आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Sultane Article About Women's Self Help Groups, Divya Marathi

सहकारी सावकारी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला सबलीकरणाच्या दिशेने उचलण्यात आलेले सर्वात कौतुकास्पद पाऊल म्हणून बचत गटांच्या चळवळीचा उल्लेख करायला हरकत नाही. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करून त्यांच्या मनात स्वाभिमानाची बीजे रोवण्याचे श्रेय याच चळवळीला जाते. आज प्रामुख्याने देशभरात मध्यमवर्गातील आणि गरीब कुटुंबातील महिलांना मोठा आधार या चळवळीच्या माध्यमातून मिळाला आहे. 10-12 महिलांच्या गटाने स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वत:च्या कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा आणि देशाचा विकास साधण्यात खारीचा वाटा उचलला आहे. यासह अनेक सकारात्मक बाजू या चळवळीविषयी सांगता येतील. पण या सर्व सकारात्मक बाजूंमध्येच बचत गटांच्या चळवळीबाबत एक दुसरी बाजूही आहे.

गटांतर्गत वैयक्तिक कर्ज वाटप
कर्ज बचत गटांची संख्या ज्या पटींनी वाढली आहे, त्याच पटीने या बचत गटांना अर्थसाहाय्य करणार्‍या संस्थांची संख्याही वाढली. सुरुवातीच्या काळात केवळ काही ठरावीक पतसंस्था आणि मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून या बचत गटांना आर्थिक पाठबळ दिले जात होते. बचत गटांना एकत्रितपणे एखादा रोजगार उभा करण्यासाठी म्हणून क र्जरूपाने माफक दरात आर्थिक साहाय्य केले जायचे; पण आजघडीला या सर्वाचे स्वरूपच बदलले आहे. बचत गटांना आर्थिक साहाय्य वाटताना किंवा थेट भाषेत कर्ज वाटताना ते संपूर्ण गटाला नाही तर गटातील एकेका महिलेला स्वतंत्रपणे, वैयक्तिक पातळीवर ही कर्जे दिली जात आहेत. शिलाई मशीन, गृहोद्योग अशी कारणे दाखवून हे कर्ज घेतले जाते. ठरलेल्या व्याजदरानुसार त्या कर्जाचे हप्ते ठरवले जातात. कर्जाच्या रकमेनुसार ठरावीक हप्त्यांनी, म्हणजेच 24-36 हप्त्यांत त्या कर्जाची फेड करायची, असा क्रम ठरलेला. पण हे एवढ्यावरच थांबत नाही. हे कर्ज फेडले जाते न जाते तोपर्यंत लगेचच या महिलांची नव्या कर्जासाठी तयारी सुरू होते. कर्जपुरवठा करणार्‍या संस्थांकडूनही अगदी त्रोटक चौकशीवर पुन्हा नव्याने कर्ज दिले जाते.

मूळ हेतू बाजूलाच
महिलांचे सशक्तीकरण हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून बचत गटांना कर्जपुरवठ्याची संकल्पना पुढे आली. मात्र वर उल्लेखलेल्या चक्रामध्ये समोर येणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, महिला सबलीकरणाचे काय? कारण सर्वात आधी ज्या कारणासाठी कर्ज घेतले, त्यातून त्या महिलेने स्वत:ची किंवा कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यात कितपत यश मिळवले, याबाबत कोणतीही माहिती घेतली जात नाही. कर्ज पुरवणार्‍यांना आपल्या वसुलीशी काय ते देणेघेणे. बरं एक महिला किती वेळा कर्ज घेणार याचेही काही बंधन नाही.

या सर्वाचा अर्थ म्हणजे एका प्रकारे सहकारी तत्त्वावर चालणार्‍या सावकारीकडे हा प्रकार चालला आहे. या कर्जातून मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना भेडसावणार्‍या रोजच्या अडचणींवर मार्ग सापडतो, हे खरे आहे. पण तरीही त्यातून त्यांना स्वावलंबनाचा मार्ग सापडत नाही. वारंवार मिळणार्‍या कर्जावरच त्यांच्या पुढच्या सर्व बाबींचे नियोजन असते.

वारंवार कर्जउचल
एकच महिला एकापेक्षा अधिक गटांत सहभागी असते. म्हणजेच ती एका वेळी दोन किंवा अधिक कर्जे उचलते. अनेकदा पहिले कर्ज फेडण्यासाठी म्हणजे हप्त्यांसाठी बाहेरून कर्ज घेतले जाते. ते फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेतले जाते व परत त्यासाठी नवे कर्ज, अशी ही साखळी संपतच नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बचत गटांतर्गत जे कर्ज घेतले जाते त्याचा बर्‍याचदा अनुत्पादक कारणासाठीच खर्च केला जातो. म्हणजे बचत गटाच्या मार्फत कमी व्याजदर आकारला जातो म्हणून घरदुरुस्ती, लग्न इत्यादीसाठीही गटाअंतर्गत कर्ज घेतले जाते.

महिला विकासाचा आढावा नाही
महिला कर्ज कशासाठी घेतात? व ज्या कारणासाठी घेतात ते साध्य होते का? याचा आढावा घेण्यासाठी मात्र काहीही सोय नाही. उदाहरणार्थ, एखादी महिला शिलाई मशीनसाठी कर्ज घेते. पण शिलाई मशीन सात ते आठ हजारांपर्यंत येते. मग अधिक कर्ज कशाला? कर्ज घेतल्यानंतर त्याचा योग्य वापर झाला का यासाठी पाहणीही केली जाते. पण पाहणी करणार्‍यांना धडधडीत जुनी यंत्रे दाखवली जातात. किंवा एकच यंत्र अनेक महिला आलटून पालटून दाखवतात. हे अगदी सहज लक्षात येण्यासारखे आहे, तरी कर्ज वाटणार्‍यांना व्याजाशिवाय इतर गोष्टींत रस नसल्याने ते प्रकरणाच्या खोलात शिरत नाहीत.

महिलांनीच विरोध करावा
अनेकदा नवरा काम करत नाही, व्यसनाधीनतेमुळे पैसा कमवत नाही म्हणून महिला या कर्जांची मदत घेतात. पण त्याची फेड करण्यासाठी त्यांना घरोघरची धुणीभांडी, मजुरी अशी कामे करावी लागत आहेत. त्यात अनेकदा या कर्जातून मिळालेला पैसाही ‘पतिदेव’ बायकोला मारहाण करून दारू, लॉटरी अशा कामी सत्कारणी लावतात! त्यामुळे महिलांनीच या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. केवळ त्या स्वत:च हे सर्व थांबवू शकतात. त्यासाठी काही सामाजिक संस्थांनी माहिती घेऊन जनजागरणाचा प्रयत्न केल्यास अतिउत्तम.

nitin.sultane@dainikbhaskargroup.com