आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Phaltankar Article On China And India China Border

‘संयमी’ सरकार आणि धगधगते कुंपण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तान आणि चीन मागील काही महिन्यांपासून सतत भारतीय सीमांवर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्यानमारनेही भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. श्रीलंका सरकारनेही प्रभाकरनच्या दाक्षिणात्य समर्थकांमुळे भारताला डोकेदुखी दिली आहे. नेपाळमध्ये भारताच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे तेथील सरकारही कॉँग्रेस सरकारवर नाराज आहे. नेपाळही भारतीय दबाव झुगारून पाकिस्तान आणि चीनला छुपी मदत करत आहे. चीनच्या घुसखोरीची घटना ताजीच आहे. एकूणच भारताच्या सार्‍या सीमांचे कुंपण धगधगत आहेत. अमेरिकेने आपली वक्रदृष्टी सिरियाकडे वळवल्याने आधीच डबघाईला आलेला जगाच्या अर्थव्यवस्थेचा पाया आणखीच खिळखिळा झाला आहे. अमेरिकेशी भारताचे ‘अर्थ’ व्यवहार वाढल्याने डॉलर हलला तरी त्याचा परिणाम रुपयावर दिसून येतो. यातच सार्‍या शेजार्‍यांनी भारताविरोधात धोरण अवलंबण्यास सुरुवात केल्याने भारत पुरता कात्रीत सापडला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठरवलेल्या परराष्ट्र धोरणाचाच विसर काँग्रेस सरकारला पडला आहे. याचाच हा परिपाक म्हणावा लागेल. चीनने केलेली घुसखोरी माध्यमांनी टिपली नसती तर कदाचित आणखी एक कारगिल युद्ध भारताला लढावे लागले असते.
11 जुलैला चुमार सेक्टरमध्ये चिनी हेलिकॉप्टरने भारतीय हद्दीत फेरफटका मारत आपले मनसुबे स्पष्ट केले होते. याच प्रसंगी भारत सरकारने कडक आक्षेप नोंदवणे गरजेचे होते. मात्र, नेहमीच संयमाची भूमिका घेणार्‍या केंद्र सरकारने या प्रसंगीही आपले धोरण कायम ठेवत चीनच्या या कारवायांकडे दुर्लक्ष केले. तणाव अधिक वाढू नये, हा त्यामागील हेतू असला तरी सरकारने या प्रसंगी कठोर पावले उचलायला हवी होती. 1962मध्ये ‘हिंदी-चिनी भाई-भाई’चा नारा देणार्‍या चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता. तीच संयमी आणि दुर्लक्ष करण्याची चूक पुन्हा सरकार करत आहे. 11 तारखेपूर्वी 15 एप्रिलला चीनने भारतीय हद्दीतील दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये घुसखोरी करत मुक्काम ठोकला होता. आंतरराष्ट्रीय दबाव आल्याने चीनला माघार घ्यावी लागली होती. मात्र, चीन आणि पाकिस्तानच्या या सततच्या कारवायांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक बनत चालले आहे.
चीनने श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, पाकिस्तान यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करत आपला हेतू साध्य करून घेतला आहे. भारत आणि अमेरिकेच्या वाढत्या संबंधांमुळे भारत सरकारने पारंपरिक मित्र असलेल्या रशियाकडेही दुर्लक्ष केल्याने रशिया भारताच्या मदतीला धावून येण्याची शक्यता तशी धूसरच आहे. उलट सिरियाप्रश्नी आणि यापूर्वीही चीनने घेतलेल्या भूमिकेला रशियाने पाठिंबा दर्शवल्याने आता जागतिक स्तरावरील समीकरणे बदलल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. चीन आणि रशिया या दोन महासत्ता जर एकवटल्या तर त्यातून निर्माण होणार्‍या वावटळीत अमेरिकेसोबतच त्याच्याशी मैत्री असणार्‍या राष्ट्रांनाही याची झळ सोसावी लागणार आहे. अर्थातच यात भारताचाही समावेश आहे.
