आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुभव हाच धडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नाही शारू, थांब. प्लीज.’
राकेशच्या तोंडून शारू बाहेर पडलं की मी अक्षरश: वितळायचे. अवचित एखादा अनामिक सुगंध आल्यासारखं वाटायचं. दूरदूर पसरलेल्या समुद्रकिना-यावर मी एकटीच उभी आहे आणि तिथल्या लाटा प्रचंड वेगाने माझ्या दिशेला येऊन माझ्या अनवाणी पायांना गुदगुल्या करताहेत असं भासायचं. आज माझा जमदग्नी झालेला असतानाही राकेशने एका शब्दात मला शांत केलं.

‘हं! बोला.’
‘अं, अ‍ॅक्चुली, हे बघ कसंय, तुझ्या दादाला काही आपली मैत्री आवडत नाही. तर आपण यापुढे जेवढ्यास तेवढं ठेवूयात. शाळेतलं जे काम असेल ते.’
‘हँ? हे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही राकेश!’
‘हेच आहे उत्तर. बस, चल मी येतो.’
‘नाही राकेश, थांब. दादा तुझ्याशी काय बोलला काल?’

‘हेच! की तुझ्या आईबाबांना मुलांशी मैत्री केलेली चालत नाही. तो म्हणाला की तू ऐकत नाहीस म्हणून तो मला सांगतोय की तुझ्याशी बोलायचं नाही असं.’
मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत राहिले. मी पुढे काही बोलायच्या आत तो म्हणाला,

‘चल मी येतो.’
‘आणि त्या पानटपरीच्या शेजारी?’
‘पानटपरीच्या शेजारी?’
राकेश अवाक् शांत झाला. थोडा वेळ उगाच केसांत बोटं फिरवू लागला. त्याची ती अदा मला आपोआप शांत करायची. मला अजून शांत करत तो म्हणाला, ‘शारू, परवा तुझा दादा मला भेटला होता.’
‘परवा? का? तुमचं काय चालू असतं रे सारखं एकमेकांना भेटणं आणि बोलणं?’ मी चिडून राकेशला विचारलं.
‘अं. खरं तर शारू, मला त्याने हे तुला सांगायला नाही सांगितलं होतं पण...’
‘पण? पण काय? आणि काय नाही सांगायला सांगितलं?’
‘तो परवा मला भेटला आणि तेव्हाच हे म्हणाला की आपली फ्रेंडशिप तुमच्या घरी आवडत नाही. आपली म्हणजे कुठल्याही मुलाची. तो म्हणत होता की त्याने खूप वेळा तुला समजावलं, पण तू ऐकलं नाही म्हणून तो माझ्याकडे आला.’
माझ्या डोक्यात असलेला राग आता दादाकडे कन्व्हर्ट झाला होता.

‘या सगळ्याचा काय संबंध कालच्या प्रसंगाशी?’
राकेश हसला. म्हणाला, ‘त्याने मला एक सिंपल आयडिया दिली. थोडासा वंगाळ अवतार करून प्रसन्न स्टोअर्सजवळच्या पानटपरीपाशी पायरीवर बसून राहायचं. एकदा का तू मला तिथे पाहिलं की बाकी पुढे काही करायची गरज नाही.’
ओऽह!

‘हं! पण नुसत्या गबाळ्या अवताराने काय होणार होतं हे मला कळलंच नाही. म्हणजे त्याला.’
‘पण माझ्या सगळं लक्षात आलंय!’
मी राकेशला मधेच तोडत म्हणाले.
‘माझ्या सगळं सगळं लक्षात आलंय.’
‘आणि मग मी तसा बावळटसारखा तिथे उभं राहिलो म्हणून तो काल थँक्स म्हणत होता. हा हा हा.’

हं. राकेश खरंच बावळट होता. माझ्या डोक्यावरचं ओझं आता उतरलं होतं. कालपासून रांगेत उभ्या असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळून गेली.
राकेशच्या मते फक्त बावळटासारखं उभं राहणं प्रत्यक्षात किती इंटेन्स होतं याची त्या भोळ्याला खरंच कल्पना नव्हती. दादाने त्याला सांगितलं आणि त्याने बिनबोभाट ऐकलंही. जसं मी त्याला सांगितलं होतं की माझ्याशी बोलायचं नाही आणि त्याने तेही ऐकलं होतं.

