आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे देऊन नोकरी नकोच (योगेश हांडगे)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली कशी फसवणूक होते, तेे आपण गेल्या भागात पाहिले. काय काळजी घ्यावी, हे आज पाहू.
विदेशात नोकरीला जाताना घ्यायची खबरदारी : विदेशात नोकरीची ऑफर देणारा ई-मेल आल्यावर लगेच वाचूनच सावध व्हा. कुठलीही कंपनी अगदी प्लेसमेण्ट एजन्सीच्या माध्यमातून मुलाखतीचे विविध टप्पे पूर्ण न करता लगेच ऑफर लेटर पाठवत नाही. आपलं शिक्षण, कौशल्य आणि दांडगा अनुभव नसतानाही आपणहून ही कंपनी नोकरी देणारे ई-मेल पाठवते याचा अर्थ हा भामट्यांनी टाकलेला हा सापळा आहे, हे लक्षात घ्यायला हवं.
कोणतीही कंपनी अर्ज केल्याशिवाय मुलाखतीसाठी स्वतःहून निवड करत नाही.
स्मार्टफोनवर नोकरीची ऑफर देणारा कॉल आल्यास तो कॉल ट्रू कॉलरवरून कुठून आला याचा शोध घेता येतो. फोनकर्त्याला कंपनीचा पोस्टल अॅड्रेस विचारावा. जर विदेशातील पत्ता मिळाला तर टपालाने पत्र पाठवून खातरजमा करता येते; तसेच त्या देशात कुणी ओळखीचं असेल तर त्याच्याकडे कंपनीची चौकशी करता येऊ शकते. कंपनी आणि ऑफर लेटरविषयी खात्री पटली तरच पुढचं पाऊल टाकायला हरकत नाही. कोणत्याही परिस्थितीत केवळ ई-मेलवर विसंबून बँक खात्यात रक्कम भरायची नाही. कुठलीही कंपनी मुलाखतीला येण्यासाठी डिपाॅझिट किंवा दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी पैशांची मागणी करत नाही.
नोकरभरती करणारी एजन्सी प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागात नोंदणी केलेली आहे का, याबाबत खात्री करून घ्यावी. त्याची खातरजमा करायची असल्यास ते या विभागाच्या http://www.mea.gov.in/protector-general-emigrants.htm या वेबसाइटवर पाहता येतं. त्यात सर्व एजन्सींची नावं, नोंदणी क्रमांक आणि संपर्क असा तपशील आहे. नोकरीचा वायदा करणाऱ्या कंपनीचं नाव जर या साइटवर सापडलं तरच त्यांच्याशी बोलणे करा .
विदेशात नोकरी देणाऱ्या एजण्टची ही माहिती तपासा
विदेशातील भारतीय नोकरदारांच्या संरक्षणासाठी इमिग्रेशन अॅक्ट, १९८३ची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागाचं विदेशातील नोकरभरतीवर नियंत्रण असतं.
भारतीय नागरिकांची विदेशात नोकरभरती करणाऱ्या एजन्सीला प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागात रिक्रूटमेण्ट एजंट म्हणून नोंदणी लागते. त्यासाठी नोंदणी शुल्क म्हणून २५ हजार आणि वीस लाख रुपयांची बँक गॅरंटीही द्यावी लागते. त्यानंतरच इमिग्रेशन अॅक्टअन्वये ती एजन्सी कोणत्याही भारतीय नागरिकाची विदेशात नोकरभरती करू शकते. विदेशात नोकरी करणाऱ्या इच्छुक भारतीयांनी याच नोंदणीकृत एजन्सीमार्फत विदेशात नोकरी मिळवणे आवश्यक असते.
नोंदणीकृत एजंटला प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागाकडे १५ कलमांचं तपशील असलेलं सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. त्यात उमेदवाराला ज्या नोकरीसाठी विदेशात नेलं जाईल त्याच ठिकाणी नोकरी देण्यापासूनच्या अनेक बाबी बंधनकारक असतात. त्यामुळे अशा एजन्सीमार्फत नोकरी मिळवणाऱ्याला आवश्यक ते संरक्षण मिळतं. नियम तोडणाऱ्या आणि गुन्हे करणाऱ्या एजंटला दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूदही इमिग्रेशन अॅक्टमध्ये असल्याने नोंदणीकृत एजन्सीकडून उमेदवारांची फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.
आॅनलाइन जॉब ऑफर आल्यास सावध रहा. ईमेल फसवा नाही याची शहानिशा करा. ज्या कंपनीकडून, संस्थेकडून ईमेल, फोन आला त्या संस्थेची माहिती गुगलवर चेक करा. खातरजमा केल्याशिवाय अशा ईमेल, फोनकॉलना प्रत्युत्तर करू नका, पैसे तर अजिबात भरू नका.
handgeyogesh@gmail.com
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
बातम्या आणखी आहेत...