आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसींचे श्रमिक साहित्य संमेलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दुस-या ओबीसी साहित्य संमेलनाबाबत बोलताना मुख्य निमंत्रक प्रा. राजन दीक्षित म्हणाले, ‘ओबीसींच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचा भाग म्हणून आणि साहित्यविषयक जाणिवा समृद्ध करण्यासाठी ऑक्टोबर 2010 मध्ये बीड येथे पहिले ओबीसी साहित्य संमेलन भरवण्यात आले होते. मागील संमेलनात ओबीसींना शिष्यवृत्ती मिळावी, आयआयटी, आयआयएमएस या शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळावे, मंडल आयोगाच्या शिफारशी पूर्ण लागू कराव्यात, असे ठराव करण्यात आले होते. पण याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ओबीसींच्या समस्यांना वाचा फोडण्याबरोबरच या समाजातील विचारवंतांना, साहित्यिकांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांना अस्तित्वाची जाणीव करून देणे हे या दुस-या साहित्य संमेलनाचे ध्येय आहे

संमेलनातील चर्चासत्रे व कार्यक्रम
दोन दिवसांच्या या साहित्य संमेलनातील कार्यक्रमांचा धावता आढावा. शनिवार, 9 फेबु्रवारी रोजी सकाळी 9 वाजता संविधान दिंडी. त्यानंतर पहिल्या दिवशी परिसंवादाचे विषय पुढीलप्रमाणे--हिंदू ओबीसींचा मूळ धर्म-ग्रंथ-गुरू कोणता, ओबीसीला पर्याय धर्मांतर, ओबीसी संत, सुफी संप्रदाय साहित्यातील मानवतावाद व विद्रोह, मी गाडगेबाबा बोलतोय, सत्यशोधकी जलसा, निमंत्रितांचे काव्यसंमेलन. दुस-या दिवशी ओबीसींची जनगणना न करणे ही सत्तेची भीती की राजकीय षड्यंत्र, हिंदू महिलांचे कर्मकांड ही शोकांतिका की प्रगतीतील अडसर, जागतिकीकरणाचा बलुतेदारांवर झालेला परिणाम यावर चर्चासत्रे तसेच युवाजागर, मी महात्मा फुले बोलतोय एकपात्री सादरीकरण होईल.

ओबीसी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र कुंभार यांचे विचार
भाषा नावाची गोष्ट ही बोलीभाषेतूनच निर्माण झाली. यात वाणीचा व्यवहार महत्त्वाचा आहे. बोलीचे वाङ्मय महत्त्वाचे आहे. जे श्रमिक असतात ते कृती करतात,कृती केली की क्रियापदे तयार होतात. वस्तू तयार होतात म्हणून नाम मिळते. ती वस्तू सुंदर असते म्हणून विशेषणे मिळतात. त्यामुळे ओबीसींच्या श्रमांमुळे जे साहित्य निर्माण झाले,ती साहित्यिक विशेषणे जर वजा केली तर साहित्य म्हणजे पोटभरू प्रस्थापितांचे मंत्रच फक्त शिल्लक राहतील. कुंभार, लोहार, कोष्टी, चांभार, सुतार यांच्यासह श्रमिकांच्या श्रमातून साहित्य निर्माण झाले आहे. भाषेवरचा अधिकार हा कारागिरांचा आहे. म्हणून मराठीवर अधिकार प्रथम त्यांचा आहे.

साहित्याशिवाय समाज उभारू शकत नाही, हे आता ओबीसींना समजू लागले आहे. पहिल्या संमेलनाची हीच फलश्रुती आहे. ज्ञान, विज्ञान,तंत्रज्ञान, कला, समाजकारण, राजकारण यांच्यासह ओबीसी चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. ती चळवळच क्रांतीकडे नेईल. त्यामुळे एकूणच मराठी जगताची दिशा बदलून जाईल. अर्थकारण बदलत असले तरी त्याचा ओबीसींना तोटाच होत आहे. नवे तंत्रज्ञान हे कारागिरांच्या मुळावर आले आहे. शिक्षण महागडे तर सरकारच्या सवलती म्हणजे फसवणूक आहे.

नव्या पिढीला हेच सांगावेसे वाटते की, बाराव्या शतकात बसवेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून शिकवण दिली होती. कोणतेही कष्टाचे काम श्रेष्ठच आहे. ऐतखाऊ जगणा-यांना अस्पृश्य मानले पाहिजे. कष्टातून स्वाभिमान निर्माण केला पाहिजे. ओबीसी हे निर्मिक आहेत. त्यामुळे ते साहित्यिक म्हणूनही उत्तम कामगिरी करू शकतात, यात शंका नाही.