कमकुवत भारतीय अर्थव्यवस्थेला बळ मिळावे यासाठी भारताने रशियाला दूर सारत अमेरिकेसोबत संबंध अधिक दृढ करण्यावर मागील काही वर्षांमध्ये भर दिला. आता काँग्रेस सरकारचे हेच चुकलेले धोरण देशाच्या अंगलट आले आहे. अमेरिकेचे विश्वासू मित्र असलेल्या फ्रान्स, ब्रिटन आणि स्वत: अमेरिकन अर्थव्यवस्थेचेही बारा वाजले आहेत. कधी काळी सर्वात श्रीमंत असलेला अमेरिका आता कर्जबाजारी झाला आहे. अफगाणिस्तान, इराक युद्धानंतर आता अमेरिकेने सिरियावर हल्ल्याची तयारी सुरू केली आहे. या युद्धानंतर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मंदीची आणखी मोठी लाट येण्याची भीती अर्थतज्ज्ञांना वाटत असून अमेरिकेची मदत घेत आर्थिक महासत्ता बनण्याची स्वप्ने रंगवलेल्या भारतालाही याचा जबर फटका बसणार आहे.
भारत आणि चीन यांची तुलना केल्यास आज चीन भारताच्या कैक पटीने पुढे आहे. चीनने आपले आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, क्रीडा, राजकीय आणि परराष्ट्र धोरण कमालीचे बदलत स्वत:त मोठे बदल करून घेतले आहेत. याचा निश्चितच चांगला फायदा चीनला झाला आहे. आपला कट्टर प्रतिस्पर्धी व जगातील आर्थिक बलवान असलेल्या जपानला मागे सारत आज चीन आर्थिक महासत्तापदाच्या जवळ पोहोचला आहे. चीनने आपल्या लष्करी सामर्थ्यातही मोठी वाढ केली आहे. 1 मे रोजी झालेल्या चिनी राष्ट्रीय दिन कार्यक्रमात चीनची लष्करी ताकद पाहून जगाचेही डोळे दिपले होते. भारत, अमेरिका महासत्ता होऊ पाहणार्‍या देशांसाठी हा इशाराच असल्याचे सूतोवाच याप्रसंगी चीनने दिले होते. 1 मे आणि 1 आॅक्टोबर हे दोन दिवस चीन राष्ट्रीय दिन म्हणून साजरे करते.
1 मे रोजी चीनने आपली लष्करी ताकद दाखवत सार्‍यांना अवाक् केले. आता 1 ऑक्टोबर रोजीही चीन नवे काहीतरी करणार, यात शंका असण्याचे कारण नाही.
चीन आणि चाणक्यनीती
कौटिल्य अर्थात आर्य चाणक्याने राज्य चालवण्यासाठी सांगितलेल्या महत्त्वाच्या तत्त्वांनुसारच सध्या चीन चालताना दिसत आहे. यातील महत्त्वाचे उदाहरण म्हणजे, धनानंद अर्थात नंद राजा याच्या विरोधात चंद्रगुप्त मौर्याला उभे करत चाणक्याने धनानंदावर आक्रमण केले. या प्रसंगी त्याने चंद्रगुप्ताला आधी आक्रमणाची रचना करण्यास सांगितले होते. चंद्रगुप्ताने त्या पद्धतीने युद्धाची रणनीतीही आखली; परंतु, चाणक्याने याला विरोध करत स्वत: युद्ध करण्यासाठी नवीन मोहीम आखली. चाणक्याने चंद्रगुप्त आणि इतर अमात्यांसमवेत बसले असताना पत्रावळीत भात मागितला. चंद्रगुप्ताला मगध राज्यावर आक्रमण कसे करशील, अशी विचारणा केली. चंद्रगुप्ताने भाताचा मध्यभाग उचलण्याचा प्रयत्न केला. चाणक्याने मात्र पत्रावळीवरील भाताचे विविध भाग केले. हे भाग म्हणजेच मगध राज्याच्या जवळची राज्ये होती. यानंतर एकट्या पडलेल्या मधल्या भागावर अर्थात मगध राज्यावर आक्रमण कर, असा सल्ला त्याने चंद्रगुप्ताला दिला आणि यानुसार आक्रमण करत चंद्रगुप्ताच्या सैन्याने मगध जिंकले आणि नंद राजाचा पराभव केला. चीनही याच प्रकारे भारताच्या शेजारील देशांवर आधी स्वत:चा दबदबा निर्माण करू पाहात आहे.
चीनमध्येही अशांतता
भारतात सुरू असलेली विविध भ्रष्टाचारांची प्रकरणे, दंगली, नैसर्गिक संकट यांमुळे केंद्र सरकारचे भारतीय सीमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे काही सरकार समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र, चीनमध्ये अलीकडच्या काळात भूकंप, पाऊस यांसारख्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती येऊनही चीनमधील कम्युनिस्ट सरकारचे मात्र सीमांकडेही बारकाईने लक्ष आहे.