आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्वस्त्र प्रसाराचा वादग्रस्त समर्थक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय संबंधाचे ज्येष्ठ अभ्यासक केनेथ वॉल्ट्झ यांचे 12 मे रोजी वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. दुस-या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या विकासात ज्या महत्त्वपूर्ण अभ्यासकांनी आणि विचारवंतांनी योगदान दिले, त्यामध्ये वॉल्ट्झ यांचे नाव अग्रणी आहेत. दुस-या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देण्याचे काम वॉल्ट्झ यांच्या दोन पुस्तकांनी केले. वॉल्ट्झ यांनी 1956मध्ये लिहिलेल्या ‘मॅन, द स्टेट अ‍ॅण्ड वॉर’ आणि 1979मध्ये प्रकाशित झालेल्या ‘थिअरी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स’ या पुस्तकांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाला एक नवी दिशा प्राप्त करून दिली. दुस-या महायुद्धानंतरच्या शीतयुद्धाच्या राजकारणाविषयी, शस्त्रास्त्र स्पर्धेविषयी, अण्वस्त्रांच्या प्रसाराविषयी, अमेरिकेच्या हस्तक्षेपी धोरणाविषयी अतिशय स्पष्ट, निर्भीड आणि परखड विचार त्यांनी मांडले.


आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे स्थैर्य आणि सुरक्षा हे वॉल्ट्झ यांच्या चिंतनाचे मुख्य विषय होते. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील स्थैर्य आणि सुरक्षिततेला कोणत्या घटकांमुळे धोका निर्माण होऊ शकतो, हे स्पष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये युद्धे का होतात आणि अशी युद्धे कशी टाळता येतील, याविषयी त्यांनी सैद्धांतिक विवेचन केले. त्यांच्या मते, राष्ट्रा-राष्ट्रांमधील युद्धे ही प्रामुख्याने तीन घटकांवर विसंबून असतात. एक-नेतृत्वाचा घटक, दोन-शासनाचा प्रकार आणि तीन-आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे स्वरूप. या तीन घटकांपैकी वॉल्ट्झ यांनी युद्धाच्या कारणासाठी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या स्वरूपाला सर्वाधिक जबाबदार मानले. जर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत अराजकता असेल तर युद्धाची शक्यता वाढते. या व्यवस्थेत राष्ट्रांमधील प्रश्न सोडवण्यासाठी युद्धाशिवाय इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. अराजकता टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत समतोल टिकून राहणे आवश्यक आहे. हा समतोल राष्ट्रांमध्ये सत्तेचे वितरण कशा पद्धतीने होते, यावर विसंबून असतो. याविषयी वॉल्ट्झ यांनी जी सैद्धांतिक मांडणी केली आहे ती ‘नववास्तववाद’ नावाने प्रसिद्ध आहे.


वॉल्ट्झ यांनी अण्वस्त्रांविषयी आणि अण्वस्त्रांच्या प्रसाराविषयी मांडलेले विचार अतिशय वादग्रस्त ठरले. अण्वस्त्रांच्या अल्प प्रमाणातील विकासाला आणि त्यांच्या प्रसाराला वॉल्ट््झ यांनी समर्थन दिले. या समर्थनासाठी वॉल्ट््झ यांनी एक सैद्धांतिक मांडणी केली. ही मांडणी ‘दहशतीचा समतोल’ म्हणून ओळखली जाते. वॉल्ट्झ यांच्या मते, अण्वस्त्रांमुळे सुरक्षा वाढते. जेव्हा दोन राष्ट्रे अण्वस्त्रांचा विकास करतात त्या वेळी त्यांच्यात दहशतीचा समतोल प्रस्थापित होतो. अण्वस्त्रांच्या हल्ल्याचे भीषण परिणाम या राष्ट्रांना माहीत असल्यामुळे ते युद्धाचा मार्ग पत्करत नाहीत. ते काळजी घेतात की, त्यांच्यातील कोणत्याही छोट्या संघर्षाने युद्धाचे रूप धारण करू नये. त्यातून आंतरराष्ट्रीय राजकारणात स्थैर्य आणि सुरक्षा साधली जाते. वॉल्ट्झ यांचे हे विचार शीतयुद्धकालीन अमेरिका आणि सोविएत रशियामध्ये अण्वस्त्र स्पर्धेला तंतोतंत लागू पडतात. शीतयुद्धाच्या 45 वर्षांच्या काळात अमेरिका आणि सोविएत रशियामध्ये चाळीसहून अधिक असे संघर्ष निर्माण झाले की, ज्यांचे रूपांतर युद्धात होऊ शकले असते. तथापि, असे घडले नाही. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोविएत रशियाकडे परस्परांचा विनाश करू शकतील, अशी अण्वस्त्रे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे त्यांच्यात दहशतीचा समतोल प्रस्थापित झाला होता. याच सिद्धांताच्या आधारावर वॉल्ट्झ यांनी भारत आणि पाकिस्तानमधील अण्वस्त्रांच्या प्रसाराचे समर्थन केले. 1998मध्ये भारत आणि पाकिस्तानने अणुचाचण्या करून स्वत:ला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केल्यानंतर या राष्ट्रांना मोठ्या आंतरराष्ट्रीय विरोधाचा सामना करावा लागला. अमेरिकेसह इतर अनेक राष्ट्रांनी भारत आणि पाकिस्तानविरुद्ध आर्थिक बहिष्काराची घोषणा केली. वॉल्ट्झ यांनी मात्र भारत आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रीकरणाचे स्वागत केले. त्यांच्या मते, अण्वस्त्रीकरणामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये भविष्यात युद्ध होणार नाही. दोन्ही राष्ट्रांनी अण्वस्त्रांचा विकास केल्यामुळे त्यांच्यात दहशतीचा समतोल प्रस्थापित झाला आहे. 1999मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगीलचा संघर्ष उद्भवला. वॉल्ट्झ यांनी या संघर्षाविषयी व्यक्त केलेले मत लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांच्या मते, कारगील संघर्षाचे रूपांतर भारत-पाकिस्तानमधील प्रत्यक्ष युद्धात झाले नाही, ते केवळ दोन्ही देशांकडे असलेल्या अण्वस्त्रांमुळे. या संघर्षाच्या प्रसंगी भारत अतिशय जबाबदारीने वागला आणि या संघर्षाचे रूपांतर युद्धात न होऊ देण्याची काळजी घेतली.