राकेश गेला. मीही निघाले.
माझा चेहरा एखाद्या सूर्यफुलासारखा खुलला होता. मी शाळेच्या मागच्या रस्त्याने माझ्या घराच्या पुढे असलेल्या शंकराच्या मंदिराकडे निघाले. वाटेत जाता जाता कालपासून लिंक न लागणा-या सर्व गोष्टींचे संबंध मला दिसू लागले. एक एक गोष्ट कशी कशी घडली आणि त्याचे आपण काय आणि कसे कसे अर्थ लावले हे समोर चित्रासारखं उभं राहू लागलं. चालता चालता मी माझ्या वेण्या सोडल्या आणि रिबनी बॅगेत ठेवून रबरं हाताच्या मनगटाला लावली. मग उगंच राकेशने फिरवला तसा केसांत हात फिरवत केस एका बाजूने पुढे घेतले आणि मंदिरात पोहोचले.

वास्तविक मी मंदिरात आलेच नव्हते. शंकर मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर त्याच्या भल्या मोठ्या अंगणात डाव्या बाजूला एक सुंदर शांत तळं होतं आणि सरळ उजव्या बाजूला मंदिराचं दार होतं. हे संपूर्ण मंदिर काळ्या दगडांत बांधलेलं असल्याने इथे हिमाच्या गुंफेत गेल्यासारखं प्रचंड थंड वाटायचं आणि तितकंच शांतसुद्धा. मंदिराच्या आजूबाजूला जास्वंदीची गर्द झाडीही होती आणि त्याच्या आड एक गर्द केवड्याचं बन. त्यामुळे इथे येऊन बसायला मला फार आवडायचं.

मुख्य दरवाजातून नुसतं एक पाऊल आत टाकल्या टाकल्या मला फुलावर अलगद बसलेल्या फुलपाखरासारखं वाटायचं. खूप सुरक्षित वाटायचं. शांत वाटायचं. मनातली चलबिचल कुठल्या कुठे पळून जायची. मी बूट काढले आणि तळ्याच्या दिशेने वळले. पाय थोडेसे ओले केले. तीन-चार पाय-या चढून मग तळ्याच्या कट्ट्यावर पाय लोंबकळत सोडून बसले. पाठीवरून दप्तर बाजूला काढून ठेवलं आणि त्यालाच एखाद्या सशाच्या पिल्लासारखं छातीशी घेऊन पाय हलवत बसले. इथपर्यंत येताना मनात धिंगाणा घालणारे विषय क्षणार्धात निवांत पडले. तिथल्या थंड हवेने मी रिफ्रेश झाले. डोळ्यांचा थकवा गेला, मनाचा शीण गेला. सातवीच्या सुरुवातीपासून चालू झालेल्या एका शिकवणीचा मला चांगलाच धडा मिळाला होता. ज्या गोष्टींकडे-नात्यांकडे मी फार द्वेषाने किंवा फार प्रेमाने बघत होते त्यांचं खरं स्थान माझ्या लक्षात आलं होतं. ज्या मुलाला मी ऐटदार म्हणायचे तो प्रत्यक्षात किती भोळा होता हे मला समजलं. ज्या भावाला मी खवचट आहे असं म्हणायचे तो प्रत्यक्षात किती दक्ष आहे हे समजलं. आणि या सगळ्याच्या पलीकडे एक भाऊ आपली बहीण अल्लड वयात वाट भरकटू नये यासाठी काय काय करू शकतो तेही कळलं.

आणि अजून एक गोष्ट कळली. ती म्हणजे काही वेळा आपण, आपली बाजू किती खरी आहे हे ऊर बडवून सांगण्याचा प्रयत्न करत असताना ती बाजू खरी अथवा खोटी असली तरी आपल्याला उपयोगी नाही हे मात्र ठार विसरून जातो. जसं मी नाही का राकेश किती चांगला आहे, कसा चांगला आहे, त्याची पर्सनॅलिटी, इतरांची मेंटॅलिटी वगैरे बडबडायचे. पण...

हं असो. खरं तर हा धडा नसून एक अनुभव होता. कदाचित आयुष्य ही एक शाळा आहे आणि अनुभव हा एक शिक्षक हीच म्हण मला ख-या अर्थाने समजली होती.

अचानक मला या सगळ्या प्रकाराचं खळाळून हसू आलं. मी परत एक मोठ्ठा श्वास घेतला. श्वासात महादेवाच्या देवळातल्या अगरबत्तीचा सुगंध मिसळला. मनाचे सारे भाग सुगंधी झाले. शरीराचे मोरपीस बनले. हलकेच उठून उभी राहिले. दूर दूर पसरलेल्या तळ्याच्या संथ सखोल पाण्यावर थेट क्षितिजापर्यंत एक नजर टाकली. बॅग उचलली, बूट हातात धरले आणि घाटाच्या फरशांचा थंडगार सुखद स्पर्श अनवाणी पावलांनी अनुभवत परत निघाले. (समाप्त)
avkpd08@gmail.com, esahity@gmail.com
(ही कादंबरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला अवश्य कळवा.)