आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असून अडचण न व्हावे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील कुटुंब न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधीशांनी दिलेली घटस्फोटाच्या प्रकरणांची आकडेवारी सांगते की घटस्फोटासाठी अर्ज करणा-यांमध्ये ‘सिक्स्टी प्लस’ म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत हल्ली बरीच वाढ झाली आहे.
अपत्य हा कोणत्याही वयाच्या जोडप्याच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा असतो. मतभेद, नावड, अप्रीतीच्या काळातही मुलांचे जन्म होतातच ही विसंगती आपल्याला आवडो न आवडो, मान्य करावीच लागते. साधं सौजन्यपूर्ण वर्तनही घडत नसलं, या कृत्रिम जगण्यापेक्षा सगळं संपवणंच बरं असं दोघांनाही वाटत असलं तरी तसं न होण्याचं मुख्य कारण अपत्य हेच असतं. अपत्याबद्दल दोघांनाही समान जवळीक वाटत असते. काही वेळा पुरुष आपल्या बहिर्मुख स्वभावामुळे अपत्याबद्दल वाटणा-या जवळिकीवर मात करतो पण स्त्रीला तिच्या अंतर्मुख स्वभावामुळे हे शक्य होत नाही.
याखेरीज सामाजिक आणि आर्थिक कारणे असतात, कौटुंबिक प्रतिष्ठेचा विचारही असतो. या सा-यामुळे घडतं असं की सणावारी कार्यक्रमाला जोडीने जाणारी, कौटुंबिक धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणारी जोडपी बरीच वर्षं एकमेकात पडलेल्या दरीसह आपलं वैवाहिक जीवन जगत असतात. कालांतराने त्यांना या अंतराची सवय होते. पण जीवनाच्या उत्तरार्धात जेव्हा मुले स्वतंत्र आणि समर्थ झालेली असतात आणि आर्थिक अनुकूलताही असते अशा वेळी पतिपत्नी परस्परांबद्दल मनात अढी राखून जगणं आता पुरे झालं, असं म्हणून समजूतदारपणे एकमेकांपासून अलग झाले तर?
आपल्या अगदी निकट मैत्री असलेल्या कुटुंबाशी आपण खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा मारत असतो. अशा वेळी तिथे हजर असलेल्या कुणाला अप्रिय वाटेल असा विषय आपण टाळतो. त्या कुटुंबाबद्दलची एखादी बातमी तुम्हाला कळली आहे, तिच्या सत्यासत्यतेबद्दल तुम्हाला मुळीच शंका नाही. बोलण्याच्या भरात ती अगदी ओठावर आली असली तरी तुम्ही ती गिळून टाकता कारण त्या उच्चाराने तिथल्या कुणाला तरी वाईट वाटण्याची शक्यता असते. या उलट तिथल्या एखाद्यानं केलेलं विधान शंभर टक्के असत्य असलं तरी आपण त्याला विरोध न करता ऐकलंच नाही असं दाखवतो आणि विषयांतर करतो. या दांभिकतेला व्यावहारिक शहाणपण म्हटलं तरी इथे स्वत:शी अप्रामाणिकपणा घडतोय हे मान्य करायला हवं. गांधीजी एकदा म्हणाले होते, माझ्या बोलण्याचं तिला काय वाटेल ही आशंका फक्त तीन व्यक्तींबरोबर बोलताना माझ्या मनात नसते, या तीन व्यक्ती होत्या मीराबहन, महादेवभाई आणि मगनलाल गांधी. आश्चर्याची गोष्ट अशी की या तीन व्यक्तींत कस्तुरबांचा समावेश नाही! इथे मूळ मुद्दा मनुष्यजीवनातील कारुण्य हा आहे. 30-40 वर्षांच्या सहजीवनानंतरही पतिपत्नी परस्परांचा विश्वास संपादन करू शकत नाहीत हे करुण आहे. यात कुणाचा किती दोष आहे याचं विश्लेषण करण्यात अर्थ नाही. दोन्हीकडे थोडं सत्य, थोडं असत्य असतं. मात्र दोघांनाही आपापला खोटेपणा खरेपणा वाटायला लागतो. खेदाची बाब ही की असे मुखवटे घालून कित्येक वर्षे जगल्यानंतर आपण हे मुखवटे उतरवू शकत नाही.
प्रत्येक बाबतीत असंच घडतं असं नाही, पण बहुतेक प्रसंगात असं घडतं हे नक्की. अगदी सगळ्यांसमोर गीतेवर हात ठेवून हे मान्य केलं नाही तरी किमान स्वत:शी संवाद साधताना अशी फसवणूक करू नये. अशा अवस्थेतील ज्येष्ठ नागरिकांनी एकमेकापासून अलग होण्याचा किंवा निदान वेगळं राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर तो समजून घ्यायला हवा. अगत्याची गोष्ट ही की प्रत्येक व्यक्तीला प्रामाणिकपणे, कोणत्याही अकारण दडपणावाचून बिकट सामाजिक चौकट वा शिस्त अबाधित ठेवण्यासाठी जे नियम आहेत त्याचं कुणीही उल्लंघन करू शकत नाही - करूही नये. कारण अशा नियमांमुळेच तर माणूस हजारो वर्षांपासून अन्य प्राण्यांपासून अलग होऊन टिकू शकला आहे, संस्कृती निर्माण करू शकला आहे.
उपर्निर्दिष्ट परिस्थितीत कायदेशीर मार्गाने अलग होण्याऐवजी समजूतदारपणे वेगळं राहण्याची व्यवस्था करता आली तर त्यात काय वाईट आहे? एका कुटुंबात वडिलांनी आपल्या दोन मुलांना स्वत:चे दोन फ्लॅट दोघांच्या संमतीने वाटून दिले. दोन्ही फ्लॅट एकाच परिसरात होते. त्यानंतर या ज्येष्ठ पतिपत्नींनी दोन मुलांकडे अलग अलग राहण्यास सुरुवात केली. वृद्ध आईवडिलात सामंजस्य नसल्याचं दोन्ही मुलगे आणि सुनांना माहीत होतं. दोघांनीही ही व्यवस्था मान्य केली. दोन्ही मुलं, आईवडीलही परस्परांकडे येत जात असत. त्यामुळे सौहार्दपूर्ण असा कौटुंबिक व्यवहारही चालू राहिला. मात्र या दोघांचं असं अलग राहणं इतरांना जणू खुपायचं. टोचायचं. असे समवयस्क आप्तस्वकीय भेटायला आल्या वेळी यांच्या अलग राहण्याबद्दल हमखास काहीतरी बोलत असत. यामागे परनिंदेच्या छुप्या हौसेपलीकडे काही नव्हतं. अशा चांभारचौकशा करणा-या काहींची परिस्थिती मला ठाऊक होती. त्यामुळे मला अशीसुद्धा शंका आली की असा काही मार्ग त्यांच्यापाशी उपलब्ध नाही त्यामुळे असूयेपोटी अशा चौकशा करत असावेत. ज्येष्ठ नागरिकांनी अशा प्रच्छन्न निंदेत भाग घेणं टाळायला हवं.


अनुवाद - डॉ. प्रतिभा काटीकर, सोलापूर