आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हातारा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला विद्यापीठातून निघायला थोडा उशीरच झाला. घाईने रिक्षात बसले व मिल कॉर्नरपर्यंत आले. तिथे आल्यावर सवेराची बस उभीच होती. त्यात बाबा पेट्रोलपंपपर्यंत आले. तिथे थोडा वेळ बसची वाट पाहत असताना चिकलठाणा बस आली. सगळ्यांची बसमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी झाली. त्या गर्दीतून मी कशीबशी आत शिरले. एक फेर नजर फिरवली तर सगळ्या जागा भरलेल्या होत्या. काही जण उभे होते. ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर एक म्हातारा माणूस बसलेला होता. तो एकटाच होता. मी चटकन त्यांच्या बाजूच्या सीटवर बसले.

तो म्हातारा जवळपास 60-70 वर्षांचा असेल. अंगावर मळाचा खूप थर साचलेला वाटत होता. जणू काही त्याने महिन्यापासून अंघोळ केलेली नसावी. त्याच्या अंगात धोतराचा छोटा तुकडा त्याने घातलेला होता व अंगात एकावर एक असे दोन शर्ट होते. एक शर्ट कोटासारखा फुल होता. अंगावरचे कपडेसुद्धा इतके मळलेले होते की, त्याने एकदा घातले ते काढलेच नसावे. तो म्हातारा मला भिकारी वाटला व तो भिकारीच होता. त्याचे हात थरथरत होते. तो घरंदाज वाटला, कारण त्याच्या डोक्यावर मळकी का होईना लाल रंगाची पगडी होती. पूर्वीच्या लोकांना बोडखी डोकी म्हणजे अपशकुनच वाटत असे, त्यामुळे त्याचे डोके मळक्या पगडीने का होईना, पण झाकलेले होते. त्याच्या डोळ्यात करुण भाव दिसत होते.
आता मला कळले की, त्याच्याजवळ इतका वेळ कोणी का बसलं नव्हतं. त्यांना किळस वाटत होती; पण मला त्या म्हाता-या ची दया येत होती. खरंच कशा विचारांची माणसं असतात. अरे, तो गरीब होता; पण माणूसच नाही का? इतकं का त्याला वाळीत टाकल्यासारखं करावं?

मी बसल्यावर त्या म्हाता-याला जरा बरं वाटलं. तो सावरून बसला व त्याच तोकडंधोतर मांडीवरून खाली ओढण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने मला विचारले, बाई, मोंढा नाका आला का? तेव्हा मी माझ्या विचारातून सावरून त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात खूपच आर्त भाव होते. मला गहिवरल्यासारखंच झालं. मी म्हणाले नाही व मोंढा नाका येईपर्यंत त्या म्हाता-या ने मला दोन-तीन वेळेस विचारले. मोंढा नाका आल्यावर तो म्हातारा उठला व त्याच्या जवळचा एक रुपया तो पुढे गेल्यावर खाली पडला. तसे एक-दोघे ओरडले, तुमचे पैसे खाली पडले; पण मी लगेच उचलून त्यांच्या हातात दिले. समोर उभे असलेले लोक त्याच्या अंगावर ओरडत होते, लवकर उतरा. त्याच्या वयाचा अंदाज न घेता लोक त्याच्यावर ओरडत होते. कसाबसा थरथरत तो म्हातारा निघून गेला; पण माझ्या मनातून त्याच्याबद्दलचे विचार जाईनात. डोकं सुन्न झाल्यासारखं वाटलं. मला वाटले, याला मूलबाळ नाही का? मुलगा असेल तर तो आपल्या थकलेल्या म्हाता-या वडिलांना असे कसे फिरू देईल? त्याची इतकी दैना कशाला. मनात म्हटलं, देवा, इतकेही हाल करू नकोस. त्या म्हाता-या बद्दल मला खूपच आपुलकी निर्माण झाली. तो म्हातारा उठून गेल्यावर मी खिडकीकडे सरकले. मी बाजूला सरकल्यावर एका सीटच्या जागेत दोन बायका बसल्या. ते पाहून वाटलं, खरंच कशी माणसं जगात वावरत असतात. इतका वेळ तो एकटाच होता तेव्हा त्याच्याजवळ बसायला कुणीच तयार नव्हतं व आता एका जागेत दोन बायका बसल्या होत्या. हे पाहून मन आणखीच खिन्न झालं.