Home | Magazine | Rasik | nte-jokes-tt

नग्नता : चित्रातली आणि मनातली

टी.टी., नेट विनोद | Update - Jun 02, 2011, 01:54 PM IST

'नग्नते'च्या आकर्षणामुळे की काय, लाखापेक्षा अधिक वाचकांनी या अंकात रस दाखवला आहे.

 • nte-jokes-tt

  'चिन्ह' या चित्रकलेला वाहिलेल्या अंकाचा 'नग्नता विशेषांक' येत्या आठ-पंधरा दिवसांत मुंबईतून प्रकाशित होत आहे. त्याचे संपादक-संचालक सतीश नाईक इंटरनेटवरून गेले काही महिने या अंकाचा प्रसार करत होते. 'नग्नते'च्या आकर्षणामुळे की काय, लाखापेक्षा अधिक वाचकांनी या अंकात रस दाखवला आहे. परिणामी नाईक खूष आहेत. कारण यंदा प्रथमच 'चिन्ह'ची मोठी आवृत्ती निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण या सुखद कहाणीला एक 'ट्विस्ट' आहे. एका हिंदुत्ववादी संघटनेने या अंकाविरुद्ध आवाज उठवण्याची धमकी दिली आहे. त्यांचा विरोध अश्लीलतेला नाही, तर एम. एफ. हुसेन या 'दुष्ट' चित्रकाराला अंकात स्थान मिळावे हे त्यांना नापसंत आहे! आता काय करावे या कर्माला? तिकडे ते हुसेन धर्मांतर करायलाही तयार नाहीत, दाढी उतरवायलाही तयार नाहीत आणि वेगळी चित्रेही करत नाही आहेत! मग हिंदुत्ववाद्यांनी तरी काय करावे? इकडे हे नाईकही हुसेनना वाळीत टाकायला तयार नाहीत. सगळाच घोळ आहे. यांच्यापेक्षा ती नग्नता परवडली. ती एरव्ही बरीचशी झाकलेली असते आणि क्वचित कधी तरी उघडी दिसते!
  फॅमिली कॉर्लिऑन
  मारिओ पुझो यांच्या 'गॉडफादर' कादंबरीने अणि चित्रपटाने इतिहास घडवला.त्यातील कॉर्लिओन कुटुंब आणि त्याचा नायक नेमका कसा फोफावला, याचे रहस्य उलगडणारी 'द फॅमिली कॉर्लिऑन' ही अप्रकाशित पटकथा आता अमेरिकेतील ग्रँड सेंट्रल पब्लिशिंग कंपनीतर्फे प्रकाशित होत आहे. ती एड फास्को या लेखकाने लिहिलेली असून, त्याच्या तीन कादंब-या यापूर्वी प्रकाशित झालेल्या आहेत. मारिओ पुझो यांचे निधन १९९९ मध्ये झालेले असले तरी त्यांच्या वारसांनी ही नवी पटकथा वाचून संमती दिली आहे. 'गॉडफादर' १९६९ मध्ये प्रथम प्रकाशित झाली होती. आजवर तिच्या दोन कोटी दहा लाख प्रतींची विक्री झालेली आहे.
  इंग्रजी 'अंतर्नाद'
  'अंतर्नाद' मासिकाचे संचालक भानू काळे यांनी पुण्याच्या 'एसएम-सीआयटी'वाल्या ज्ञान महामंडळाच्या सहकार्याने अलीकडे 'चेंज फॉर बेटर' नावाचे नवे इंग्रजी त्रैमासिक दणक्यात सुरू केले आहे. (अहो आश्चर्यम्!) मोठा आकार, 'अंतर्नाद'पेक्षा खूप चांगला कागद, वेगळे लेखक, वेगळे विषय, देखणे रूप, १२ रुपये किंमत, असे सगळे मराठी माणसाचे डोळे विस्फारणारे आहे. अगदी दृष्ट काढावी इतके लोभस. पण या अंकातून पानोपानी परिचित मराठीपण डोकावते, ते खुपणारे आहे. भाषेचा लहेजाही काहीसा बाळबोध आणि पुस्तकी वाटतो. त्यापलीकडे जाऊन हा अंक जर 'रीडर्स डायजेस्ट' किंवा 'नॅशनल जिऑग्राफिक'सारखा वाचकप्रिय ठरला तर त्याला मोठी मागणी येऊ शकेल. काही सांगता येत नाही.
  शब्द : नवे आणि जुने
  मोठ्या इंग्रजी शब्दकोशांमध्ये दोन-अडीच लाख शब्द असतात. त्यातले पंधऱा-अक्षरी लांब-रुंद शब्द हळूहळू नाहीसे होतात आणि आलू, गोबी, वायकी (म्हणजे विदेशी हवाई भाषेत 'जलद') वगैरे परभाषांमधले शब्द स्वत:साठी जागा निर्माण करतात. त्याबद्दल जाणकार मंडळींना दु:ख नाही. त्याना चिंता आहे की, चॅटिंग, एसएमएस वगैरे मार्गांनी जे चित्रविचित्र शब्द रोजच्या रोज पोरासोरांच्या डोक्यात घुसत असतात, त्यांना शब्दकोशांच्या शिस्तीत बसवायचे कसे? उदाहरणार्थ, 'सिंघिओझ्झारे' (singhiozzare)) हा इटालियन शब्द पाहा. त्याचा मूळ अर्थ 'हुंदके देणे' असा आहे. पण नव्या काळात त्याला 'उच्च पदावर असताना कोणताही आरोप नाकारण्याची वृत्ती' असा अजब अर्थ येऊन चिकटला आहे. आता हे शब्दकोशाच्या वाचकाला कसे समजवायचे? असा भुंगा कोशकारांना सध्या हैराण करत आहे! अर्थात शब्दकोश कधीच न पाहणा:यांना हा नस्ता ताप नाही. ते सदैव अज्ञानातला आनंद घेत असतात.

Trending