आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन: एकतर्फी मामला मराठीचा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपर्क क्रांतीने नको तितके जवळ आणले नव्हते, तोवर अन्य भाषांतील देवाणघेवाण ही सुरळीत होती. वेगवेगळ्या भाषेतल्या शब्द, संकल्पना वेळ घेत आपल्या भाषेतील रुपडे घेऊन येत. पण जागतिकीकरणानंतर हा वेळ उरलेला नाही. आपल्या भाषेत यातले काहीही निर्माण न झाल्याने ही फक्त एकतर्फी घेवाण उरली आहे...
 
"अडगळीत गेलेले शब्द' या शीर्षकाची एक पोस्ट व्हॉटस्अप ग्रुपमधून सध्या सगळीकडे धुमाकूळ घालते आहे. अडगळ याच शब्दापासून परस, वळचण, घंगाळ, फणीरपेटी असे मागे मागे जात कालौघात हरवलेल्या शब्दांची आठवण करून देणारी ही पोस्ट वेगवेगळ्या ठिकाणांवरून ‘कुणी लिहीलंय माहीत नाही' म्हणत पुनःपुन्हा येतेय. पूर्वी व. पु. काळ्यांच्या सुभाषितवजा वाक्यांनी जसे वाचणारे स्मरणकातर होत, ते आता आपल्या आयुष्याला खोदत त्यात कमेंट्समधून भर घालत राहतात. (आमच्या एका ग्रुपवर या पोस्टवर तासाभरात १५९ कमेंट्स पडल्या!) 
 
खरं तर कालौघात पडझड झालेली असते, भाषेला शरीर देणारे शब्द साहजिकच अडगळीत जमा झालेले असतात. हे पूर्वीपासून होतच आहे. अलीकडे त्याचा वेग वाढला असावा, इतकंच. अलीकडे विशेषतः मराठीसारख्या प्रादेशिक म्हणवल्या जाणाऱ्या भाषेत अशा अडगळीत जाणाऱ्या शब्दांची जागा घेणारे नवे शब्द लोकव्यवहारातून तयार होत नाहीत, त्या अर्थी भाषा आकसत चालली आहे काय, हा त्यातला विचार करण्याजोगा भाग...
 
गेली किमान नव्वद वर्षे तरी (हो, वि. का. राजवाडेंनी ज्या भाषणात मराठीला मरु घातलेली भाषा म्हटले त्याला नव्वद वर्षे झाली, तरीही ग्रामोफोन तबकडीची (हेही पुन्हा अडगळीत गेलेले शब्द) पीन अडकावी, तसे आपण त्यात अडकलो आहोत) मराठी भाषा आणि तिचे भवितव्य याविषयी आपण उसासे टाकत बोलतो आहोत. हे भाषेचे, बोलींचे वेगळेच. मराठीच्या अधिकृत ४२ बोली आहेत, असे अलीकडेच वाचले. आमच्या सोलापुरी बोलींसारख्या अनधिकृत आणखी कितीतरी असतील. (सोलापूर - सोन्नलगी - हा मूळचा कानडी मुलुख. त्यात साधारण दीडशे वर्षांपूर्वी तेलंगणातले साळी- पद्मशाली जगण्यासाठी सोलापुरात आले, त्या काळी वस्त्रोद्योगानं बहरलेल्या सोलापुरात आपल्या हातमागांसह रुजले. नगर-हैद्राबाद असे दोन्ही निजाम, विजापूरची आदिलशाही, मुघल अशा राजवटींमुळे मुस्लिमही आपल्या हिंदी-उर्दूसह मोठ्या संख्येत. या भाषांचे त्यांच्यापुरते स्वतंत्र अस्तित्व आहेच, पण व्यवहारात याचा संकर होऊन सोलापुरी मराठी ही रांगडी तरी, जिव्हाळ बोली अस्तित्वात आली. अलीकडेच प्रा. दीपक देशपांडे या बोलीची सूक्ष्म निरीक्षणांती मांडणी करत ‘झी मराठी’चे पहिले हास्यसम्राट झाले. मराठीवर या भाषांचा झाला तसाच या भाषांवरही मराठीचा परिणाम झाला असावा. कारण इथली कानडी कर्नाटकात विजापूरपुढे चालत नाही, तर तेलुगू तेलंगणापलीकडील आंध्रात.)
 
