आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीवर पुन्हा कॉंग्रेसचे निशाण ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकविसाव्या शतकातल्या ‘लोकप्रिय आजीबाई’ शीला दीक्षितांनी पंधरा वर्षे दिल्ली विधानसभेवर हुकमत गाजवली. सलग तीन निवडणुकांत सोनिया आणि राहुल गांधींच्या मदतीशिवाय स्वबळावर दिल्ली काबीज करण्याची धमक दीक्षितांनी निर्विवादपणे सिद्ध केली. आता पुन्हा एकदा दीक्षितांच्या कसोटीचा कालखंड सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी नोव्हेंबर महिन्यात पाच राज्यांची विधानसभा निवडणूक आहे. त्यात एक प्रमुख राज्य आहे दिल्ली. अनभिषिक्त सत्तेची हुकमत देशभर गाजवणा-या राजधानी दिल्लीच्या विधानसभेवर यंदा हुकमत नेमकी कोणाची? दिल्लीच्या राजकारणाचे बारकाईने अवलोकन केल्यास हा गुंता सहज उलगडत जातो.


काँग्रेस आणि भाजप हे दिल्ली विधानसभेत दोन परंपरेने चालत आलेले प्रमुख पक्ष. 1998च्या निवडणुकीत शीला दीक्षित विरुद्ध सुषमा स्वराज असा सामना रंगला. या निवडणुकीत काँग्रेसने विजयासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले नव्हते. तरीही दिल्लीच्या जनतेने भाजपला निर्धाराने घालवून सत्ता काँग्रेसच्या हाती सोपवली. दिल्लीत 2003 आणि 2008च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अंत:कलहाने ग्रासले होते. सुषमा स्वराजांच्या पराभवानंतर शीला दीक्षित यांची राजकीय उंची वाढली होती. त्यांना आव्हान देण्यासाठी अरुण जेटलींना मैदानात उतरवण्याचे भाजपने ठरवले. मात्र कायम मागल्या दाराने संसदेत शिरण्याची सवय जडलेल्या जेटलींनी ऐनवेळी पळ काढला. मुख्यमंत्रिपदाचा दावेदार बनण्याची त्यांची हिंमत झाली नाही. अखेर जनमानसावरची पकड सुटलेल्या मदनलाल खुराणा आणि विजयकुमार मल्होत्रा या बुजुर्गांना अनुक्रमे 2003 आणि 2008मध्ये भाजपला मैदानात उतरवावे लागले. दोन्ही निवडणुकांत भाजपला आपला तोल सावरता आला नाही.


शीला दीक्षितांचे राजकीय अस्तित्व मात्र तुलनेने स्थिर होते. महानगराच्या दैनंदिन जीवनात लहान-मोठ्या समस्यांचे त्वरेने निराकरण होण्यासाठी त्या सतत जागरूक होत्या. प्रत्येक भागात राज्य सरकारने रहिवासी संघटनांना जोरदार उत्तेजन दिले. या संघटनांबरोबर नागरी समस्यांसाठी भागीदारी योजना सुरू केली. लोकांचा सहभाग आणि लोकवर्गणीचा वाटा यामुळे अनेक गोष्टी वेळेवर मार्गी लागल्या. राष्‍ट्रकुल खेळांच्या निमित्ताने दिल्ली महानगराने पुन्हा एकदा कात टाकली. रस्तोरस्ती फ्लायओव्हर्स आणि अंडरपास, कुठे भूमिगत गटारे, तर कुठे शहराच्या सौंदर्यीकरणाचे नवनवे प्रयोग असे जवळपास 70 हजार कोटींचे अवाढव्य काम दिल्लीत उभे राहिले. दहा वर्षांत यूपी-बिहारमधून दिल्लीत मोठ्या प्रमाणावर लोकांचे लोंढे आले. 1500पेक्षा अधिक अनधिकृत वस्त्या दिल्लीत निर्माण झाल्या. दिल्लीचा नवा मास्टरप्लॅन सरकारने तयार केला. अनधिकृत घरे आणि कॉलन्यांना प्रोव्हिजनल प्रमाणपत्रे दिली. खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने लवकरच या झोपड्यांचे पक्क्या घरात रूपांतर होणार आहे. दिल्लीत वीज आणि पाणी दोघांची दरवाढ हा सरकारच्या डोकेदुखीचा विषय. मात्र वीजपुरवठा आता पूर्वीसारखा खंडित होत नाही. पाणीपुरवठाही ब-यापैकी सुरळीत आहे. मेट्रो ट्रेनमुळे लाखो प्रवाशांची सोय झाली, तरी ती पुरेशी नाही. वाहतूक कोंडीने गुदमरलेले रस्ते हा दिल्लीचा गहन प्रश्न बनला आहे. दिल्लीत सार्वजनिक परिवहनाचे अनेक पर्याय हवेत, त्यासाठी अनेक योजना शीला दीक्षितांच्या अजेंड्यात आहेत.


