आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनश्‍च बिदाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


प्रिय आई-बाबा,

शाळेत पाचवी-सहावीत शिकत असताना टीचरने शिकवलेलं आठवतं, पत्रलेखनात आईवडिलांना संबोधताना ‘तीर्थस्वरूप/ परमपूज्य’ असं लिहायचं. त्या वयात या शब्दांचा शब्दश: अर्थ कळायचा. या शब्दाचा मनाशी/ हृदयाची असलेला संबंध नाही कळायचा त्या वयात. परंतु आज या शब्दांचा शब्दांपलीकडील अर्थ लक्षात येतो. हे शहाणपण सहजासहजी नाही आलं, या शब्दांचा अर्थ लक्षात येण्यासाठी देवाने मला मातृत्व प्रदान केले. मी आयुष्याची पहिली 22 वर्षे तुमच्या प्रेमळ छत्रछायेखाली काढली. परंतु बाळंतपणातील सहा महिने म्हणजे या 22 वर्षांच्या प्रेमाचा सारांश होता. मला पहिलं बाळ होणार म्हणून मी माहेरी आले. बाळंतपणाआधीच तीन महिने तुम्ही माझी सर्वतोपरी काळजी घेतली. माझी तब्येत, खाणेपिणे, औषधोपचार सगळ्याकडे तुमचे लक्ष होते. हे सर्व अगदी लग्नाआधीसारखेच होते. परंतु प्रसूतीच्या वेळी आई तू घेतलेली ठाम भूमिका, स्वत:चे हृदय माझ्या वेदनांनी तुटत असताना मला सर्व काही चांगले होईल, धीर धर असा दिलेला विश्वास, स्वत:च्या हळव्या मनाला आवरत माझ्या मनाला हिंमत देणारा स्पर्श आणि बाबा तुमचे प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत काहीही न बोलता डोळ्यांनी मानसिक आधार देणे हे अमूल्य होते. या सहा महिन्यांत कडक, शिस्तप्रिय आणि वेळप्रसंगी कठोरसुद्धा होणारे तुम्ही. बाबा, तुमच्या हृदयाचा एक प्रेमळ कोपरा उजेडात आला आणि याउलट दयाळू, प्रेमळ आणि हळव्या मनाची तू, आई, तुझा वेळ पडल्यावर अगदी भक्कमपणे उभा राहणारा आधार लाभला. तुम्हा दोघांच्या विश्वासाप्रमाणे सर्व मंगल झाले. माझ्या कुशीत एक छोटासा राजकुमार खेळू लागला. त्याच्या आगमानाने घर प्रफुल्लित झाले. पण याचबरोबर मला असे जाणवू लागले की माझी जबाबदारी आता वाढली आहे. त्याचे उत्तम संगोपन हे माझे कर्तव्य. दिवस लोटत गेले तसे लक्षात आले की माझ्यापेक्षा तुमची जबाबदारी दुपटीने वाढली आहे. तुम्हा दोघांनी तुमचा दिनक्रम त्याच्या वेळेनुसार बदलला. तो सकाळी कधी उठेल, उठला की लगेच त्याच्याशी खेळायला सज्ज व्हायचे, तो जरासा पडला की सर्व कामे सोडून त्याला शांत करायचे. हात दुखेस्तो त्याला घेऊन फिरायचे. रात्री त्याच्या मर्जीप्रमाणे त्याच्याशी खेळायचे आणि त्याला झोपवण्यासाठी दोन-तीन तास अथक प्रयत्न करायचे.


तो तीन महिन्यांचा होत आला. त्याचे विनाकारण रडणे बंद होत होते, बोललेले कळत होते. बाळाचा आता वडिलांकडे जायचा दिवस जवळ येऊ लागला. सर्वांना स्वत:च्या मोहिनीत अडकवून प्रेमाचा पाझर फोडून आणि सर्वांना रडवून तो जायला निघाला. आणि मी त्याची आई, स्वत:च्या आईवडलांना रडवून, पुन्हा एकदा ‘बिदाई’ घेणार होते. शेवटच्या दिवशी तर बाबा तुम्ही बाळाला घेऊसुद्धा नव्हता शकत. त्याला बघितले की तुमच्या अश्रूंना वाट फुटत होती. तुम्ही एकटे एका कोप-या त बसून रडत होता. हे आठवून आता माझ्या डोळ्यातील आसवांना मला आवरता येत नाही. माझ्या बाळपणी तुम्हा दोघांनी मला किती प्रेम केले असेल ते मला आठवत नाही. परंतु माझ्या बाळाच्या बाळपणी तुम्ही त्याला किती प्रेम केले, हे आयुष्यभर माझ्या स्मृतीत राहील. एक रुखरुख मात्र आजकाल मला रोज असते. स्त्री ही जगातील सर्वांत सहनशील व्यक्ती असते. परंतु मुलगी ही जगातील सर्वात स्वार्थी व्यक्ती असते. ती आपल्या आईवडलांना दोनदा रडवून निघून जाते. स्वत:ला समज आली की लग्न करून आणि स्वत:च्या बाळाला जरासे शहाणपण आल्यावर, ती ‘पुनश्च बिदाई’ घेऊन जाते. अशा या तुमच्या स्वार्थी मुलीवर तुम्ही नेहमीप्रमाणेच प्रेमवर्षाव करत राहाल याच विश्वासासोबत, आज पत्राच्या शेवटी पण अगदी मनापासून आणि भावनापूर्वक लिहिते, तीर्थरूप आणि परमपूज्य आई-बाबा,Thank you for everything..


pandyasheetal@yahoo.co.in