आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ambuja Article About How Women Control Expression

आक्षेपार्ह असे काही नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एऽऽ सुमीत, काय हे... काकीने हसतसुद्धा डोळे वटारलेले. चार वर्षांच्या मुलाला ढम्मची मजा येत होती, आणखी आणखी असंच व्हावंसं वाटत होतं. हातावर हात दाबून एकदम पोकळी निर्माण करायची किंवा बोटांच्या चुटक्या. तोंडाव्यतिरिक्तही अवयवांतून आवाज होतात हे नावीन्य.
‘आई, आजोबा पादले,’ अमितने जेवताना दिलेल्या या बातमीला ‘ए, आजोबा मोठे आहेत, असे बोलू नये,’ हा प्रतिसाद. ‘आई, खरंच...’ अमितला ‘मोठे असूनही’ हेच तर सांगायचं होतं.
‘मम्मा, नाहीतर येऊच नको कशी आमच्याबरोबर, मध्येच आवाज झाला, नाही तर तुला घाईने शू आली तर ओशाळवाणं होतं बाई चारचौघात.’ डॉक्टर असलेल्या लेकीला वयानुसार काही गोष्टी आईच्या नियंत्रणात नसणार, हे कळत असूनही जनांस ते सांगण्यात अडचण होती.
काय एवढी हा हा हू हू चाललीय, म्हणून बाहेर डोकावले तर भाजीवालीशी एकदा अपानवायुनि:सारणार्थ एक वांगे अशी पैज मारून चांगली दोन किलो फुकटात (आजीच्या भाषेत तमाशा करून) पाडून घेतली ती तरुणपणीची गोष्ट प्रात्यक्षिकासह समजावण्यात पोरांसह रमलेले दादा.
‘पिंटे, मघा तुझी आई...’ रंगात आलेल्या बाबांचा आईच्या फिस्कारण्याने ब्रेक लागलेला. ‘झालं एखादवेळी चुकून तर असं काय मुलांसमोर, बायकांना वारं सरलं म्हणावं...’ यावर ढमढमा पर्परा हा आवडता श्लोक मोठ्यांदा म्हणत बाबा बाहेर निघून गेलेले.
काही नैसर्गिक गोष्टींना सभ्य माणसांच्या जगात टब्बू लावायचा, त्यातही श्रेष्ठाश्रेष्ठता. भाषेतील इष्टानिष्टाचीच छाननी करायला हवी असे अनेक प्रसंग डोळ्यांसमोर.
‘आमच्यात बोडके म्हणजे अखंड सौभाग्यकांक्षिण्ये आणि रांडेच्या म्हणजे हे साधुपुरुष असेच समजत जा तू.’ स्वत:च्याच चिरंजीव नि कन्यकेसाठी असलेल्या त्यांच्या या फुलीफुलीच्या प्रेमसंबोधनांनी दचकलेल्या नव्या वहिनीला काका समजावत होते. ‘शिव्या देत राहिलं की तोंड स्वच्छ होतं,’ असाही एक फंडा आल्याआल्या सासरघरी ऐकवण्यात आलेला. मोकळ्याढाकळ्या मनासाठीच्या या टेस्टची वहिनीला थोडी भीतीच वाटली तर तिच्या सोवळेपणाची टवाळी झाली.
‘तू असलीस की आमच्या बोलण्यावर बंधनं येतात, तू तुझ्या अनसूया, प्रियंवदांबरोबर फुले वेचायला जा कशी.’ आपल्या चाहुलीने अचानक गप्प झालेल्या मित्रांच्या टोळक्याच्या वतीने हे सुनवावे आपल्याच मंदारने. सख्ख्या मित्रांनी अव्हेरल्याने तिच्या गळ्यात हुंदका दाटला. ‘तरी बरं मी त्या अमकीतमकीसारखी खाष्ट नाही. ती असली असती म्हणजे कळ्ळं असतं, इथून तर नसतीच हटली नि सांगितले असते एकेकाचा कान पकडून यांच्या एकेक शब्दाचे अर्थ नि लावलंच असतं बदलायला भाषण...’ आपण उगाचच असहाय आहोत अशी जाणीव झाली रश्मीला.
