आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही वही वाचू नये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी वहीचं पहिलं पान उघडलं. सुंदर महिरप काढून त्यात सुवाच्य अक्षरात लिहिलं होतं, ‘कृपया कोणीही ही वही वाचू नये.’ वाचणा-याची हमखास उत्सुकता चाळवणारं हे वाक्य वाचून मला गंमत वाटली. सोनूचं निरागस मनच त्यातून डोकावत होतं. मी पान उलटलं-
‘आज मी शाळेत गेलोच नाही. शाळा बुडवून सरळ नदीकाठी जाऊन बसलो. दिवसभर टाइमपास केला आणि संध्याकाळी घरी परत गेलो. कुणाला काही कळलंच नाही. मला ही शाळा अजिबात आवडत नाही. मी आजीकडे राहायचो तिथलीच शाळा चांगली होती. मला इथून पळून जायचं आहे. दादा आणि बाबांमुळेच ही वेळ आमच्यावर आलेली आहे.’
‘बाबांनी सांगितलं, तुम्ही एकत्र राहा. दादा तुझ्यासोबत राहील. तेव्हा बरं वाटलं होतं, पण आता मात्र उगाच आलो असं वाटतं.’ मी पान उलटलं.
‘दादा आणि बाबा मला अजिबात आवडत नाहीत. त्यांचा खूप राग येतो. आधी बाबांचाच राग यायचा, आता दादाचासुद्धा येतो. तो पण तसाच आहे-वाईट! मला सारखा ओरडतो. आईलासुद्धा ओरडतो. स्वत:ला पाहिजे ते घेतो आणि आम्हाला मात्र काहीच देत नाही. आईला म्हणतो, तू माझी नोकर आहेस आणि हे घर माझ्या बाबांचं आहे. मला त्याच्या कानाखाली द्यावीशी वाटते! मला आईचा पण खूप राग येतो. ती हल्ली मलाच सारखी ओरडते. दादाला ओरडत नाही. तिला विचारलं तर म्हणते, दादा सगळा खर्च चालवतो, पैसे देतो म्हणून ती त्याचं ऐकते. मग मी पण काय तिला खूप पैसे दिले तरच ती माझं ऐकेल? ती पण तशीच आहे-वाईट!’ इथे ‘वाईट’ हे मोठ्या अक्षरात लिहून तो शब्द अधोरेखित केलेला होता.
मी पुढची काही पानं चाळली... ‘मी वाईट आहे!’ पुन्हा हे मोठ्या अक्षरात! ‘मी आईला खूप खूप त्रास देतो. मी खोटं बोलतो, शाळेत जात नाही, चोरी करतो, गुटखा खातो, पिक्चरला जातो. माझ्यामुळे आई सारखी रडत असते. मी कोणालाच आवडत नसणार. मी जीव दिला पाहिजे, म्हणजे सगळी कटकट संपेल. मला एक चांगला मुलगा होऊन दाखवायचं आहे. काय माहीत मला जमेल का? पण त्यासाठी आम्ही परत मुंबईला आलो पाहिजे. दादा नको बरोबर! बाबांचा तर फोनसुद्धा नाही घेणार. मग आई पण खुश होईल!’
पूर्ण वहीत हा असाच सूर होता. भाऊ व वडिलांबद्दल राग, आपल्या वागण्याबद्दलचा अपराधीपणा, आपल्या नेहमीच्या वातावरणातून लांब गावाला राहताना जाणवणारा एकटेपणा आणि परिस्थितीबद्दलची चीड! पण मला जास्त गंभीर वाटला तो त्या निरागस मुलाच्या मनात पुसटता का होईना डोकावणारा आत्महत्येचा विचार! मी ताबडतोब त्याला आत बोलावलं. वही अर्थातच आत ठेवली होती. जवळजवळ दोन वर्षांनी मी त्याला पाहत होते. आता तो आठवीत गेला होता. त्याला पाहून मला बरं वाटल्याचं मी त्याला सांगितलं. तो काहीसा सैलावला. हातात असलेल्या त्याच्या शाळेच्या रिझल्टपासून सुरुवात केली. तो गणित, इंग्लिशमध्ये नापास झाला होता. ड्रॉइंग, कॉम्प्युटर यांसारखा क्रिएटिव्हिटी वापरता येईल अशा विषयात त्याला उत्तम मार्क पडले होते. ते त्याच्या नजरेस आणले. त्याच्याही ते लक्षात आले नव्हते. तो नापास विषयातच अडकला होता! अपेक्षेपेक्षा तो खूपच मोकळा झाला. सगळं काही बोलला. मात्र, संपूर्ण वेळ तो माझ्या नजरेला नजर न देत बाहेर बघत बोलत होता. मी त्याला त्याचं कारण विचारलं. ‘माझी हिंमतच होत नाही. मी फार चुकीचं वागलोय म्हणून लाज वाटते. वाटतं, तुम्ही काय म्हणाल? म्हणून हिंमत होत नाही. आईला तर मी खूपच त्रास दिला आहे.’