शीला दीक्षित स्थिर असल्या तरी केंद्रातल्या यूपीए सरकारवर भ्रष्टाचार, महागाई आणि विविध घोटाळ्यांचे आरोप झाले. साहजिकच सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात प्रचंड संताप जनतेच्या मनात आहे. सत्ताबदलाची 1998सारखीच धग वातावरणात जाणवते आहे. मात्र काँग्रेसला दूर सारून सहजासहजी लोक भाजपच्या हाती राज्याची सूत्रे देतील, अशीही स्थिती नाही. याचे मुख्य कारण, आजही दिल्लीत भाजप अंत:कलहाने विखुरलेला आहे. राजकीय रणांगणात अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी (आप) हा नवा पक्ष उतरला आहे. आंदोलनाच्या लाटेवर स्वार झालेला ‘आप’ राजकीयदृष्ट्या परिपक्व नसला तरी काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन घडवण्याची क्षमता केजरीवालांकडे आहे. राज ठाकरेंच्या मनसेने महाराष्‍ट्रात विरोधी मतांचे विभाजन घडवण्याची जी भूमिका वठवली, त्याचीच पुनरावृत्ती केजरीवाल दिल्लीत घडवतील, असे चित्र तूर्त दिसते आहे.


नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा अश्वमेध काँग्रेसच्या पथ्यावर पडला आहे. दिल्लीच्या 70 विधानसभा जागांपैकी 19 मतदारसंघांत मुस्लिम मतांचे प्राबल्य आहे. या मतदारांना दिल्लीत काँग्रेसशिवाय पर्याय नाही. 11 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. त्यात मायावतींच्या ‘बसपा’ने दोन जागा मिळवल्या होत्या. मात्र भाजपला इथेही स्थान नाही. काँग्रेसची सुरुवातच त्यामुळे 70 पैकी किमान 25 जागांपासून होते. सत्तेसाठी हव्या आहेत फक्त 36 जागा. त्यासाठी शीला दीक्षितांनी नेहमीप्रमाणे आक्रमक व धुवाधार प्रचाराला प्रारंभ केला आहे.


या वेळी काँग्रेस अर्थात पूर्णत: शीला दीक्षितांवर अवलंबून नाही. तरुण मतदारांची वाढलेली संख्या व बदलत्या वातावरणाचे भान ठेवून काँग्रेसने अजय माकन या तरुण नेत्याच्या नावाचा मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीसाठी अप्रत्यक्ष संकेत दिला आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास माकन दिल्लीचे नवे मुख्यमंत्री होतील, संदीप दीक्षित त्यांच्या मंत्रिमंडळात असतील व शीला दीक्षित आपल्या खासदार पुत्राच्या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवून केंद्रीय राजकारणात येतील, अशी व्यूहरचना चर्चेत आहे. ‘अँटी इनकम्बन्सी’चा प्रश्नही या बदलामुळे निकालात निघेल. कालपरवापर्यंत माकन केंद्रीय मंत्री होते. काँग्रेसच्या राष्‍ट्रीय महासचिवपदी अलीकडेच त्यांची नियुक्ती झाली. इतक्या महत्त्वाच्या पदावर एच. के. एल. भगत यांच्यानंतर विराजमान होणारे माकन हे दिल्लीतले एकमेव नेते आहेत. राष्‍ट्रीय अध्यक्षपदावरून नितीन गडकरींची गच्छंती झाल्यावर त्यांनी नियुक्त केलेल्या विजेंद्र गुप्तांनाही दिल्लीचे प्रदेशाध्यक्षपद तडकाफडकी सोडावे लागले. राजनाथसिंगांनी त्यांच्या जागी विजय गोयल या दुस-या वैश्य नेत्याची नियुक्ती केली. गोयल तसे झुंजार व दिल्लीच्या परिभाषेत जुगाडू नेते आहेत, मात्र त्यांचा स्वभाव एककल्ली आहे. भाजपमध्ये त्यामुळे पुन्हा गटातटाचे राजकारण सुरू झाले. गटबाजी दूर करण्यासाठी दिल्लीचे प्रभारीपद राजनाथसिंगांनी मग गडकरींकडे सोपवले. विखुरलेल्या भाजपला सावरण्यात गडकरींना कितपत यश येते, याचे उत्तर लवकरच मिळेल.


भाजपकडे गोयल, गुप्ता या वैश्य नेत्यांखेरीज विजयकुमार मल्होत्रा, आरती मेहरा, जगदीश मुखी इत्यादी नेत्यांची फळी आहे. मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीसाठी नरेंद्र मोदींच्या गोटातून अचानक स्मृती इराणींचे नाव चर्चेत आल्याने पक्षातला संभ्रम अधिकच वाढला. भाजपबरोबर व्यापारी वर्गाची व पंजाबी मतदारांची व्होटबँक दिल्लीत आहे. याखेरीज मध्यंतरी नितीशकुमारांमुळे काही बिहारी मतांचा लाभही भाजपला झाला. तथापि जनता दल(यू) आणि भाजपच्या ताज्या घटस्फोटामुळे ही मते आता पर्याय नसल्याने काँग्रेसकडे झुकू शकतील. केजरीवालांच्या ‘आप’मुळे बसणारा फटका व आश्वासक नेतृत्वाचा अभाव यामुळे दिल्लीत आज तरी भाजप काँग्रेसच्या तुलनेत बराच मागे आहे. एखादा चमत्कार घडला तरच भाजपला दिल्लीची सत्ता मिळू शकते. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सलग चौथ्यांदा काँग्रेसचा तिरंगा फडकल्यास आश्चर्य वाटायला नको.