आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाचे पोषण हेच काय खायचं?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जसजसे बाळ मोठे व्हायला लागते तसतशी आपल्याला काळजी वाटू लागते ती त्याच्या योग्य पोषणाची! बाळाच्या जन्मानंतर आईचे दूध हेच बाळासाठी संपूर्ण पोषण देणारे असते. बाळ मोठे होऊ लागते तशी त्याची पोषणाची गरज वाढू लागते. फक्त आईचे दूध पुरेसे होत नाही आणि वरच्या अन्नाची आवश्यकता भासू लागते.
स्तनपान किती दिवस सुरू ठेवावे आणि केव्हा वरच्या अन्नाला सुरुवात करावी ह्याचा आपण नेहमीच विचार करत असतो म्हणूनच ह्या काही टिप्स.
1. सहा महिन्यांनंतर बाळाच्या आहारात आईच्या दुधाबरोबरच इतर पदार्थांचाही समावेश करावा.
2. बाळाला वरचे अन्न देण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त उशीर करू नये. नाही तर बाळाला कुपोषण होण्याची शक्यता असते. आईच्या दुधात लोहाची कमतरता असते, बाळाला सहा महिन्यांनंतर फक्त आईचे दूध दिल्यास पंडुरोग (अ‍ॅनिमिया) व्हायची शक्यता असते.
3. सुरुवात पातळ पदार्थांपासून करावी. उदाहरणार्थ भाताची पेज, वरणाचे पाणी, इत्यादी. हळूहळू त्यांचा दाटपणा वाढवत नेऊन मऊसर खिचडी किंवा खीर देण्यास सुरुवात करावी.
4. बाळाला दिवसातून 3-4 वेळेला थोडे थोडे खायला द्यावे.
5. आहारात फळे आणि व्यवस्थित शिजवलेल्या भाज्यांचा समावेश करावा.
6. उकडलेली अंडी, मासे, चिकन, मटण असे मांसाहारी पदार्थ बाळाला नवव्या महिन्यापासून देण्यास सुरुवात करावी.
7. एका वेळेला खाण्याचा एकच प्रकार बाळाला द्यावा. त्याचा बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास (अ‍ॅलर्जी, रिअ‍ॅक्शन) होत नसल्याची खात्री झाल्यावरच मग दुसरा पदार्थ द्यावा.
8. पचायला हलक्या अशा पदार्थांचा समावेश बाळाच्या आहारात करावा. उदाहरणार्थ, छान कुसकरलेले केळे.
9. बाळासाठी वापरण्यात येणारी भांडी, चमचे स्वच्छ व जंतुविरहित असल्याची खात्री करून घ्या, नाहीतर बाळाला संसर्ग होण्याची शक्यता असते.
10. बाळाला सर्व प्रकारच्या चवींची सवय होण्यासाठी प्रत्येक ऋतूत उपलब्ध असणा-या वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा. यामुळे बाळाची जीवनसत्त्वांची आवश्यकतादेखील पूर्ण होते.
11. या वेळी लागलेल्या खाण्याच्या सवयी जन्मभर टिकतात. म्हणूनच बाळाला जास्त गोड किंवा खारट पदार्थ देऊ नयेत.


अमायलेजयुक्त पदार्थ
अंकुरित धान्ये अल्फा-अमायलेज नावाच्या विकराने युक्त असतात. अल्फा-अमायलेज अन्न पचायला हलके बनवते आणि त्यातील ऊर्जेचा घटक वाढवते. अमायलेजयुक्त पदार्थ घरीदेखील बनवता येतात. त्याची कृती खालीलप्रमाणे आहे.
1. पाव किलो गहू त्याच्या दुप्पट ते तिप्पट पाण्यात आठ तासांसाठी भिजवून ठेवावा.
2. आठ तासांनी त्यातील जास्तीचे पाणी काढून तो मोड येण्यासाठी एक ते दोन दिवस अंधारात ठेवावा.
3. नंतर मोड आलेला गहू 5 ते 8 तास वाळवावा.
4. वाळवल्यानंतर कढईत तो भाजून घ्यावा.
5. गहू व्यवस्थित भाजल्यानंतर तो मिक्सरवर चांगला वाटून घ्यावा आणि हवाबंद डब्यात ठेवावा.
एक चमचा अमायलेजयुक्त गहू कुठलाही पदार्थ शिजवून झाल्यावर त्यात घालावा.


पाककृती :
दोन्ही पाककृती साधारण 250 कॅलरीज ऊर्जा आणि 5 ग्रॅम प्रथिने देतात.
खिचडी : वाढणी दोन वेळेसाठी
जिन्नस : तांदूळ - 35 ग्रॅम
मूगडाळ - 10 ग्रॅम
पालेभाजी - दोन चमचे
तूप - दोन चमचे
जिरे - चवीप्रमाणे
मीठ - चवीप्रमाणे


कृती :
1. तांदूळ व डाळ हलकेच भाजून घ्यावी.
2. तांदूळ, डाळ व पालेभाजी मीठ घालून चांगली शिजवून घ्यावी.
3. वरून तूप व जि-याची फोडणी घालावी.
नाचणीची लापशी
वाढणी दोन वेळेसाठी
जिन्नस :
नाचणीचे सत्त्व - 30 ग्रॅम
भाजलेले शेंगदाणे - 15 ग्रॅम
गूळ - 20 ग्रॅम


कृती :
1. नाचणीचे सत्त्व, शेंगदाणे आणि गूळ मिक्सरवर चांगला वाटून घ्यावा.
2. त्यात पाणी घालून शिजवावे.