त्याला माझ्याकडे बघायला लावत मी म्हटलं, ‘तू आईला त्रास दिलायस ही गोष्ट आपल्या दोघांनाही माहीत आहे, पण मला माहीत असलेली आणि तुला माहीत नसलेली एक गोष्ट तुला सांगते. आज तुझी आई इतक्या प्रतिकूल परिस्थितीत पाय रोवून उभी आहे, ती केवळ तू तिच्याबरोबर असल्यामुळे! तुझी आई माराने बेशुद्ध पडलेली असताना पोलिस स्टेशनला जाऊन तिथून मला फोन करणारा तू फक्त तिसरीत होतास! तिचा वाढदिवस आहे, तिला फोन करा, असं गुपचूप आम्हाला सांगणारा तूच होतास आणि रोज तिला औषध घ्यायला आठवण करणारा पण तूच होतास! त्यामुळे तुझं वागणं चुकीचं असलं तरी तू वाईट आहेस, असं मी तरी कधीच म्हणू शकणार नाही.’ प्रथमच त्याच्या चेह-यावर काहीसं हसू उमटलं.
लहानपणी वाट्याला आलेली हिंसा, भाऊ व वडिलांपासून झालेली ताटातूट, आईबरोबर अतिशय ओढघस्तीच्या परिस्थितीत अगदी साध्या साध्या आवडी मारत राहावं लागणं, अकालीच मोठ्या माणसासारखं वागण्याची वेळ येणं या सा-यामुळे सोनूच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता. त्यातच हळूहळू पौगंडावस्थेत प्रवेश करत असल्यामुळे बंडखोरी करून मध्येच स्वत:च्या मनाप्रमाणे मुक्त वागण्याची अनिवार ऊर्मीदेखील त्याच्या मनात येत होतीच! मला जाणवलं ते म्हणजे, वरवर जरी बंडखोर वागणं असलं तरी अजून त्याला चुकीच्या वागण्याची बोच होती आणि बदलण्याची इच्छाही होती. म्हणूनच त्याच्या आईशी बोलून त्याच्याबरोबर काम करायचा एक मार्ग आम्ही ठरवला.
गावाला परत जाणं त्या दोघांसाठी योग्य नाही, हे तिला पटवून तिला इथेच तिच्या जुन्या नोकरीवर हजर होण्यास तसंच त्याच्या जुन्या शाळेत परत त्याचे नाव नोंदवण्यास सांगितले. त्यामुळे तो आपोआपच त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये परत आला असता, जे फार आवश्यक होतं. त्यानंतरच्या सत्रांमध्ये त्याच्या अभ्यासाचे नियोजन, त्याला पौगंडावस्थेबद्दल योग्य ती माहिती देणं, चित्रकला, कॉम्प्युटर या आवडत्या विषयात काही करायला त्याला संधी मिळवून देणं व वेळोवेळी त्याच्या भावना हाताळण्यास त्याला मदत करणं हे हळूहळू करावं लागणार होतं. सुदैवाने आत्महत्येचा त्याच्या मनातील विचार हा केवळ एक निसटता तरंग होता, त्यामुळे ती काळजी मिटली होती. पूर्वीपासून असलेल्या एका छान नात्यामुळे तो नक्कीच माझ्याकडे येत राहील, अशी त्याच्या आईला व मला खात्री होती. आणि जाताना सोनूच्या चेह-यावर प्रसन्न हसू होतं!
निसटता विचार
सुदैवाने आत्महत्येचा त्याच्या मनातील विचार हा केवळ एक निसटता तरंग होता, त्यामुळे ती काळजी मिटली होती. त्याला गावाला जावं लागणार नाही आणि त्याच्या जुन्या शाळेत अ‍ॅडमिशन घेणार, हे सांगितल्यामुळे तो खुश झाला आणि दर आठवड्याला मला भेटायचे त्याने कबूल केले.