कारणे आणि शोध... / कारणे आणि शोध... का रुसला पाऊस!

Jul 20,2012 11:35:16 PM IST

सह्याद्रीच्या विशाल डोंगररांगांना खेटून पसरलेला माणदेश परंपरागत दुष्काळी. आटपाटी, माण, खटाव, सांगोले, मंगळवेढे, जत, कवठे महांकाळ या माणदेशी तालुक्यातल्या पिढ्यान्पिढ्या दुष्काळाची सोबत घेऊनच वाढल्या. टिकून राहिल्या. माणदेशाला लागूनच सोलापूरच्या पुढे मराठवाडा सुरू होतो. मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, लातूर, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतली शेकडो गावंही दुष्काळाचा वसा घेऊन शतकानुशतके उभी आहेत. खान्देशातील जळगाव, धुळ्यावर दुष्काळाचीच छाया असते.
माणदेशावर पाऊस सदानकदा का रुसलेला
सह्याद्रीच्या पूर्वेला क्षितीजापर्यंत पसरलेले दूरवरचे सपाट रान म्हणजे शास्त्रीय भाषेत ‘पर्जन्यछायेचा प्रदेश’. पावसाचे ढग अडवायला या प्रदेशात डोंगर म्हणून नाहीत. वर्षानुवर्षांच्या तुटपुंज्या पावसामुळे झाडा-झुडपांची दाटीही अभावानेच. बाभूळ, बोर, कडुनिंब, वड, पिंपळ, आंबा, चिंच, जांभूळ, उंबर ही वृक्षसंपदा भरपूर पण त्यांची वने नाहीत. सगळी झाडे विखुरलेली. शक्य तिथे उगवून आलेली. अरबी समुद्रावरून दौडत येणारी वरुण सेना सह्याद्रीला धडकून कोकण किनारपट्टीत मनसोक्त बरसते. हेच ढग सह्याद्री ओलांडून पुढे आले, की त्यांना बांध घालायला माणदेश-मराठवाड्यात कोणीच नाही. जमेल तितके, जमेल तिकडे बरसून ढग रिते होतात. पावसाळा साजरा होतो.
निसर्ग बदलता नाही येत
मृगानंतर पावसाळा वेळेत यावा. ज्येष्ठात संततधार असावी आणि जमिनीची तहान भागावी. आषाढात तो सोंडेच्या धारांनी कोसळावा आणि नद्या-नाले, ओढे-तलाव खळखळून वाहावेत. ऊन-पावसाचा मोहक खेळ रंगवत श्रावण-भाद्रपदात पावसाळा संपून जावा. पावसाळा यापेक्षा आदर्श आणि उपयुक्त असू शकत नाही. स्वप्नातले हे चित्र दरवर्षी सत्यात उतरत नाही. त्यावरून लागलीच ऋतुचक्र बदलल्याचा अंदाज बांधणे योग्य नाही. ‘‘क्लायमेट चेंज-ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाऊसकाळच बदलला आहे,’’ हे ती अशास्त्रीय आहे. हवामान बदलांबाबत ठोस निष्कर्ष काढण्यासाठी पाच-पंचवीस वर्षांचा नव्हे तर काही शतकांचा आढावा घ्यावा लागतो.
पाऊस पडण्याचे दिवस कमी झाले
अलीकडच्या काही दशकांत पाऊस अनिश्चित झाल्याचे दाखले मात्र नक्कीच मिळताहेत. दोन पावसांमधला खंडित कालावधी वाढला आहे. एकाच वेळी मुसळधार बरसल्यानंतर अनेक दिवस दडी मारून बसणारा पाऊस वरचेवर अनुभवायला मिळतोय; म्हणजेच पाऊस पडण्याचे दिवस कमी झाले आहेत. पावसाचे भौगोलिक वितरण असमान आहे. हमखास पावसाच्या प्रदेशात कोरडे दिवस आणि परंपरागत दुष्काळी भागात अतिवृष्टी, याची पुनरावृत्ती होत आहे. गेल्या तीस वर्षांत मराठवाड्यात 11 वेळा पाऊस सरासरी ओलांडू शकला नाही. मध्य महाराष्ट्रात 13 वेळा आणि विदर्भात 22 वेळा पावसाने सरासरी गाठलेली नाही. हे वास्तव असले तरी निसर्ग बदलण्याची किमया अद्याप माणसाला साधलेली नाही, ही वस्तुस्थिती नजरेआड करता येत नाही.
