आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटाच्या दुसर्‍या बाजूवर लवकरच कादंबरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.छाया महाजन या सध्या नवीन कादंबरी लिहीत आहेत. ही कादंबरी सध्या ‘घटस्फोट आणि कायदा’या विषयावर आधारित आहे. सामाजिक बाजू यात मांडताना त्या दिसतील. डॉ. महाजन यांची आतापर्यंत एकूण 22 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यातील पाच पुस्तके 2013 मध्ये प्रकाशित झाली आहेत. यामध्ये ‘पाण्यावरचे दिवे’ हा ललित गद्य, ‘राहिलो उपकारा इतुका’ कथासंग्रह, तीन कथासंग्रहाची तिसरी आवृत्ती मेहता पब्लिकेशनने बाजारात आणली आहे. आता त्या कायद्यावर आधारित कादंबरी लिहीत आहेत.

मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये आणि लहान गावांत लग्न वर्षानुवर्षे टिकून राहणे ही परिस्थिती बदलत आहे आणि घटस्फोटाची प्रकरणे वाढत आहे. यामध्ये उच्चशिक्षित तरुणांचे प्रमाण जास्त आहे. समाजातील वास्तव आणि उणिवा यावर अलिप्तपणे लिहिणे गरजेचे आहे. त्यामुळे या विषयावर कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली असल्याचे डॉ. छाया महाजन यांनी सांगितले. कायदे हे न्याय देण्यासाठी असतात; परंतु कायद्यातूनही अनेक पळवाटा काढल्या जात आहे. तसेच कायद्याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अन्याय, अत्याचारापासून महिलांना संरक्षण मिळावे यासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. स्त्रियांच्या उद्धारासाठी सतीच्या कायदापासून ते कौटुंबिक अत्याचार विरोधी कायद्यापर्यंत अशा अनेक कायद्यांनी महिलांना संरक्षण देण्यात आले आहे. हिंदू धर्मशास्त्रात विवाह हा एक महत्त्वाचा धार्मिक संस्कार मानला जातो; परंतु सध्या समाजातील स्थिती पाहता घटस्फोटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. पती-पत्नीमधील गैरसमज आणि छोट्या छोट्या कारणांमुळे होणारी भांडणे यामुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत जात आहे. घटस्फोटाच्या या कायद्यानुसार अनेक स्त्रियांना फायदाही होतो, पण याच कायदाचा जबरदस्त गैरवापर होताना दिसतो. स्त्रियांच्या फायदासाठीचा हा कायदा स्वार्थासाठी पैसा आणि पोटगी मिळविण्यासाठी केला जातो. यासाठी वधू पक्षाकडून वर पक्षावर अनेक खोटे आरोप केले जातात.

या आरोपांना गंभीर स्वरूपही दिले जाते. त्याचे समर्थन करताना मुलगा आणि मुलांकडील कुटुंबाला अत्यंत क्लेषकारक परिस्थितीतून जावे लागते व आर्थिक झळ पोहोचते. याचा विचार कायदा झाला तेव्हा केला गेला नसला तरी आता होणे गरजेचे आहे. अधिकांश स्त्रियांना घटस्फोटाचा उपयोग होतो, तरीही याच कायद्याचा आधार घेऊन आर्थिक लाभ घेणार्‍या मुलींची आणि कुटुंबांची संख्या कमी नाही, पण आपला समाज हा वर पक्षाकडे सहानुभूतीने पाहत नाही असे दिसते. उलट त्याची सहानुभूती आणि न्यायालयाची सहानुभूती मुलींच्या बाजूने असते. विवाह हे एक पैसे, संपत्ती मिळविण्याचे साधन बनले आहे.कॉन्ट्रक्ट मॅरेजनुसार काही काळापुरते लग्न केले जाते. घरात सासरची मंडळी छळ करतात म्हणून महिला 498 (अ ) नुसार पतीवर गुन्हा दाखल करतात. यामुळे वरपक्षाची प्रतिष्ठा धुळीस मिळते; परंतु महिलांना न्याय मिळाला पाहिजे, अशी धारणा समाजाची असते. अशा प्रकरणी समाजानेही या आरोपांकडे डोळससपणे पाहिले पाहिजे. फौजदारी गुन्हा नोंदविल्यानंतरही योग्य छाननी होणे आवश्यक आहे. यासाठी कायद्यामध्ये लवचिकता असणे अपेक्षित आहे. सामाजिक जागरूकतेमुळे परिवर्तन घडू शकेल, असे डॉ. महाजन यांनी सांगितले.
’ सुलक्षणा पाटील, औरंगाबाद