मुळात, लोकव्यवहाराला मिळालेले अभिव्यक्तीचे शरीर म्हणजे, भाषा. तर बोली ही त्याची विविध अंगे. त्यामुळे कालांतराने का होईना, या सर्व - किमान अधिकृत - बोलींमधील समान शब्दांमधून प्रमाण मराठी भाषा विकसित व्हायला हवी होती, पण तसे न झाल्याने, आजच्या अस्मितांसाठी बहराच्या काळात बोलींच्या स्वतंत्र अस्मिता उभ्या राहात आहेत. 
 
 इथे एक अनुभव सांगावासा वाटतो. आशय दिवाळी २००८मध्ये एक कथा आली. पूर्ण बोलीत असल्याने अजिबात समजत नव्हती. (अहिराणी वा खानदेशी नक्की स्मरणात नाही) लेखक वाचनातून तसे परिचित, दमदार, त्यामुळे त्यांना संवाद बोलीतच असू द्यात, पण मधले निवेदन नागरी मराठीत करावे, त्यातून संदर्भाने संवाद समजून घेता येतील, नाही तरी निवेदन हा लेखकाने वाचकाशी केलेला संवादच असतो, असे मी लिहिले. नंतरही पत्रापत्री झाली, पण त्यांना ते अखेरपर्यंत मान्य झाले नाही. भालचंद्र नेमाडेंच्या भाषणातील एक उद‌्धृत इथे मुद्दाम नोंदवावेसे वाटते, ‘संपूर्णपणे लोकभाषा वा प्रमाणभाषा वापरून लिहिणे बरोबर नाही. लेखकाने दोन्हींची सरमिसळ लेखनात केली पाहिजे. कारण लोकभाषेत म्हणता येणाऱ्या अनेक गोष्टी प्रमाणभाषेत मांडता येत नाहीत आणि नुसत्या लोकभाषेतील लेखन अगम्य होण्याचा धोका विनाकारण असतो. ' (दिवंगत लेखक मुरली खैरनार यांनी ‘शोध' कादंबरीच्या निर्मितीप्रक्रियेची रोजनिशी लिहिली होती, त्यातली ही नोंद नवअनुष्टुभ जुलै आॅगस्ट २०१५ मधून)
 
म्हणजे भाषा संकटात, बोली तर या हिशेबात कडेलोटाच्या टोकावर. असे का झाले असावे? मी भाषेचा तज्ज्ञ वा अभ्यासक नाही, पण बहुतांश वाचक आणि किंचित संपादक म्हणून जे जाणवले ते असे. कुठलीही भाषा लोकव्यवहार उत्क्रांत होत जाईल, तशी विकसित होत जाते. संपर्कक्रांतीने नको तितके जवळ आणले नव्हते, तोवर अन्य भाषांतील देवाणघेवाण ही सुरळीत होती. वेगवेगळ्या भाषेतले शब्द, संकल्पना वेळ घेत आपल्या भाषेतील रुपडे घेऊन येत. पण जागतिकीकरणानंतर हा वेळ उरलेला नाही. इंग्रजी संकल्पना थेटच आक्रमण करत आहेत. बरं आपल्या भाषेत यातले काहीही निर्माण न झाल्याने ही फक्त एकतर्फी घेवाण उरली आहे. थोडक्यात, आपल्या भाषेत ज्ञाननिर्मिती थांबल्याने भाषेचे प्रवाहीपण नष्ट झाले आहे.
 
शाम मनोहर यांच्या भाषणातले एक उद‌्धृत इथे आठवायला हरकत नाही. "...पुढे अमेरिकेत शिकून येऊन (तसे) इथे करणे हीच पद्धत पडली. लोकशाही, कपडे, चालीरीती अशाच आल्या. भारत स्वतंत्र झाल्यापासून पुनर्शोध, रि- सर्च हेच चालू आहे, मग आपले काय? हा प्रश्न यातून तयार झाला. तंत्रज्ञान दुसऱ्यांकडून यायला हरकत नाही, पण संस्कृती टिकवली पाहिजे, हे उत्तर येऊ लागले. भारतीयांना रिसर्चचे वळण लागले आहे, सर्चचे म्हणजेच शोधाचे वळण लागत नाहीये...'
यावर अधिक भाष्याची गरज नाही.
 
