आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुसमट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


राकेश क वर्गात गेला आणि त्या वर्गाशी माझं सख्य अजूनच वाढलं. शाळेच्या स्टेजच्या मागे इंग्रजीतल्या एल आकारात असलेल्या इमारतीत आमचे सातवीचे वर्ग होते. त्यात एलच्या मधल्या कॉर्नरचा असणारा वर्ग हा क वर्ग होता. त्या उजव्या बाजूला ब आणि अ वर्ग आणि डाव्या बाजूला ड आणि ई वर्ग. माझा आणि क वर्ग यात ब वर्ग माझ्या दुश्मनासारखा बांधलाय असं वाटायचं. पण तिथून बाहेर पडण्याचा जिना क वर्गासमोरूनच असल्याने बांधकाम करताना नक्कीच माझा विचार केलाय, असंही वाटायचं. त्यात मी होते मॉनिटर. म्हणजे बरीचशी कामं मला करावी लागत. त्यासाठी शाळेच्या मुख्य इमारतीत सारखं जावं लागायचं, म्हणजे स्टेजच्या पलीकडे. आणि असं असेल तर! येस्स, क वर्गासमोरचा जिना वापरावा लागणार! सगळ्या गोष्टी किती अनुकूल घडत होत्या. मी तर वर्गात वाटच पाहत बसायचे की कधी बाई मला काम सांगतील आणि कधी मी बाहेर जाईन. कारण जाता जाता मला क वर्गाचे हालहवाल दिसायचे. आणि त्या 60-70 मुलांच्या गर्दीत राकेशला शोधण्यासाठी मी मुद्दाम हळूहळू चालायचे.


दिसला का गं? - मन
क् कोण?
अगं राकेश! तू कोणाला शोधणारेस अजून?-मन
मी तर प्राजक्ता दिसतेय का ते बघत होते. हो? बरं, पण दिसला का सांग नं -मन
गप गं माझी आई.

जिन्यावरून येताना-जाताना ब-या च वेळा माझं आणि माझ्या मनाचं असं युद्ध व्हायचं, जे काही नवं नव्हतं. तसा राकेश मधल्या सुटीत, शाळेआधी किंवा नंतर वगैरे भेटायचा. पण का कोणास ठाऊक, मला त्याची मैत्री खूप हवीहवीशी वाटायची. माझ्या वर्गातला नालायक आनंदही माझा खूप चांगला मित्र होता. पण राकेशच्या बाबतीत. काहीतरी वेगळं घडत होतं हे नक्की. आजकाल आमच्या खिडकीशेजारचं खुरटलेलं झाडसुद्धा मला पालवीने बहरल्यागत वाटायचं. मी माझा युनिफॉर्म मळला नसेल तरी रोज धुवायचे आणि इस्त्री करून घालायचे. बूटही अगदी चकाच्चक पुसून जायचे. कारण राकेशसुद्धा असाच एकदम अपटुडेट राहायचा. हल्ली ब-या चदा मी क वर्गातल्या मैत्रिणींसोबत डबा खायला जायचे. त्याच निमित्ताने चार मिनिटं जास्त नजर ठेवता येईल राकेशवर! तिथेही डबा खाताना माझं लक्ष मैत्रिणींच्या गप्पाटप्पांत नसायचंच जास्त. मग मी आपला स्वत:हून एखादा विषय काढावा आणि वळवत वळवत तो येनकेन प्रकारे राकेशवर न्यावा असं चालायचं. म्हणजे फार नाही. उगाच कुणाला वेगळाच संशय येणार नाही नं याची खातरजमा करूनच मी बोलायचे. राकेश गेल्याच्या दुस-या च दिवशी मला काहीच माहीत नाही अशा आविर्भावात मी प्राजक्ताला विचारलं, ‘ए, तुमच्या वर्गात एक नवीन मुलगा आलाय म्हणे? फार हुशारेय असंही ऐकलंय!’