कृत्रिम पावसाचा महागडा प्रयोग
ढगांवर रसायने फवारून कृत्रिम पाऊस पाडण्याचा महागडा प्रयोग करून झाला. परंतु त्यामुळे पडणारा पाऊस ना जमिनीची तहान भागवतो, ना त्याने धरणे भरतात. याचा खर्च पाहता यश तुलनेत खूपच कमी आहे. याचे यश ढगांचा अचूक अभ्यास व वेळ साधून फवारणीवर अवलंबून आहे.
सांडपाण्यावर प्रक्रिया गरजेची
हवामान विभागाचे अंदाज बरोबर की चूक, यासंबंधीची वावदूक विधाने करण्यापेक्षा राज्याच्या कृषिमंत्र्यांनी बदलत्या हवामानाचा वेध घेत पीकपद्धतीत तातडीने बदल करण्याची क्षमता शेतक-यांमध्ये निर्माण होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहरांमधून बाहेर पडणा-या लाखो लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे.
हजार वर्षांमध्ये पाऊस कधीच खात्रीचा नव्हता
राकट, दगडा-धोंड्याच्या महाराष्ट्रातील पावसाळा गेल्या हजार वर्षांमध्ये कधीच खात्रीचा नव्हता. यंदाही तो नाही. पुढेही नसेल. त्यामुळे मिळणारा पावसाचा प्रत्येक थेंब साठवणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, शक्य तितक्या पाण्याचा पुनर्वापर, भूजलाचे संवर्धन हे उपायच पाण्याच्या दुर्भिक्षाला आळा घालू शकते. ‘पाण्यासारखा खर्च केला’ या म्हणीतली चैनसुद्धा महाराष्ट्राला परवडणारी नाही.
* संघर्षाची नांदी : सिंचनाची राष्ट्रीय सरासरी 42 टक्के इतकी म्हणजे महाराष्ट्राच्या (17 टक्के) दुपटीहून अधिक आहे. वाळवंट असलेल्या राजस्थानातील सिंचीत क्षेत्रसुद्धा 33.7 टक्के आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांतील 159 लाख हेक्टर एवढे मोठे क्षेत्र अवर्षणग्रस्त वा अवर्षणप्रवण आहे. दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतक-यांची संख्या 73.42 टक्के आहे. म्हणजेच पाणी ही नाही जमीनही अत्यंत कमी ही शेतीक्षेत्राची सद्य:स्थिती आहे. फुगणारी शहरे व औद्योगिकीकरणाच्या वाढत्या रेट्यामुळे पाणी पिण्यासाठी की शेतीसाठी हा प्रश्न दिवसेंदिवस कठीण होत जाईल.
*   बिनकामाचा मान्सून अंदाज : यंदाच्या मे मध्ये भारतीय हवामान खात्याने पहिला अंदाज देताना देशात मान्सूनचे आगमन वेळेत होईल, असे सांगितले. देशात यंदा सरासरीइतका म्हणजे 98 टक्के पाऊस पडेल, हे दुसरे भाकीत आहे. पावसाळा संपताना कदाचित तेही खरे ठरेल, पण त्याचा शेतक-यांना कितपत उपयोग होईल हा प्रश्न आहे. जूनचा महिना कोरडा, निम्मा जुलै कोरडा गेला. यानंतर जर अतिवृष्टी झाली. तर आयएमडीच्या नोंदीचे रकाने भरतील परंतु तोपर्यंत खरीप पिकाने मान टाकलेली असेल. दुष्काळ किंवा अतिवृष्टीचे भाकीत आजवर कधीच आयएमडीने केलेले नाही.

X