खरंच, कुठे सुरू होतं हे असं असहायपण ओढवून घेणं? कुठे पोहोचवतं ते या लोकांना? बाबांचा आवडता श्लोक अथवा दादांचे प्रात्यक्षिक मुलांच्या औत्सुक्याचा विषय होतात. आई-आजी नाक मुरडण्याऐवजी त्याचा उपयोग करून घ्यायला शिकतील तर... हे काय ‘काहीतरीच’ असं म्हणालात ना? वाटलंच मला. विचार करा, नैसर्गिक प्रेरणांना दाबून ठेवणं चांगलं की समजावून घेणं? आहार-विहाराचा देहावरचा परिणाम समजावून देता येईल, आरोग्यवर्धक सवयींसाठीची प्रवचनं म्युझिकल होतील. अधिक पचनी पडतील. मोकळेपणा वाढेल, सभ्यतेचा बाऊ नाही होणार. पाचवीतला प्रसंग आहे. ‘भोकात बोट घालून पाहा, सापडेल तुझा खोडरबर, तिथेच पडला असेल,’ असे मी म्हटले नि आमच्या मैत्रिणींचे खूपच विचित्र नजरांतले हसू माझ्यावर खिळले. मला कळलंच नाही काही. त्या एकमेकींशी कुजबुजत माझी कीव करत होत्या. वर्गातल्या हुशार मुलीला पास-नापास काठावरच्या मुली हसतायत. विचारले तर काही सांगत नाहीत. किती लागलं असेल. माझ्या वाक्यावर त्या हसल्या होत्या म्हणून मी एकेक शब्दात काय चुकलं तपासत होते. शेवटी फारच मिनतवारीने एकीने सांगितलं, ‘भोक या शब्दाशी त्या हसल्यात.’ मी छिद्र म्हटलं असतं किंवा भगदाड म्हटलं असतं तर म्हणे त्या शहाण्या हसल्या नसत्या. मला अधिकच त्रास झाला. छिद्र हे खूपच लहान नि भगदाड खूपच मोठं, ते नाही चालणार इथे. मग बीळ हा त्यांच्या वापरातला शब्द भुयारासारखं काही तिथे अभिप्रेत नसूनही मला स्वीकारावा लागला. त्यांच्या हसण्याचा अर्थ मला कळायला पुढची कित्येक वर्षे जावी लागली...
भांडणातसुद्धा कुत्रा-मांजर असे कोणी कोणास रागाने म्हणायचे तर श्वान, मार्जार म्हणावे म्हणजे भा.पो. असा माझा नियम होता. बाबा ‘कृष्णश्वान की धवलश्वान’ अशी टिंगल करायचे. त्यांची एक गोष्ट मला आठवते. माझ्या विचित्र विचारांचाही त्यांनी उपयोग करून घेतलेला, त्या निमित्ताने त्यांनी पुराणातल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांचे संदर्भ सांगून त्यांच्या विशेषनामांनी आमचा शिव्याकोश वाढवलेला... त्यावरून पुढे मला सुचलेली गोष्ट होती, मुलांना शिव्या देऊ नये असे नुसते सांगून भागणार नाही तर शिव्यांचे अर्थ समजावणे अधिक परिणामकारक ठरेल. मुळात शिव्या वापरण्याची सुरुवात केवळ मोठ्यांचे अनुकरण या कुतूहलापोटीच होते. आय-भन काढू नको, असे टोकाच्या चिडीने म्हटलेले ऐकले होते. तुझ्या आईला लावला यातला एकही शब्द आक्षेपार्ह नसोन, एकत्रित असे काय भीषण ध्वनित होते, हे मला कळत नव्हते. मोठ्या माणसांना जो काय त्यांच्या अस्मितेवर घाला वगैरे तिथे जाणवतो तो मुलाने पहिल्यांदाच ते शब्द उच्चारल्यावर शक्य तितका समजावला तर मूल जाणिवेने ठरवेल त्या शब्दांचे उपयोजन. शब्दांची योग्य किंमत राहील. एखाद्याला नक्की आपल्याला झाट हाच शब्द वापरायचा आहे की क:पदार्थ चालेल, का कुण्या झाडाचा पाला हे अधिक शोभेल? हा विचार करून अधिक संपन्न रचना करता येईल. वहिनी, रश्मी, काका नि मित्र बोलण्यातले तथ्य वेचतील. विसंगती आढळल्यास सगळेच मोकळेपणाने दुरुस्ती करतील. किमान अत्याचाराबद्दल बिनदिक्कत बोलण्यास आयाबहिणींची भीड चेपेल. अर्वाच्य असे खरेच काही नाही हो. शिव्यांचाही अभ्यास नि संशोधनाचा वारसा आहे आपला.