थोडे इतिहासात डोकावून पाहिले तर काय दिसते?
ज्ञात मानवी इतिहासात समाजमन ढवळून काढणारे शोध लागले वा लागत होते. उदा.गुटेनबर्गने लावलेला छपाईतंत्राचा शोध, कोपर्निकस-गॅलिलिओनी केलेली खगोलशास्त्रीय संशोधने... इ. तेव्हा आपण काय करत होतो? नाही, यात काही निष्कर्ष असणारा उपरोध नाही. कारण भास्कराचार्याने गॅलिलिओने केलेले संशोधन त्याच्याही काहीशे वर्षे आधीच केले होते. तरी पाश्चात्त्य समाजात उडाली तशी खळबळ तर सोडाच, पण साधे तरंग उठल्याचीही नोंद सापडत नाही. एकोणिसाव्या शतकात डार्विनने जीवाच्या उत्क्रांतीविषयी संशोधनात्मक निष्कर्ष प्रकाशित केले, तेव्हा पुरे युरोपीय विचारविश्व वादळून गेले, त्यात सर्व क्षेत्रातील बुद्धिवादी होते. पंचवीस वर्षांनंतर हा सिद्धांत सिद्ध झाल्यावर जर्मन तत्त्वज्ञ नित्शेने त्याचे सुप्रसिद्ध उद‌्गार काढले, ‘गॉड इज डेड'.
 
कारणे काहीही असली तरी माणसाला पुढे नेणारे बौद्धिक काम आपल्याकडे समाजाच्या केंद्रस्थानी आले नाही, हे खरे. आजही परिस्थिती फार बदललेली नाही. अशा घटना कधीतरीच घडत, रोजचे जगणे त्याने प्रभावित होत नव्हते, तोवर चालून जात होते; पण आजच्या बदलांचा (असा प्रत्येक बदल मूलगामी नसला तरी त्याने रोजच्या जगण्यातले काही बदलतेय) अफाट वेग पाहता संस्कृतीचीच फरपट होत असेल, तर तिची वाहक असलेली भाषा आपला गाभा कसा राखू शकेल? अर्थात, लगेच नजीकच्या काळातच भाषेचे भवितव्य निश्चित होईल, असे नव्हे. जगभरात बारा-पंधरा कोटी लोकांची ही दोन हजारांवर वर्षे जुनी भाषा, पण उत्तरोत्तर अभिव्यक्तीतली तिची अपरिहार्यता कमी होत जाईल, असे वाटते. कारण आजची जीवनशैली ठरवणाऱ्या बहुतांश गोष्टी बाहेरून येत आहेत (अशा बाहेरून आलेल्या शब्दांना मराठी प्रतिशब्द योजण्याची वेळही येऊन गेली, हे आवश्यकही आहे, पण पुरेसे नाही. शिवाय अशा गोष्टींचेही टोक गाठले तर भाषेला सूज येईल, बाळसे नव्हे.) आणि या प्रवाहाची दिशा बदलण्याची वा तो थोपवण्याची कसलीच शक्यता नजीकच्या भविष्यात दिसत नाही...
 
सध्या तरी सर्व प्रचलित बोलींना प्रमाणभाषेत सामावून घ्यावे (या संदर्भात राज्य मराठी विकास संस्थेचे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बोलीसंदर्भातले पुस्तक वा पानतावणेसरांनी केलेला दलित ग्रामीण शब्दकोश, वस्त्रोद्योगासंबंधातील शब्दकोश ही प्रकाशने पाहावीत. ही एवढी महत्त्वाची कामे अजिबात पोहोचलेली नाहीत), तसेच केवळ कागदोपत्री नसलेले बौद्धिक काम किमान चर्चेत यावे, एवढी अपेक्षाही ढोबळ युटोपिया वाटावा, अशी परिस्थिती आहे. पण सुरुवात तर स्वप्नं पाहण्यातूनच होते, नाही?
 
vaidyaneeteen@gmail.com
लेखक संपर्क ८१४९१ ६७२९८
(लेखक सोलापूर येथून प्रकाशित होणाऱ्या "आशय' नियतकालिकाचे संपादक आहेत.)
 
बातम्या आणखी आहेत...