आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिजाततेसाठी काळाचे बंधन नको

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सध्या प्रयत्न चालू असून यासंदर्भात शासनाने केंद्राला अहवाल दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा.डॉ.गो.मा.पवार यांनी मांडलेले विचार...

भाषा दीड ते दोन हजार वर्षांची असावी,
अभिजात दर्जाचे ग्रंथही असावेतचा निकष :

अभिजात अशा भाषांना त्यांच्या अभिवृद्धीसाठी सुमारे पाचशे कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे,तेव्हापासून मराठी भाषेलाही हा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,यासाठी शासनाने जाणकारांचे मत जाणून घेऊन अहवाल तयार केला आहे. एखाद्या भाषेला अभिजात असा दर्जा देण्यासाठी ती भाषा दीड ते दोन हजार वर्षांपासून अस्तित्वात असली पाहिजे,असा एक महत्त्वाचा नियम आहे. शिवाय त्या भाषेत अभिजात दर्जाचे ग्रंथ असावेत असाही एक नियम आहे. इंग्रजीतील क्लासिक या शब्दावरून अभिजात हा शब्द आला आहे.


लीळाचरित्र व ज्ञानेश्वरी ग्रंथाला अभिजात ग्रंथांचा दर्जा :
शके 905 मध्ये गोमतेश्वर येथील शिलालेखात मराठीचे पहिले वाक्य आढळले. महत्त्वाचे म्हणजे युनोने अभिजात ग्रंथ म्हणून लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांना अभिजात साहित्याचा दर्जा दिला आहे. चक्रधरस्वामींचे लीळाचरित्र हे शके 1196 तर ज्ञानेश्वरी शके 1212 मधील आहे. त्यामुळे ग्रंथांच्या अभिजाततेचा जो निकष आहे, त्या कसोटीला आपण उतरतो. इतर भारतीय भाषांमध्ये तमिळ,मल्याळम्,तेलुगू,कन्नड या द्राविडी भाषांना दीड ते दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांना यापूर्वीच अभिजाततेचा दर्जा प्राप्त आहे. नियमावरच बोट ठेवायचे असेल तर दीड ते दोन हजार वर्षांच्या इतिहासाच्या कसोटीत आपण उतरत नाही. म्हणून काही बिघडत नाही. नाही म्हटले तरी मराठीला किमान हजार वर्षांचा इतिहास आहे. गाथा सप्तशतीत मराठी शब्द आहेत. सहाव्या-सातव्या शतकातील शिलालेखांवर मराठी शब्द आहेत. काळाच्या नियमात बसत नसले तरी ग्रंथांच्या अभिजात दर्जाच्या बाबतीत तरी मराठी अभिजात ठरते.


जागतिक पातळीवरील उत्तमोत्तम ग्रंथ
मराठीत यावेत, बोलीभाषांचाही अभ्यास व्हावा :

भाषेच्या बाबतीत मी तर म्हणेन की, कोणत्याही भाषेचा विकास हा जाणीवपूर्वक आर्थिक मदत देऊन केला पाहिजे. या भाषेच्या समृद्धीसाठी प्रयत्न करायला हवेत. जागतिक पातळीवरील उत्तमोत्तम ग्रंथ मराठीत आले पाहिजेत. मराठीच्या बोलीचाही वापर व्हायला हवा. भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यात खानदेशी बोली आहे. अशा बोलीभाषांचा अभ्यास व्हायला हवा. अभिजात ग्रंथ हा निकष मान्य करून मराठीला अभिजात दर्जा दिला गेला पाहिजे. कारण, तुकाराम गाथा,अभंगवाङ्मय हे अभिजाततेच्या कसोटीला उतरले आहे. काळाच्या कसोटीला उतरलेला ग्रंथ हा अभिजात असतो.


नोबेल आणि ज्ञानपीठ पुरस्कार ही कसोटी नको :
नोबेल आणि ज्ञानपीठ पुरस्कार हे एखादी भाषा अभिजात ठरविण्याची कसोटी असू नये. तुमचे साहित्य दीर्घकाळ टिकून राहिले हे मोठ्या कसोटीला उतरल्याचे चिन्ह आहे. उत्तमोत्तम ग्रंथांची निर्मिती, अनुवादित साहित्य व संशोधन याद्वारे मराठी आणखी समृद्ध होणे आवश्यक आहे. याला काळाचा निकष लावणे योग्य वाटत नाही.