‘हो गं हो, राकेश कदम नावाचा. दुस-या बेंचवर बसतो. अतुलशेजारी. पटापट उत्तरं देतो सगळ्या प्रश्नांची.’
‘अरे व्वा! हुशारेय म्हणजे खरंच. मैत्री करायला हवी!’ ‘कित्ती खोटं बोलते गं ब्बाई! जसं काही माहीतच नाही,’ -मन
‘गप गं. तुला काय?’- मी.
प्राजक्ता ही माझी कॉरस्पाँडंट होती क वर्गातली. इत्थंभूत बातम्या द्यायची.
प्राजक्ताची वाट बघत मी शाळेच्या गेटजवळ रेंगाळायची. पण कोणाला कळणार नाही असं. तिथे एक चिंचा-बोरंवाला असे. आणि एक फुलवाली. मी उगाच हे कसं दिलं - ते कसं दिलं करत तिथे वेळ काढायची. त्यातून सोनचाफ्याचा किंवा मोग-या चा वास मनात साठवत राहायची. पण डोळ्यांचे कोपरे प्राजक्ताला शोधत असायचे. आणि प्राजक्ता आल्यावर जसं काही महत्त्वाचं काम संपल्यासारखी वळायची आणि अचानक भेटल्यासारखी प्राजक्ताला ‘हाय!’ करायची. आणि प्राजक्ता आल्यावर पुन्हा तिकडेच गप्पा मारत रेंगाळायची. ते का बरं? अशीच एकदा शाळा भरायच्या आधी गेटजवळ मी प्राजक्ताशी बोलत होते. नेहमीप्रमाणे मी फिरवून फिरवून विषय राकेशवर आणला. आणि प्राजक्ता म्हणाली, ‘तुला आवडतो ना तो?’
!!!!!!!!!
धप्प...
माझ्या मनात एकदम गरमागरम सुगंधी वीज चमकल्यासारखं झालं. हे माझ्यासाठी खूप अनपेक्षित होतं. आत्तापर्यंत फक्त माझं मन असं विचारायचं. पण आज एका दुस-या व्यक्तीने हे विचारलं होतं. मी माझ्या मनाला गप्प करू शकत होते. पण इतरांना? मला तो आवडत होता? नाही नाही. ही गोष्ट काही केल्या मनाला पटत नव्हती. असं काहीतरी आहे हे कळत तर होतं, पण मान्य केलं जात नव्हतं. मला फक्त त्याची पर्सनॅलिटी आवडते या वाक्यावर काही भागत नव्हतं. ज्याला त्याला स्पष्ट कबुली हवी होती. तेवढ्यात बाजूला उभा असलेला आनंद ओरडला-
‘आवडतो म्हणजे काय? ही लाइन मारते त्याच्यावर. म्हणून तो वर्ग सोडून गेला.’ मी सुन्न झाले. लाइन मारतेय? तो आवडतो हेच पचवायला कठीण होतं आणि लाइन मारणं हे तर कल्पनेपलीकडचं होतं. आनंदची ही पानटपरी भाषा मनात घर करून गेली. डोळे टचकन भरून आले.
किती फरक असतो मुलांच्या आणि मुलींच्या बोलण्यात! मी तसंच कसंतरी वर्गात गेले. आज जिन्यावरून जाताना अजिबात उत्सुकता वाटत नव्हती. क वर्गाकडे नजर टाकायचं अजिबात मन नव्हतं. मी वर्गात बाकावर जाऊन शांत बसून राहिले. कोणाला कळणार नाही असं डोळ्यातलं पाणी मनगटाने टिपलं. पण मनात विचारांचं काहूर माजलं होतं.
तोच आनंद आला, म्हणाला-
‘ए शारू, सॉरी यार. मला तसं नव्हतं म्हणायचं. मी फक्त चिडवत होतो. म्हणजे असंच. प्लीज ना. सॉरी ना.’
मी त्याला ‘इट्स ओके’ म्हणून टाळलं. पण मला वाईट वाटलं होतं हे आनंदला आणि मलाही चांगलं ठाऊक होतं. प्रार्थना झाली, तास सुरू झाले. पण माझे डोळे अधूनमधून ओले होतच होते. मूड पार कुठच्या कुठे उडून गेला होता. मनात आवडणं आणि लाइन मारणं या शब्दांची आपापसात मारामारी चालू होती. पण या सगळ्यामुळे माझा फार कोंडमारा होत होता. डोळ्यांतल्या धारा आणि मनातला मारा काही थांबत नव्हता. आज वाटतं की त्या वेळी मी जर वयाने थोडी मोठी, थोडी समजूतदार, थोडी परिपक्व असते तर..

avkpd08@gmail.com
esahity@gmail.com