य चांगले बनवत, पुन्हा जुन्या परंपरा जुनाट कुरूपता व जुनाट कर्मठतेकडे न वळवता दूर ठेवत आहे का... शिक्षक आणि विद्यार्थी यांनी त्याचे निसर्ग, झाडे आणि खळाळत्या समुद्राशी नाते तोडले तर प्रत्येकाचे मानवाशी असलेले नातेही संपुष्टात येईल... निसर्ग हा धर्माप्रमाणे व श्रद्धेप्रमाणे केवळ विचार करून संघटित ठेवता येत नाही... निसर्ग म्हणजे तो वाघ... निसर्ग म्हणजे ते एकटे झाड, कुरणे आणि दाट झाडी बुंध्याजवळ लाजून लपणारी ती खार. निसर्ग म्हणजे मुंगी आणि मधमाशी. निसर्ग म्हणजे नदी, पर्वत, बर्फाच्छादित शिखरे, समुद्राला भेटायला निघालेल्या टेकड्यांच्या रांगा... एखाद्याला या सर्वांची जाणीव असायला हवी. आपण या सर्वांचाच भाग आहोत. आपणही इतर प्राण्यांसारखेच प्राणी आहोत, ही भावना आपण वेगाने विसरत चाललो आहोत... तुम्हाला वृक्षांविषयी काही भावना आहेत का... त्याच्याकडे बघा. त्याचे सौंदर्य बघा. पानांची सळसळ कान देऊन ऐका. लहानशा रोपट्यांविषयी, भिंतीवर सरपटणा-या लहानशा जीवांविषयी, लहानग्या वेलींविषयी, झाडांवर पडणारा प्रकाश व असंख्य सावल्या याविषयी संवेदनशील असा... केवळ निसर्गाच्या शाब्दिक वर्णनात अडकून पडू नका. त्याचे भाग व्हा. हरिणांविषयी, जमिनीवर मोडून पडलेल्या झाडाच्या फांदीविषयी तुम्हाला प्रेम असू द्या... आकाशातील तारे किंवा चंद्र त्याच्या सौंदर्याचे केवळ शाब्दिक वर्णन करून त्याकडे पाठ फिरवण्यापेक्षा एकही शब्द न बोलता तुम्ही ते प्रथमच बघत आहात अशा भावनेने बघा. जर निसर्गाशी तुमचे अशा प्रकारचे अत्यंत जवळचे नाते असेल तर तुम्ही माणसांशी, तुमच्या शेजारी बसलेल्या मुलांशी, पालकांशी, शिक्षकांशी खरे नाते प्रस्थापित करू शकाल. अशा प्रकारचा एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा व अत्यंत जवळीकीची भावना असणारे नाते आपण गमावलेले आहे...
कधी तरी सकाळी लवकर उठून खिडकीबाहेर डोकावून बघितले का... गच्चीवर जाऊन झाडांकडे किंवा वसंत ऋतूतील पहाटेचे सौंदर्य बघितले का... बघा. पानांमधून वाहणारी हळूवार झुळूक लक्ष देऊन ऐका. पानांवर पडलेली प्रकाशकिरणे आणि टेकड्या आणि कुरणांवरून येणारा सूर्य बघा... निसर्गाशी जेव्हा असे अत्यंत जवळचे नाते निर्माण होईल तेव्हा तुमचे दुस-याशी असणारे नाते साधे स्वच्छ व संघर्षरविरहित राहील.
शिक्षकाची जबाबदारी केवळ गणित किंवा संगणकाचा वापर शिकवणे नसून विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष, त्रास, वेदना आणि दारिद्र्याचे दु:ख अनुभवणा-यांविषयी व उंची मोटारींमधून जाणा-यांशी अत्यंत जवळचे नाते निर्माण करायला शिकवायला हवे. यातूनच इतरांविषयी एक नैसर्गिक समज जिव्हाळा व सभ्यता निर्माण होईल....’’

यावर काही भाष्य करायला हवे का....