अण्वस्त्रधारी राष्ट्रे अतिशय जबाबदार पद्धतीने वागतात. त्यांना अण्वस्त्रांचे दुष्परिणाम चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे ते आपल्या अण्वस्त्रांच्या सुरक्षेची काळजी घेतात, असा वॉल्ट्झ यांचा युक्तिवाद आहे. या युक्तिवादाच्या समर्थनार्थ वॉल्ट्झ यांनी चीनचे उदाहरण दिले आहे. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या कठीण प्रसंगीदेखील चीनने आपल्या अण्वस्त्रांचे काळजीपूर्वक रक्षण केले. हाच प्रकार आता भारत आणि पाकिस्तानच्या बाबतीतही दिसून येतो आहे. ही दोन्ही राष्ट्रे आपल्या अण्वस्त्रांच्या रक्षणासाठी प्रचंड पैसा खर्च करत आहे.


वॉल्ट्झ यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाविषयी व्यक्त केलेली मते अतिशय वादग्रस्त ठरली. इराणने अण्वस्त्रांचा विकास करू नये, यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अमेरिकेने असा प्रयत्न न करता इराणला अण्वस्त्रांचा विकास करू द्यावा, अशी निर्भीड भूमिका वॉल्ट्झ यांनी घेतली. इराणने जर अण्वस्त्रांचा विकास केला, तर पश्चिम आशियात युद्धाची शक्यता कमी होऊन स्थैर्य आणि सुरक्षितता टिकून राहील. पश्चिम आशियात दहशतीचा समतोल प्रस्तापित होईल. पश्चिम आशियामध्ये सध्या इस्त्राएल हा एकमेव अण्वस्त्रधारी देश आहे. त्यामुळे हा संपूर्ण उपखंड असुरक्षित बनला असून तेथे सातत्याने युद्धाची भीती आहे. ज्या वेळी इराण अणूबॉम्ब विकसित करेल, त्या वेळी इस्त्राएल आणि इराणमध्ये दहशतीचा समतोल प्रस्थापित होईल आणि या उपखंडात स्थैर्य टिकून राहील. वॉल्ट्झ यांनी 2012मध्ये ‘फॉरेन अफेअर्स’ या संशोधन पत्रिकेत एक लेख लिहिला होता. ज्याचे शीर्षक होते ‘व्हाय इराण शुड गेट टु बॉम्ब’. या लेखात वॉल्ट्झ यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमांचे जबरदस्त समर्थन केले. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंझामीन नेत्यान्याहु यांनी वॉल्ट्झ यांच्या या भूमिकेवर टीका केली होती.


याच भूमिकेच्या आधारावर वॉल्ट्झ यांनी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचेही समर्थन केले. उत्तर कोरियाने आपला अण्वस्त्र विकासाचा कार्यक्रम चालू ठेवावा, अशी परखड भूमिका त्यांनी घेतली. त्यातून उत्तर-पूर्व आशियात अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये दहशतीचा समतोल प्रस्थापित होईल. उत्तर-पूर्व आशियात जपान आणि दक्षिण कोरियामध्ये अमेरिकेचा लष्करी तळ असून या दोन्ही राष्ट्रांना अमेरिकेकडून आण्विक संरक्षणाची शाश्वती प्राप्त झाली आहे. वॉल्ट्झ यांच्या मते, उत्तर-पूर्व आशियाई राष्ट्रांपुढे चीन आणि उत्तर कोरियाचा सामना करण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक म्हणजे, आपला संरक्षण खर्च वाढवणे आणि दुसरा, अमेरिकेबरोबर युती संबंध प्रस्थापित करणे.
अमेरिकेत राहून अमेरिकेच्या हस्तक्षेपी, एकाधिकारशाहीवर आणि हेकेखोर परराष्ट्र आणि संरक्षण धोरणावर टीका करणा-यांमध्ये वॉल्ट्झ यांचे नाव आघाडीवर होते. अमेरिकेच्या इराकमधील लष्करी हस्तक्षेपावर वॉल्ट्झ यांनी जाहीर टीका केली होती. अमेरिकेच्या अशा हस्तक्षेपी धोरणामुळे अनेक उपखंडांमधला विभागीय सत्ता समतोल धोक्यात येईल, असे अतिशय निर्भीड, परखड आणि वास्तववादी विचार मांडणारा विचारवंत आता काळाच्या पडद्याआड गेला आहे...
skdeolankar@gmail.com